इस मोड से जाते हैं .... (१)




आपल्या आयुष्याची वाटचाल सुरु असताना अशी काही वळणं येतात की स्वप्नातही कल्पना न केलेला रस्ता आपण चालायला लागतो. बापरे, काही गहन तत्त्वज्ञान सांगण्यासाठी केलेला हा पोस्टप्रपंच तर नाहीये ना! तर तसं काही नसून एका अनुभवाची ही गोष्ट आहे. आणि गोष्ट सांगताना ती रंगतदार करायची असेल तर नमनाला घडाभर तेल ओतणे आले.

माझ्या मुलींची शाळा सुरु झाल्यावर सुरुवातीच्या काळात parents-teacher मीटिंगला लोकांना एवढे काय प्रश्न पडतात आणि शिक्षकांशी एवढं काय बोलायचं असतं अशी प्रश्न पडणारी मी. आणि मागच्या वर्षी तन्वी दहावीला असताना PTA मेंबर होऊन शाळा आणि पालकांमधील दुवा होणारी मी, असा माझा पालकत्वाचा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासात शाळेला - त्यांच्या प्रशासनाला येणाऱ्या अडचणी पण लक्षात आल्या. त्यातीलच एक म्हणजे कधी कधी काही कालावधीसाठी शिक्षक उपलब्ध नसणे. त्यामुळे शाळेतील शेवटची PTA मीटिंग झाली तेव्हा मी शाळेत सांगून आले होते की शिक्षकांबद्दल काही अडचण असेल तर मी काही कालावधीसाठी मदत करू शकेन.

आणि नवीन सत्राची शाळा सुरु झाल्यावर खरंच त्यांच्या एक शिक्षिका २ आठवड्यांनी जॉईन होणार होत्या. त्यामुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी मी तेवढे दिवस येऊ शकते का अशी मला शाळेतून विचारणा झाली आणि मी हो म्हटले. तसा माझ्या मनातला चतुर मला म्हणे की 'काय मग, शाळेत A for Apple and B for Ball शिकवायला जाणार का?' (Ref: ३ Idiots movie) अर्थातच अश्या विचारांकडे दुर्लक्ष करून मी शाळेत जाऊ लागले.

मुलांना शिकवणे हा अनुभव जरी नवीन नसला तरी शाळेतील ४० मुलांना शिकवणे हा खरंच एक नवीन अनुभव होता. त्यात माझ्याकडे नववीला Maths आणि दहावीला Physics शिकवायचे वर्ग होते. शिंगं फुटलेली पण अजून पुरती शहाणी नसलेल्या मुलांना हाताळायचे होते. नाही म्हटलं तरी मनावर थोडं दडपण होतं. त्यामुळे मुलांचं पाणी जोखण्यासाठी पहिल्या दिवसाचे तास ओळख करून घेणे ह्यासाठीच खर्ची केले. त्यावरून लक्षात आलं की वाटतो तितका हा प्रकार  अवघड प्रकार नाही.

दुसऱ्या दिवशीपासून शिकवणे सुरु झाले. आणि त्याचबरोबरीने माझे शिकणे देखील. सुरुवातीला ४० मुलांच्या वर्गात आवाज पोचावा म्हणून झालेले मोठ्याने बोलणे तसेच शिकवण्यासाठी तासनतास उभे राहणे हे जरा अवघडच गेले. पण नंतर त्याचीही सवय झाली. तसेच तासिकेतील (lecture/period) काही वेळ मुलांना शांत करून वर्गाची घडी बसवण्यात जायचा. मग उरलेल्या वेळात शिकवून घ्यायचे.      

वर्गात तुम्ही कश्याही प्रकारे शिकवा म्हणजे फार आत्मीयतेने किंवा अगदीच शिकवायचे म्हणून शिकवलेले असे कसेही शिकवले तरी काही मुलं दंगाच करणार, काही मुलं लक्ष देणार आणि काही मुलं आपल्याच विश्वात राहणार. म्हणजे कर्मयोग शिकण्यासाठी तुम्ही भगवदगीता वाचण्याची काही गरजच नाही. मुलं तुम्हाला शिकवतात की तुम्ही तुमचे शिकवायचे काम करा, त्याचं आम्ही काय करायचे ह्याची अपेक्षा ठेवू नका.

ह्याचा मला एक फार गंमतशीर अनुभव आला. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे मोजके दिवस होते आणि त्या दिवसात मला दहावीच्या एका धड्याचा विशिष्ट भाग शिकवून संपवायचा होता. म्हणून एके दिवशी एका वर्गात मी जास्तीचा तास घेतला. त्या दिवशी त्या वर्गातल्या मुलीने मला सांगितले की पहिल्यांदा physics समजत आहे आणि त्याचे प्रश्न सोडवता येत आहेत. मग काय माझा रथ युधिष्ठिराच्या रथासारखा जमिनीपासून वर हवेतच गेला. मग त्याच दिवशी  संध्याकाळी माझ्याकडे क्लासला येणाऱ्या त्याच शाळेतील एका विद्यार्थिनीने सांगितले की तिला त्या वर्गातील मुलांनी सांगितले की फार बोअर केलं physics teacher ने. आणि माझा हवेत तरंगणारा रथ दणकन जमिनीवर आपटला. पुन्हा एकदा कर्मयोगाचा धड्याची उजळणी झाली. असो.  

मुलांनी दंगा करणे, त्यांना शांत करून शिकवायचा प्रयत्न करणे हे हळूहळू जमायला लागले. पण तरीही काही काही मुलं अजिबात दाद द्यायची नाहीत. मग त्यांच्यासाठी एक तंत्र वापरायला सुरु केलं. जे कोणी बोलताना किंवा दंगा करताना दिसेल त्यांना फळ्यापाशी बोलावून मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लावणे किंवा आधीच शिकवलेला एखादा भाग पुन्हा वर्गाला समजावायला सांगायचा. दबंग पिक्चरमध्ये सोनाक्षी सिन्हा जसं म्हणते की 'थप्पड से डर नहीं लागत साब, प्यार से लगता हैं', तसं बाकी रागावण्याचा काही परिणाम झाला नाही तरी ह्या तंत्राने मुलं जरा शांत बसायची.

सुरुवातीला दोन आठवड्यांसाठी शिकवायला गेलेली मी, शाळेत एप्रिलमध्ये पूर्ण महिनाभर शिकवले. अनेक अनुभवांची शिदोरी बांधून मिळाली.


ता. क. 'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त!' कारण गोष्टीच्या ह्या भागात फक्त विद्यार्थ्यांच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे. शाळेत शिक्षक म्हणून काम करताना अविभाज्य असला तरी तो केवळ एक भाग आहे. शाळेतील सहकारी शिक्षिका आणि इतर काही अनुभव हा वेगळा भाग आहे.

क्रमशः            

P. C. CISK Facebook page

Comments

Popular posts from this blog

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)