अळीवाचे लाडू
माझ्या आईच्या माहेरी खूप मोठं कुटुंब. मला ५ मावश्या आणि २ मामा. त्यातली एक मावशी त्या मानाने जवळ राहायची आणि म्हणून आमचं खूप येणं-जाणं होतं. आम्ही मावशीकडे जायचो तसंच ती पण आमच्याकडे यायची. तिच्या घरापासून बस स्टॅन्ड साधारण ५-७ मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे आमच्याकडे यायच्या एसटीच्या वेळेआधी १० मिनिटे घरातून बाहेर पडले तरी चालायचे. त्यात ती गाडीत जागा पकडण्यासाठी माझ्या मावसभावाला एसटीच्या मागच्या खिडकीतून चढायला लावायची. तर ह्या सगळ्या गडबडीत तिला आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून आणायच्या असायच्या. निघायच्या पाऊण-एक तास आधी वड्यांचे मिश्रण परतायला घेणार आणि निघायच्या जेमतेम आधी त्याच्या वड्या पाडून आमच्यासाठी डब्यात घालून आणणार. वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करणे तिचा हातखंडा. त्यामुळे वड्या हमखास चांगल्याच झालेल्या असणार. पण हे सगळं मी आत्ता का सांगत आहे? तर मावशीचा ह्या बाबतीतला वारसा पुढे चालवायचं काम मला मिळालं आहे. गौरीपूजनाच्या दिवशी मैत्रिणीकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. आणि तिला आवडतात म्हणून मला अळिवाचे लाडू न्यायाचे होते. तरी खवलेला नारळ, गूळ आणि अळीव आद...