Wednesday, May 13, 2015

फोटोफ्रेम आणि बुकमार्क

माझ्या ऑफिस मध्ये नाताळच्या आधी 'सिक्रेट सांता' म्हणून  उपक्रम होता. म्हणजे ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी नावे नोंदवायची. आणि मग प्रत्येकाचं नाव लिहून चिठ्ठ्या बनवायच्या. त्या चिठ्ठ्या टाकून सहभागी असलेल्या प्रत्येकाला चिठ्ठी उचलायला सांगायची. (माझं ऑफिस लहान आहे आणि सहभागी होणारे अजून कमी त्यामुळे ही साधी सरळ पद्धत!) चिठ्ठीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव येईल त्या व्यक्तीसाठी आपण सांता बनून भेटवस्तू द्यायच्या. अर्थात त्या व्यक्तीला समजू न देता. एक प्रकारची गंमत 'Team Building' साठी. 
तर माझ्याच बरोबर काम करणारा रणजीत माझ्या अगदी शेजारच्या जागेवर बसतो आणि आम्हा दोघांचं बरंच जमतं. अगदी १४ वर्षांची generation gap असूनही. तर ह्या खेळात त्याने आणि मी दोघांनीही भाग घेतला होता. चिठ्ठ्या टाकायच्या वेळेस मला तो म्हणे 'Please you be my Santa'. म्हटलं की हे आपल्या हातात कुठे आहे! तर चिठ्ठ्या टाकल्या आणि मी चिठ्ठी उचलली तर नेमकं रणजीतचंच नाव आलं. 
मग त्याला काय भेटवस्तू द्यायच्या ह्याचा विचार सुरु झाला. ऑनलाईन काही मिळते का बघितले पण काही आवडेना. मग विचार केला की आपण स्वतः काही करून दिलं तर! आणि मग त्याच्या साठी म्हणून एक फोटो फ्रेम आणि बुकमार्क बनवला. कित्येक वर्षांनी असे काही करताना मला खूपच आनंद मिळाला त्यालाही मी दिलेल्या भेटवस्तू आवडल्या.  


Friday, May 8, 2015

मोगरा फुलला

आज आमच्या मोगर्‍याच्या झाडावर पहिलं फूल उमललं. कोण कौतुक मला त्याचे!
'मोगरा' माझं अत्यंत आवडीचं फूल म्हणून हौसेने रोप आणले. आज लावू, उद्या लावू करत चालढकल करत राहीले. आणि एक वेळ अशी आली की वाटलं आता हे रोप आपण लावलं तरी रुजणार नाही. अश्याच साशंक मनाने ते रोप लावलं, खतपाणी घातलं आणि उत्सुकतेने ते तगतंय का बघू लागले. आणि खरोखर ते रुजलं आणि त्याच्यावर आज हे फूल उमललं.जणू हे फूल मला सांगतंय की तुझ्या आवडीच्या गोष्टींची रोपं जळून जाऊ देऊ नकोस. थोडा वेळ आणि भरभरून प्रेम दे. तीही अशीच फुलांनी बहरतील.

Monday, November 25, 2013

'माध्यान्न', 'माध्यान', 'माध्यान्य'!...

आजच्या लोकसत्ताच्या आंतरजालीय आवृत्तीमध्ये ही बातमी आहे. बातमीचा सारांश असा आहे की शालेय विद्यार्थ्यांना जे माध्याह्न भोजन दिलं जातं त्यात खाल्लेल्या केकमुळे २०० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

तर ह्या जेमतेम १ ओळींच्या बातमीमध्ये 'माध्याह्न' हा शब्द तीन वेळेस वापरला आहे आणि तीनही वेळेस चुकीचा. एकदा 'माध्यान्न', नंतर 'माध्यान' आणि शेवटी 'माध्यान्य'!

मध्य + अहन् (दिवस) = माध्याह्न ह्या शब्दाची एवढी चिरफाड फारंच त्रासदायक वाटली.  

Monday, January 14, 2013

मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

नमस्कार! सर्वांना संक्रांतीच्या अनेकानेक गोड शुभेच्छा! तिळगुळाची गोडी आपणा सर्वांच्या आयुष्यात सदैव राहो ही मनोकामना. 

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.... :)

**************************************

Tuesday, December 4, 2012

I love you

काल आदित्यने त्याच्या वर्गातल्या आर्याला 'I love you' म्हणलं. मग ती त्याला म्हणाली की माझं तुझ्याशी प्रेम आहे. आणि ते हे एकमेकांशी उभं  राहून बोलत असताना अदितीने ऐकलं  आणि सगळ्यांना सांगितलं. आणि मग सगळे खूप हसले. 

तुम्हाला काय वाटतं. हा किस्सा काय वयाच्या मुलांचा असेल? 
.
.
.
मला वाटतंय की माझ्या काळातला असला असता तर साधारण किमान वय १२-१३ तरी असले असते. अलीकडे ते हळू हळू खाली येत आहे. पण हा किस्सा माझ्या धाकट्या कन्येच्या वर्गात घडला. वय किती तर फक्त वर्षे ५!!!

आज सकाळी मी काम करत असताना तिने मला सांगितलं  की तिच्या वर्गात काल एक गंमत  झाली आणि तिने वर दिलेली घटना सांगितली. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.  त्याला कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेचना. 

भविष्यात काय काय प्रकारचे प्रसंग येणार आहेत याची ही मला नांदी वाटली. प्रश्न उरतो की असे प्रसंग हाताळायचे कसे. आहे काही उत्तर तुमच्याकडे?