इस मोड से जाते हैं .... (२)मुली पहिल्यापासून ह्याच शाळेत असल्याने बऱ्याचश्या शिक्षिकांना मी ओळखत होते तसेच त्याही मला ओळखत होत्या. धाकटीच्या दहावीच्या वर्षात PTA मेंबर म्हणून शाळेत अजूनच येणं-जाणं झालं होतं.

पण ३ एप्रिलला जेव्हा शाळेत जाणार होते, तेव्हा टेबलावर ज्या शिक्षकांच्या समोर बसत होते त्यांच्या पंक्तीत बसायचं होतं. नाही म्हटलं तरी थोडी धाकधूक होती. तिथल्या शिक्षिका माझ्या नवीन भूमिकेचा कितपत सहजतेने स्वीकार करतील असं वाटत होतं. पण खरं सांगू मनातली ही शंका क्षणात दूर व्हावी एवढ्या सहजासहजी त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. 

गंमत म्हणजे शाळेतल्या काम कित्येक मावशींनी पण मला ओळखलं. कोणासाठी मी मोठीची आई होते तर कोणासाठी धाकटीची.   

मी फक्त नववी आणि दहावीच्या वर्गांना शिकवणार असल्याने, नववी आणि दहावीच्या शिक्षकांच्या स्टाफरूममध्ये मला जागा मिळाली. आणि इतके दिवस श्रावणी आणि तन्वीची आई असलेली मॅम त्यांच्यासाठी शर्वरी झाले. काहीजणी लगेचच अगं-तुगं म्हणायला लागल्या. तर काही जणी अहो-जाहो करत असल्या तरी एक सहकारी म्हणून मैत्र जपत होत्या.

शाळेची मधली सुट्टी सकाळी ९:३० वाजता व्हायची. सगळ्या शिक्षिका आपले डबे घेऊन टेबलवर बसणार. आपण शाळेत असताना जसा मैत्रिणींबरोबर डबा वाटून खायचो तसं इथे पण असायचं. किंवा अजूनही असतं असं म्हणू. सगळ्याजणी सकाळी सातच्या ठोक्याला हजर होत असताना घरचं आटपून आणि स्वतःचा डबा भरून आणत. त्यातही किती व्हरायटी असायची. मला फारच कौतुक वाटतं सगळ्याजणींच्या उत्साहाचं. डबा खाताखाताच व्हाईसप्रिन्सिपल अनुराधा मॅम एक छोटी मीटिंग घ्यायच्या. एकंदर कामाचा आढावा असेल किंवा इतर काही गप्पा असतील. त्यामुळे एकप्रकारे त्या ग्रुपची मोट बांधली जायची.                             

शिक्षक म्हणून सगळ्या जणींचं एक रूप जे मला मुलींच्या माध्यमातून कळलं होतं, त्यापेक्षा बरंच वेगळं रूप मला अनुभवायला मिळालं. मुलींना शाळेतल्या अशाच काही गमतीजमती सांगायची. तर मुलींना मी सांगितलेल्या गोष्टींवरून त्यांच्या शिक्षकांच्या दुसऱ्या रूपाची कल्पनाच करता यायची नाही. तरी मी घरी फार काही सांगत नसे. कारण साधारण पहिल्याच दिवशी मला वैशालीमॅमने सांगितले की स्टाफरूममध्ये जेव्हा फक्त टीचर्स असतात तेव्हा त्यांनी त्यांची शिक्षकांची झूल काढून बाजूला ठेवलेली असते. त्या तिथे एकमेकींच्या मैत्रिणी असतात. त्यामुळे मैत्रिणी ज्या गमतीजमती करतील तशा त्या करत असतात.

वर्गात शिकवण्याव्यतिरिक्त शिक्षकांना अनेक कामं असतात. त्यांचाही मी अनुभव घेतला. बहुतेक CBSE बोर्डाने सर्व शाळांना नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची एक science quiz घ्यायला सांगितली. साधारण अडीचशे मुलांनी ती MCQ असलेली परीक्षा दिली. ते पेपर अर्थातच शिक्षकांनाच तपासायचे होते. Answer key मिळाली होती. पण वृषाली मॅमने ती उत्तरे आधी तपासून मगच मुलांचे पेपर तपासायचे असे ठरवले. त्यामागे Answer  key मधील उत्तरे चुकीची असतील तर मुलांचे नुकसान नको. मग वृषाली मॅमनेच सगळी उत्तरे मोबाईलवर ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड केली. जेणेकरून तपासणाऱ्या शिक्षकांचे काम सोपे होईल. आणि मग आम्ही पेपर तपासले. ही सर्व प्रक्रिया जवळून पाहणे हा एक वेगळा अनुभव होता.

त्यानंतर नववी-दहावीच्या मुलांचे व पालकांचे ओरिएंटेशन होते. शनिवारी सकाळी आठ वाजता असणाऱ्या ह्या मीटिंगला माझ्या मुलींसाठी मी कधी गेले नव्हते. पण ह्यावेळी एक शिक्षक म्हणून मला यायला सांगितले. त्यामुळे अर्थातच तयार होऊन सकाळी पावणे आठ वाजता मिटींगच्या जागी पोचले. हा पण एक गंमतशीर अनुभव होता. पालक एक-एक करून येत होते आणि attendance sheet वर सह्या करत होते आणि मी टेबलाच्या दुसऱ्या बाजूला होते. ह्या मीटिंगसाठीदेखील शिक्षकांना प्रेझेंटेशन तयार करणे आणि नंतर पालकांसमोर सादर करणे अशी कामे होती. टेबलाच्या पलीकडच्या बाजूने ह्या गोष्टी बघणे हा अजून एक खास अनुभव होता.                       

असाच एक अंगत-पंगतचा अनुभव होता. सकाळी ७ वाजता शाळेत पोचायचं असताना प्रत्येक शिक्षिकेने सगळ्यांसाठी म्हणून एक पदार्थ करून आणला होता. Team spirit, team bonding अजून काय वेगळं असतं ना!

संघभावनेबद्दल बोलायचं झालं तर अजून एक अनुभव सांगते. सुरुवातीच्या काळात मी फक्त ३ आठवडे शाळेत राहणं अपेक्षित होतं. त्यामुळे मी जेवढं शिकवायचं ठरवलं होतं त्याकरता एका वर्गावर तास कमी मिळत होते. त्यावेळी मला स्वधा मॅम आणि संगीता मॅमने त्यांचे तास दिले. संगीता मॅमने त्यांचा तास देणं म्हणजे बहुधा अघटित होतं. कारण वैशाली मॅम मला चेष्टेत म्हणाल्या संगीता मॅमने त्यांचा तास तुम्हाला दिला म्हणजे घरी जाऊन तुम्ही देवासमोर डोकं टेकवा.

अगदी मनापासून हिंदी विषय शिकवताना संगीता मॅम कधी स्वतःचा तास वाया घालवत नसत. पण त्यांनी सुट्टीच्या आधीच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या वर्गातल्या मुलांना ग्राऊंडवर नेले होते.             

असाच एक अर्चनामॅमचा किस्सा. असंच शाळेच्या दिवशी ज्या वर्गात जाऊ त्या वर्गात मुलं ग्राऊंडवर नेण्याबद्दल मागे लागत होती. अशीच मी दहावीच्या एका वर्गावर गेले आणि मुलं मागे लागली. पण सकाळचे ११ वाजून गेलेले असल्याने सरकारी आदेशानुसार मुलांना ग्राऊंडवर न्यायला मनाई होती. तेव्हा अर्चनामॅम त्या वर्गात येऊन मला म्हणाल्या की बाकीचे सगळे वर्ग ग्राऊंडवर जाऊन आले आहेत. फक्त ही मुले गेलेली नाहीत. तुम्ही अनुराधा मॅमशी जाऊन बोला. पुन्हा मी अनुराधा मॅमशी जाऊन बोलले आणि मुलांना बेसमेंटमध्ये खेळायला न्यायची परवानगी मिळाली. इतर वेळी अत्यंत कडक टीचर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्चना मॅमचं हे वेगळं रूप बघायला मिळालं.

जसा TV वरच्या कार्यक्रमांचा Grand Finale असतो तसाच काहीसा माझा शाळेतील कामाचा Grand Finale झाला. २९ एप्रिलला शाळा संपली आणि ३० एप्रिलला शाळेत शिक्षकांची Monthly meeting होती. त्यानंतर शिक्षकांचा सहभोजनाचा कार्यक्रम ठरवला होता. त्या मीटिंगमध्ये प्रिंसिपल मॅमचं वेगळंच रूप दिसलं. अतिशय खेळकर आणि मैत्रीपूर्ण वागणं आणि बोलणं होतं. इतरवेळी शाळेत त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे (मुलं, शिक्षक, सपोर्ट स्टाफ असे सर्वजण) बारीक लक्ष असणार. मुलांवर धाक असणार. पण मनात मुलांबद्दल आणि त्यांच्या सहकारी शिक्षणाबद्दल सहृदयता असणारं रूप त्या दिवशी मला दिसलं.

एक महिन्याचा असला तरी मला समृद्ध करणारा असं हा अनुभव होता. ज्या मुलांना शिकवली ती मुलं, ज्यांच्या बरोबर काम केलं त्या शिक्षिका ह्या सर्वांकडून काही ना काही शिकायला मिळालं.

वयाने नव्हे तर अनुभवाने माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या अश्या शिक्षकांचे आभार मानल्याशिवाय ह्या लेखनाला पूर्तता येणार नाही. त्यामुळे प्रिंसिपल मॅम, व्हाईस प्रिंसिपल मॅम आणि माझ्या सहकारी शिक्षकांचे आभार मानावे तेवढे कमी. भावना मॅम ज्या ऑफिसमध्ये असतात आणि ज्यांच्यामुळे ही संधी मला मिळाली त्यांच्या नामोल्लेखाशिवाय कशी पूर्णविराम देऊ!                                                                     

हा अनुभव घेतल्यानंतर असं वाटतं की कुठल्या वळणावर कुठल्या रस्त्यावर आपण चालू लागू माहित नाही. पण ज्या वाटेवर चालू त्या वाटेवर वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी नक्कीच बांधायला मिळेल. 

 
              

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

का रे भुललासी वरलीया रंगा - कारल्याची भाजी