Thursday, August 16, 2012

सुविचार

आज SMS मध्ये एक छान सुविचार आला. आवडला म्हणून इथे टाकत आहे.

"Meditation purifies Mind
 Charity purifies Wealth 
 Fast purifies Body
 Forgiveness purifies Relation 
But only
Prayer purifies Soul."

Tuesday, August 14, 2012

पास्ता इन टोमॅटो सॉस

ही रेसिपी मी एका साप्ताहिक सकाळच्या अंकात वाचली आहे. उषा पुरोहितांची आहे. पण खालील रेसिपी माझे काही फेरफार करून केलेली आहे. मुख्य म्हणजे त्यांनी ओव्हन मध्ये बेक करायला सांगितले आहे. पण माझ्या कडे मायक्रोवेव्ह नसल्याने मी बेक केले नाहीये. असो. 
सर्वात आधी मी माझ्या घरच्यांवर हा प्रयोग केला. आणि मग यशस्वी झाल्यावर परवा माझ्या मोठ्या लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीला मोठ्या प्रमाणावर केला. सगळ्यांना खूप आवडला. त्यामुळे इथे त्याची कृती टाकत आहे.

साहित्य:
पास्ता               २०० ग्रॅम
टोमॅटो               ५०० ग्रॅम 
कांदा                 १ 
लसूण                 ४-५ पाकळ्या 
गाजर                  १ 
मीर पूड                चवीनुसार 
ऑलिव तेल          २ चमचे
बटर                    १ चमचा 
मीठ                     चवीनुसार
टॅलियन सिझनिंग चवीनुसार

संपूर्ण कृती तीन टप्प्यांमध्ये विभागता येते. 
१. टोमॅटो सॉस तयार करणे.
२. पास्ता पाण्यात उकळून घेणे.
३. टोमॅटो सॉस आणि शिजवलेला पास्ता एकत्र गरम करणे.

सर्व प्रथम आपण टोमॅटो सॉस करायची कृती बघुयात.
१. टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेणे.
२. लसणाच्या पाकळ्याही बारीक चिरून घेणे.
३. गाजर किसून घेणे.
४. कढईमध्ये ऑलिवचे तेल गरम करायला ठेवणे.
५. गरम तेलात सर्व प्रथम कांदा परतून घेणे.
६. कांदा थोडा परतला गेला की लसूण आणि किसलेले गाजर घालणे. हे मिश्रण थोडे परतणे.
७. त्यावर चिरलेला टोमॅटो घालून परतणे.
८. ह्या मिश्रणातला पाण्याचा अंश पूर्णतः जाऊन ते व्यवस्थित शिजेल एवढा वेळ गॅसवर ठेवायचे आहे. (सतत जरी परतले नाही तरी अधून मधून खाली लागत नाहीये न ह्याची काळजी घेत परतावे.)
९. ह्या मिश्रणात मिरपूड घालावी.
१०. पूर्ण शिजलेले मिश्रण कढईतून काढून गार करायला ठेवावे. 
११. गार झालेले मिश्रण मीठ घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. हा झाला टोमॅटो सॉस तयार.

पास्ता शिजवणे.
सहसा ह्याची कृती पास्ताच्या पॅकेटवर दिलेली असते. तरीही पुन्हा एकदा खाली देत आहे.
१. साधारण १०० ग्रॅम पास्ता साठी १ लिटर पाणी गरम करायला ठेवणे.
२. पाण्याला उकळी आली असता त्यात पास्ता घालणे.
३. साधारण ५-१० मिनिटात पास्ता शिजतो.
४. शिजलेला पास्ता एखाद्या स्टीलच्या चाळणीत अथवा रोवळीत काढून त्यावर गार पाणी घालावे. (त्याने पास्ता एकमेकांना न चिकटता सुटा होतो.)वर नमूद केलेल्या दोन्ही गोष्टी ( टोमॅटो सॉस आणि पास्ता शिजवणे) आपण आधी करून ठेवू शकतो. ऐन वेळेस शेवटची स्टेप करू शकतो.
१. कढईमध्ये बटर गरम करून त्यात शिजवलेला पास्ता घालणे.
२. त्यात तयार टोमॅटो सॉस घालणे. (सॉस पास्ताला व्यवस्थित लागला पाहिजे.)
३. आवडीनुसार टॅलियन सिझनिंग घालणे.
४. सर्व मिश्रण एकजीव होवून गरम झाल्यावर आवडत असल्यास वरून चीज घालून गरम गरम वाढणे.

टीप: टॅलियन सिझनिंग मला पुण्यातील ग्राहक पेठेत मिळाले होते. त्यात वेग-वेगळ्या हर्ब्स वाळवून एकत्र केलेल्या आहेत. ताजे हर्ब्स सुद्धा वापरत येऊ शकतात.
=======================================================================
माझ्या लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीला मी साधारणपणे २०-२५ लोकांसाठी पास्ता बनवला होता. त्यासाठी टोमॅटो सॉस आदल्या दिवशी बनवला होता. आणि पास्ता दुपारीच शिजवून, संध्याकाळी ऐन वेळेस सर्व एकत्र करून गरम केले होते.
त्या दिवशी मी बरेच घोळ घातले होते. म्हणजे सकाळी सत्यनारायणाची पूजा. संध्याकाळी मुलांसाठी पास्ता आणि मोठ्यांसाठी पनीर बटर मसाला, पुलाव, दाल फ्राय आणि पोळ्या सा बेत असा बेत होता. त्यामुळे मला फोटो काढणे जमले नाही. तरी तयार पास्ताचा एक फोटो टाकत आहे.

आणि हा माझ्या मुलीचा पास्ताची वाट बघतानाचा फोटो.
अर्धशतक

अरेच्चा, बघता बघता अर्धशतक गाठलं. आत्ताची ही ५१ वी पोस्ट. सुरुवात केली तेव्हा किती लिहायचं, काय लिहायचं हे काहीच ठरवलं नव्हतं. फक्त लिहायचं एवढंच मनात होतं. त्यामुळे हे अर्धशतक गाठायला किती वेळ घेतला हे खरंच महत्वाचं नाहीये. सध्या तरी लिखाण चालू राहिलेय हीच मला महत्वाची गोष्ट वाटतेय. 

मी जेव्हा नुकतीच कार चालवायला शिकले होते तेव्हा वेगाचं भारी वेड होतं. (म्हणजे तसं ते पूर्णपणे गेलं नाहीये तरीही!) त्या वेगाच्या पायी इच्छित स्थळाला लवकर पोहोचत तर होते पण कित्येक क्षण काळजाचा ठोका चुकवणारे अनुभवाला यायचे. आता मात्र गाडी चालवताना प्रवास निर्धोक आणि आनंददायी होईल हे बघते. 

त्यामुळे ब्लॉगिंग मध्ये अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अजून खूप लिहायचं आहे. मन-मोकळेपणाने लिहायचे आहे. पण हा प्रवास सुसाट नसेल कदाचित पण मनाला आनंद देणारा नक्कीच असेल.

Tuesday, August 7, 2012

एका बेडकाची गोष्ट

माझी आधीची कंपनी सर्व्हिस बेस्ड कंपनी असल्याने बिहेवियरल ट्रेनिंग बरीच असायची. असंच एक ट्रेनिंग केलं होतं त्यात आमच्या ट्रेनरने ही बेडकाची गोष्ट सांगितली होती. मनात कायमच्या राहिलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे.
=====================================================================
एकदा काही संशोधक एका बेडकावर प्रयोग करत होते. प्रयोग असा होता की बेडूक किती तापमानाचे गरम पाणी सहन करू शकतो. सर्व प्रथम त्यांनी पाण्याचं तापमान ९० अंश ठेवलं. म्हणजे पाणी उकळायला लागाच्या आधीचं तापमान. त्यांनी बेडकाला त्या पाण्यात टाकलं तसं त्याने टुणकन बाहेर उडी मारली. मग संशोधकांना वाटलं की हे तापमान खूप जास्त होत आहे म्हणून त्यांनी पाण्याचं तापमान बरंच कमी केलं आणि ५० अंश ठेवलं. पुन्हा बेडकाला त्यात टाकलं तर त्याने पुन्हा पाण्याबाहेर उडी मारली. पाण्याचं तापमान अजून कमी केलं. ४० अंश ठेवलं. पण ते तापमान पण बेडकाला सहन झालं नाही आणि त्याने बाहेर उडी मारली.

मग संशोधकांनी विचार केला की बेडकाला पाण्यातच ठेवायचे आणि हळू-हळू पाण्याचे तापमान वाढवायचे. म्हणजे त्यांना नक्की कळेल की कुठल्या तापमानाला बेडूक पाण्याबाहेर उडी मारतो ते. 

झालं. मग त्यांनी पाण्याचा तापमान सर्वसामान्य तापमानापासून सुरुवात करून हळूहळू वाढवायला चालू केले. पाण्याचे तापमान ३५ अंश, ३६ अंश, ३७ अंश असं करत करत ४० अंशांपर्यंत पोहोचले तरी बेडकाने काही हालचाल केली नाही. 

बेडकाने ४० अंश तापमान झाले तरी पाण्या बाहेर उडी मारली नाही म्हणून संशोधकांना जरा संशय आला आणि त्यांनी तपासलं तर तो बेडूक मरण पावला होता. 

तर झालं काय की जस जसं पाण्याचं तापमान वाढत गेलं तस तसा तो बेडूक स्वतःला परिस्थितीनुरूप अडजस्ट करत होता. पण एक वेळ अशी आली की त्या बेडकाला पाण्याचं तापमान सहन झालं नाही आणि तो मारून गेला. हळू हळू वाढत असलेल्या तापमानामुळे त्याला लक्षातच आले नाही की पाण्याचं वाढतं तापमान आपल्याला सोसावण्याच्या पलीकडच आहे आणि आपण पाण्यातून बाहेर यायला हवं.
=====================================================================
आपल्याही बाबतीत काही अंशी असंच होतं. आपल्या आयुष्यात अनेक ताणतणाव येत असतात. आणि आपण ते झेलून आपलं आयुष्य जगात किंवा जगायचा प्रयत्न करत असतो. पण असे ताण आपण किती सहन करायचे कारण रबर जसं एका मर्यादेच्या पुढे ताणलं की तुटून जातं तसंच आपल्याही बाबतीत घडू शकतं.

Friday, August 3, 2012

निर्लेप

काल 'सकाळ' मध्ये मुक्तपीठ सदरातला लेख वाचला. तो एका स्त्रीरोगतज्ज्ञाने लिहिला होता. त्याचा सारांश असा होता की एक  मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्यांच्याकडे येत होती. त्या मुलीचे वागणे अतिशय संयत आणि तिचा नवरा एकूण कमी बोलणे, भावना कमी व्यक्त करणे हे सदरातला होता. त्या डॉक्टरना तिच्या नवर्याच्या वागण्याबाबत आश्चर्य वाटत होते. त्यात त्या मुलीची तारीख जवळ यायला लागल्यावर ती तिच्या आई सोबत येऊ लागली. तेव्हाही त्या डॉक्टरना असेच वाटले की त्याने (नवर्याने) अजूनच अंग काढून घेतले. 
यथावकाश त्या मुलीला प्रसूतिवेदना सुरु झाल्या आणि ती त्या अत्यंत धीराने सोसत होती. कळ आल्यावर केवळ तोंड थोडे वाकडे होत असे. पण ती कायम कसला तरी जप करत होती. तिला एक मुलगा झाला. बालरोगतज्ज्ञांनी त्याला तपासले आणि बाळाला घरच्यांच्या सुपूर्द केले. बाळ झाल्यावर त्या नवर्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित झळकले. परंतु दुर्दैवाने ते बाळ दुसर्याच दिवशी काही कारणांनी मृत्युमुखी पडले. बाळाच्या आईला धक्का बसू नये म्हणून तिला बाळ सिरीयस हे असे सांगितले आणि बाळाच्या बाबांना मात्र बोलावून घेऊन सत्यपरिस्थितीची कल्पना दिली. त्यावेळेस त्याने २ मिनिटे शांत बसून खिशातून एक जपमाळ काढून जप केला.  त्या २ मिनिटात तो एकदम शांत झाला आणि शांतपणे परिस्थितीचा स्वीकार केला.


त्या नंतर त्या बाळाच्या आईला हळू हळू मानसिक तयारी करून कल्पना देण्यासाठी बाळ खूप सिरीयस  आहे असे सांगायला सुरुवात केली असता ती म्हणाली की बाळाला जेव्हा खोलीतून नेले तेव्हाच तिला कल्पना आली होती. आणि डॉक्टरांना तसेच तिच्या नवर्याला सेटल होता यावे म्हणून ती काही बोलली नाही. नंतर त्या दोघांनी सांगितले की ते दोघंही गोंदवलेकर  महाराजांची उपासना आणि नामस्मरण करतात.  आणि त्यामुळे भावनाविवश न होता ते परिस्थितीला शांतपणे सामोरे जाऊ शकले. असो.


तर आपण एखादं वाचन करतो तेव्हा आपल्याशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक त्यामुळे माझं मन अस्वस्थ झालं असावं. ज्या व्यक्तींचा अनुभव तिथे मांडला होता ते दोघं जास्तीत जास्त तिशीत असणार आहेत. (आजकालच्या सभोवतालच्या परिस्थितीनुरूप काढलेला हा वयाचा अंदाज.) नुकतीच आयुष्याची सुरुवात असताना हे असं निर्लेप असणं मला तरी फार अस्वस्थ करणारं वाटलं. भावनेच्या भरात वाहावून जाणे जरी अपेक्षित नसले तरी वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेणे, त्यात भिजून जाणे, त्या व्यक्त करणे हे सर्व किती स्वाभाविक वाटते. कदाचित त्यामुळे हे असं कोरडेपण मला अंगावर आल्यासारखे वाटले.