हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।
अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे.
त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून माझी मोठी मुलगी आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते. आम्ही दोघी वेगवेगळ्या भागात पुस्तके पाहत होतो. तेवढ्यात तिथल्या तिथेच मला माझ्या मुलीचा फोन आला. ती जिथे होती तिथे ती मला बोलावत होती.
झालं असं की ती तिथे पुस्तकं पाहत असताना, तिथे आलेल्या इतर काही जणी चित्कारल्या 'ई.. हे बघ Mills & Boon!' आणि माझ्या मुलीला तिथे Mills & Boon च्या पुस्तकांचा ढीग दिसला. तो पाहताच तिने मला लगोलग फोन केला. मी तिथे गेले आणि अत्यानंदाने दोन पुस्तके घेऊनच टाकली.
काहींना Mills & Boon हे प्रकरण काय आहे हे माहीत नसेल म्हणून सांगते. रोमँटिक कथांची ही पुस्तके असतात. दर पुस्तक वेगळ्या लेखिकेचं आणि वेगळी कथा असलेलं. सहसा नवतरुणींना आवडणारा हा प्रकार. पण आमच्या घरात उलटी गंगा. माझ्या दोन्ही मुलींच्या दृष्टीने अत्यंत cringe प्रकार. त्यामुळे त्या दोघी ह्या पुस्तकांना हात पण लावणार नाहीत. जैसी जिसकी सोच!
तर आता ऐका माझी आणि Mills & Boon ची कहाणी.
सेमी-इंग्लिश मिडीयममध्ये शिक्षण घेऊन अकरावी-बारावीला SP कॉलेजमध्ये गेले. तिथे आमचे इंग्लिशचे बेलसरे सर म्हणून अतिशय तन्मयतेने शिकवणारे शिक्षक होते. आम्ही कुठल्या प्रकारची पुस्तके वाचावी ह्यासाठी एका तासाला त्यांनी अनेक पुस्तकांची यादी दिली. त्यात त्यांनी आमच्यासारख्या इंग्लिशमध्ये धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना Mills & Boon वाचायचे सुचवले. त्यांनी आवर्जून सांगितले की ही पुस्तके ब्रिटिश पब्लिकेशनची असल्याने त्यातील भाषा व व्याकरण उत्तम दर्जाचे असेल. आम्ही पण अगदी प्रामाणिकपणे लिहून हे नाव लिहून घेतले. पण त्याच वेळी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली मुलं मात्र टिंगल केल्यासारखी हसत होती. आम्हाला काही कळलं नाही. आणि तो विषय तेवढ्यापुरता संपला.
बारावी झाल्यावर इंजिनीरिंगसाठी संगमनेरला जावं लागलं. १९९५ साली केबल टीव्हीचे चॅनेल पण जेमतेम सुरु झाले होते. फोन फक्त लँडलाईनच. कंप्युटरतर 286 वगैरे प्रोसेसर असलेले फक्त कॉलेजच्या लॅबमध्ये दिसणारे. त्यात आमचं होस्टेल in-time संध्याकाळचे ६:३० चे असायचे. मग रिकाम्या वेळात उद्योग करायचा काय हा मोठा प्रश्न! (अभ्यास करावा हे काही सुचतही नव्हते आणि जमतही नव्हते.)
ह्या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे पुस्तकं. म्हणजे अभ्यासेतर पुस्तकं वाचणे. हॉस्टेलमध्ये कोणी ना कोणी पुस्तकं घेऊन यायचं. आणि ती मिळवून वाचायची असा अगदी आवडता उद्योग होता. माझ्या बरोबरच्या मुली मुख्यत्वे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या असल्याने हॉस्टेलमध्ये येणारी पुस्तकं इंग्लिशच असायची. तिथूनच मला इंग्लिश पुस्तक वाचनाची आवड लागली. त्यामुळे हॉस्टेलमध्ये आलेलं प्रत्येक पुस्तक आपण वाचलंच पाहिजे हा दंडक होता.
अश्या ह्या पुस्तकांमध्ये अर्थातच Mills & Boon ची अनेक पुस्तकं असायची. बारावीत असताना ज्या पुस्तकांचे बारावीत असताना नुसते नाव ऐकले होते ती आता वाचायला सुरु केली. माझ्याकडे येणारी बहुतांशी पुस्तकं माझी मैत्रीण अनुप्रियाच्या मार्गे येत असत. म्हणजे बरीचशी पुस्तकं तिच्याकडे यायची आणि तिच्याकडून घेऊन मी नंतर वाचायची.
तिचं वाचून झाल्यावर आपण कधी वाचणार ह्या कल्पनेने जीव कासावीस व्हायचा. पण अनुप्रियाला लवकर झोपायची सवय होती. आणि रात्री आम्ही आमच्या रूम्सना आतून कड्या न लावता झोपायचो. त्यामुळे १०:३० - ११ ला अनुप्रिया झोपली की हळूच तिच्या खोलीत जायचं आणि पुस्तक घेऊन यायचं. एक Mills & Boon चं पुस्तक वाचून संपवायला मला साडेतीन - चार तास लागायचे. तसं ते वाचून संपवायचं आणि सकाळी कॉलेजला जायच्या आधी तिला नेऊन द्यायचं असा उद्योग सुरु केला. अशी किती पुस्तकं वाचली त्याला सुमारच नाही.
ही पुस्तकं वाचून माझी इंग्लिशची शब्दसंपदा वाढली. व्याकरण कळलं. कॉलेजच्या फुलपाखरी दिवसांना गुलाबी रंग लाभला.
अगदी आता आणलेलं पुस्तक वाचल्यावरही, त्या रात्री मी स्वप्नात माझ्या होस्टेलची, त्या दिवसांची सैर करून आले.
त्यामुळे 'ई... Mills & Boon' म्हणणाऱ्यांना इतकंच म्हणेन 'हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।'
P.C. Internet
Comments
Post a Comment