आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर

खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे.

 

इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे. आमचा इस्लामपूरला जेमतेम १० महिन्यांचा मुक्काम होता. त्यामुळे तिथल्या माझ्या आठवणी फारच मर्यादित स्वरूपाच्या आहेत. पण बाबांबरोबर जी फिरस्ती झाली त्यातला हा एक टप्पा होता. आणि आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, जागा काही कारणाने आणि आपलं परस्परांप्रती काही देणे असते म्हणून येतात. तसाच आमच्या आयुष्यातील इस्लामपूरचा टप्पा.

 

आईबाबांनी आधीच येऊन एक घर भाड्याने घेतले. जराशी गावाबाहेर असलेली ती बंगल्यांची कॉलनी होती. त्या कॉलनीमधला दादांचा प्रशस्त बंगला आणि  त्यातला एक फ्लॅटसारखा भाग आम्हाला भाड्याने मिळालेला. दादा म्हणजे राजकारणातले एक मोठे प्रस्थ होते. बहुतेक त्या कॉलनीमधला तो सर्वात मोठा बंगला असेल. मुख्य गेटमधून आत चालत येताना डाव्या हाताला मोठी बाग होती. बागेत बरीच झाडे होती. त्यातल्या त्यात केळाची झाडे मला आठवत आहेत. तर उजव्या हाताला एक आऊटहाऊस होते. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांसाठी राहायला.   

 

गेटमधून साधारण ३०-४० फूट आत आल्यावर बंगल्यात प्रवेश. खालचा संपूर्ण मजला त्यांच्याकडे होता. आणि वरच्या मजल्यावर २ फ्लॅटसारखी स्वतंत्र घरे होती. दादांचं खालच्या मजल्यावरचं घर म्हणजे २ प्रचंड मोठे हॉल, मोठे स्वयंपाकघर, स्वतंत्र डायनिंग हॉल, एक गेस्टरूम आणि ३ बेडरूम्स आणि एका हॉलला लागून रक बंदिस्त व्हरांडा. दोन हॉलपैकी एक हॉल खास त्यांच्या राजकीय भेटीगाठींसाठी होता. मग वरच्या मजल्यावर २ बेडरूम, हॉल, किचनचे दोन स्वतंत्र फ्लॅट. त्यातला एक आम्हाला भाड्याने मिळाला होता. आमच्या फ्लॅटला खूप मोठी गच्ची होती. कारण त्या गच्चीखाली त्यांचा एक मोठा हॉल होता. आमच्या घराचे स्वयंपाकघर खूपच मोठे होते. स्वयंपाकघराला लागून एक बाल्कनी होती. आणि आतल्या एका बेडरूमला जोडून अजून एक बाल्कनी होती. मला सुरुवातीचे काही दिवस तर घरातल्या घरात हरवायला व्हायचं. हे फार हास्यास्पद वाटेल पण खरंच मला कुठून कुठे गेलो म्हणजे घराबाहेर पडू किंवा आतल्या खोलीत जाऊ हे कळायचेच नाही.


दादांचं कुटुंब म्हणजे चार मुलगे, चार सुना आणि ५ नातवंडे. एक लग्न झालेली मुलगी देखील होती. त्यांची नातवंडे साधारण ५-६ वर्षांची आणि त्या खालील वयाची होती. पण स्वतःला संबोधताना 'आम्ही' असं संबोधत असत. त्या लहान लहान मुलांची नावं पण युवराज, हर्षवर्धन अशी भारदस्त होती. आम्हाला फार गंमत वाटायची. दादांची बायको म्हणजे घरमालकीणबाईंना दादीमाँ सगळे म्हणायचे. दादीमाँ, त्यांच्या सुना अश्या सगळ्यांच्या डोक्यावरून पदर असायचा. (खेडला आमचे घरमालक मारवाडी होते आणि त्यांच्या घरातील बायका पण डोक्यावरून पदर घेत असत. पण हे वातावरण वेगळं होतं.) आम्ही पहिल्या दिवशी तिथे पोचलो तेव्हा त्यांनी आम्हाला जेवायला बोलावले होते. 

 

इस्लामपूरला आलो तेव्हा माझी सर्वात मोठी बहीण बारावीला, मधली बहीण नववीला, भाऊ आठवीला आणि मी पाचवीला असे होतो. आमच्या शाळा-कॉलेजच्या प्रवेशाचे पण काम केले होते. आम्हा शाळेत जाणाऱ्या भावंडांना इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर मध्ये प्रवेश मिळाला होता. मला ५वी अ तुकडीत प्रवेश मिळाला होता. आम्ही साधारण शनिवारी वगैरे तिकडे पोचलो असू. त्यामुळे रविवारी शाळेला जायचा रस्ता, शाळेतला वर्ग कुठे आहे हे बघायला गेलो. शाळेची इमारत कशी तर उलट्या U सारखी, एकमजली आणि वर कौलं असलेली. पूर्ण शाळेत चक्कर मारली पण ५वी अ चा वर्ग काही कुठे सापडेना. ५वी ब चा वर्ग दिसला तो बघून ठेवला.


घरापासून शाळा चालत १०-१५ मिनिटांच्या अंतरावर होती. पहिल्या दिवशी शाळेत गेले आणि ५वी ब च्या वर्गात जाऊन बसले. बहुतेक प्रार्थना वगैरे झाल्यावर एक पाटणे नावाची मुलगी मला शोधत आली. ती मला म्हणाली की, 'अगं, आपला वर्ग दुसरीकडे आहे.' आणि मला माझ्या वर्गात घेऊन गेली. आम्ही एकमेकींना नावे वगैरे विचारली. मी तिला पाटणे असं संबोधायला सुरु केले. तर तिने विचारले की तू आडनावाने का हाक मारत आहेस? नावानेच बोलाव. पण नेमकं अजूनही तिचं नाव काही मला आठवत नाहीये आणि फक्त आडनावच लक्षात आहे. तर वर्ग न सापडण्याची गंमत अशी होती की आमचा वर्ग शाळेच्या इमारतीच्या एका कोपऱ्यात होता. आणि त्याला बाहेरून एक मोठे दार होते. त्यातून आत गेले की समोर मुख्याध्यापकांचे कार्यालय आणि डावीकडे आमचा वर्ग अशी रचना होती. त्यामुळे आदल्या दिवशी जेव्हा शाळा बघायला गेलो तेव्हा बाहेरचे दार बंद असल्याने आत वर्ग आहे हे लक्षातच आले नव्हते.


 

शाळा सुरु झाली. नवीन ओळखी होऊ लागल्या. फारसे कोणी आठवत नाही. ३-४ जणीच आठवतात. वर्गातलीच एक मुस्लिम मैत्रीण घराजवळ राहत होती.  तिच्या घरी गेलेले तसेच खेळलेले आठवते. अजून एक वर्गमैत्रिण होती. तिचं घर शाळेच्या वाटेवर होतं. तिची आठवण म्हणजे तिला '' म्हणता यायचा नाही. ती '' ऐवजी '' म्हणायची. तिच्या वडलांचे नाव हंबीरराव होते. तर ती हंबीळळाव म्हणायची. आणि बहुतेक तिचीच लहान बहीण होती तिला '' म्हणता यायचा नाही तर ती '' ऐवजी '' म्हणायची.                

 

ती मुस्लिम मैत्रीण ज्या घरात राहत होती त्याच्या अगदी शेजारी एक दलदल होती. म्हणजे एक बऱ्यापैकी मोठा खड्डा आणि त्यात कायस्वरूपी पाणी साठलेले असे आणि त्या पाण्यावर शेवाळ तयार झालेले हते. तेव्हा कोणी तरी सांगितले होते की त्याच्यात चुकून पाय जरी गेला तर आपण कायमचे आत जाणार. एक प्रकारची भीतीच वाटायची. अशीच एक दलदल शाळेच्या जवळ पण होती बहुतेक. अजून एक आठवण म्हणजे शाळेच्या जवळ काही धोत्र्याच्या झाडांसारखी झाडे होती. त्या झाडांवर विशिष्ट प्रकारचे किडे दिसायचे. आम्ही त्यांना काचीकिडे म्हणायचो. ते किडे खूप रंगीबेरंगी आणि चमकणारे असायचे. आम्ही त्यांना पकडून काड्याच्या पेटीत ठेवायचो. 

 

५ वीत असताना मराठीच्या पुस्तकात एक धडा होता. एक कोणी तरी होते त्यांना विविध आकाराचे दगड गोळा करायची आवड होती. त्यांच्या संग्रहाचे फोटो पुस्तकात दिले होते. त्यात एका दगडाचा आकार माणसाच्या चेहऱ्यासारखा होता. हा धडा शिकल्यावर वेगवेगळ्या आकाराचे दगड गोळा करायचा नाद लागला. पण अवतीभवती असे काय वेगळे दगड मिळणार ना! थोडे वेगळे दिसणारे, काही गारगोटीचे असे बरेच दगड गोळा केले होते. आणि आमची गच्ची होती तिथे माझा हा संग्रह ठेवला होता. एकदा दादीमाँ आमच्या घराच्या राऊंडवर आल्या आणि ते सगळे दगड गोळा करून फेकून द्यायला सांगितले.


शाळेच्या आठवणीत अजून एक आठवण म्हणजे आम्हाला गणिताला आणि बहुतेक शास्त्राला कित्येक दिवस शिक्षकच नव्हते. माझी सर्वात मोठी बहीण जी बारावीत होती त्यांच्या कॉलेजमध्ये संप असल्याने कॉलेज बंद होते. (ऐन बारावीत नवीन गावात कोणी मैत्रिणी नसताना आणि कॉलेज बंद असताना तिने कसा अभ्यास केला काय माहीत.) तर तिने मला माझं पाचवीचं गणित शिकवलं होतं. आम्हाला NCERT ची पुस्तके होती. म्हणजे अभ्यास पण जास्त होता. तरी ताईने इतकं छान शिकवलं की वार्षिक परीक्षेत मी वर्गात पहिली आले. (आणि माझ्या ताईला गणित विषय आवडत नाही आणि त्यामुळे जमत नाही असे वाटते.) 

 

अजून एक शाळेची आठवण म्हणजे आमचे एक सर होते त्यांची शाळेत खूप दहशत होती. तर त्यांच्याबद्दल माझ्या मधल्या बहिणीची मैत्रीण सांगत होती की त्यांना ब्लू फिल्म पाहताना पकडलं होतं. त्यावेळची माझी ब्लू फिल्मबद्दलची कल्पना म्हणजे तो चित्रपट धुरकट निळ्या रंगात दिसतो आणि काही तरी वाईट असतो. असो.


अजून एक गंमत आठवते. त्या काळी फक्त संध्याकाळनंतरच TV वर प्रक्षेपण सुरु व्हायचे. चित्रहारमध्ये नवीन चित्रपटातील गाणी दाखवायचे. आमच्या घराच्या गच्चीतून काही अंतरावरच्या घरातील TV दिसायचा. TV दिसायचा म्हणजे रंगीत चित्र हलताना दिसायचे. आणि तो TV कसा दिसतो ते बघायला आम्ही घरातला TV सोडून गच्चीत जायचो. तेव्हा पाप की दुनिया नावाचा सनी देवल आणि नीलमचा एक पिक्चर होता त्यातलं चोरी चोरी यूं जब हो' हे गाणं त्या TV वर पाहिलेले आठवते. कारण त्यात खूप रंगीत फिल्टर्सचा वापर केला होता.

 

आमचं पुण्याचं घर बांधून पूर्ण होत होतं आणि आमचा इस्लामपूरमधला मुक्काम आवरता येत होता. घराचं बांधकाम सुरु असताना बिल्डरची पैसे भरण्याची पत्रे येत असत. बाबांनी काही बोलून नाही दाखवला तरी तो ताण जाणवायचा. आमची आई नेहमी म्हणते की बाकी सगळी सोंगं करता येतात पण पैश्याचं सोंग करता येत नाही. असो.

          

असे आठवणींचे अनेक रंगीबेरंगी बिलोरी तुकडे गाठीशी बांधून १९८८ च्या मेमध्ये आम्ही आमचा मुक्काम कायस्वरूपी पुण्याला हलवला.


शाळेचा फोटो: इंटरनेटवरून साभार 

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)