स्त्री जन्मा तुझी कहाणी (शतशब्दकथा)
सकाळचे साडेदहा वाजत आले होते. अलका घड्याळाकडे बघत तिची घरातील कामे उरकत होती. कामे काही संपता संपत नव्हती. घड्याळाच्या धावणाऱ्या काट्यांशी जणू तिची शर्यत लागली होती. घरातील ही कर्तव्ये काय कमी म्हणून अजून बाहेर जाऊन यायचे होते. सकाळची शाळा संपवून मुलं परतायच्या आत तिला घरी यायचे होते. शेवटी सर्व कामे आटपून आणि स्वतःचे आवरून बाहेर जाण्यासाठी तयार झाली. बाहेर अंगाची लाहीलाही करणारा वैशाख वणवा पेटला होता. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी तिने अंगात सनकोट, डोके अन् चेहरा झाकायला ओढणी आणि डोळ्यावर गॉगल असा जामानिमा केला. गाडीला किक मारून, कर्वेरस्त्यावरून गाडी हाकत ती पोचली. . . . . . . . . सोनल हॉलला. खास कॉटनचे कलेक्शन असलेले प्रदर्शन पाहायला.