Wednesday, January 26, 2011

अमानुष

काल टीवी वर बातमी बघितली - मनमाड जवळ नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना भेसळखोरांनी जिवंत जाळले. मन सुन्न झाले. काय म्हणावे अश्या अमानुष कृत्त्याला!

एक सरकारी अधिकारी कर्तव्यदक्षता दाखवून पेट्रोलमध्ये होत असलेली भेसळ रोखण्याचा प्रयत्न करतो आणि ते गुंड त्यांना जिवंत जाळून ठार मारतात. कदाचित असे कृत्य करत असताना गुन्हेगारांना ठाऊक असते की त्यांना अभय मिळणार आहे. त्यामुळे ते अशी कृत्य करताना कचरत नाहीत.

इतर वेळेस आपण ओरड करतो की सरकारी अधिकारी कर्तव्यदक्षता दाखवत नाहीत म्हणून. परंतु ज्यांनी धाडसाने कर्तव्य बजावायचा प्रयत्न केला त्यांन त्याचे हे फळ मिळावे. राज्यातल्या कायदा आणि सुवूवास्थेची शोकांतिका म्हणायला हवी.

अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्यांना जिवंत जाळले त्यांच्या मागे बायको आणि २ मुली आहेत. सरकारने तत्परतेने २५ लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देऊ केली आहे. पण त्या बाईचा नवरा आणि मुलींचे वडील तर परत येऊ शकत नाहीत.

आणि जे अधिकारी कर्तव्यांची जाणीव ठेवून काम करू इच्छितात त्यांच्या मनात कायम हे भय असणार की कदाचित आपणही ह्या गुंडाराजचे बळी ठरू शकतो. मग त्या व्यक्तींनी सचोटीने काम कसे करावे? 

यशवंत सोनावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारी) ह्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि अमानुषतेची विषवल्ली अजून फोफावू नये हि देवाचरणी प्रार्थना.

Saturday, January 22, 2011

इमानदारी!

इमानदारी हा शब्द जरी घेतला तरी सर्व साधारणपणे आपल्या डोळ्या समोर कुत्रा हा प्राणी येतो. बहुतेक त्याच्या इतकं इमानदार इतर कोणी नसावं! अश्याच एका कुत्र्याचा हा किस्सा आहे. अनेक वर्षं झाली तरी विसर पडत नाहीये.   

माझी एक अगदी जीवलग मैत्रीण. त्यांचा बंगला असल्याने त्यांनी कुत्रा पाळला होता. त्याचा रंग पूर्ण काळा होता आणि अत्यंत ferocious होता तो. त्यांच्या घरातली आणि बाहेरची १-२ माणसे वगळता तो बाकीच्यांच्या अंगावर अगदी धावून जायचा. म्हणजे घराची राखण करण्यासाठी एकदम परफेक्ट. मला तर फार भीती वाटायची त्याची.

पण माझ्या मैत्रिणीचे वडील अचानक म्हणजे साठीच्या आतंच हृदयविकाराने वारले. सगळ्यांसाठी तो खूप मोठा धक्का होता. त्या कुत्र्याने अन्न सोडून दिले. आणि अवघ्या २-३ आठवड्यात तो पण वारला. काय ही निष्ठा...

आज केवळ ही गोष्ट इथे लिहित असताना पण माझे डोळे भरून आले.       

Sunday, January 16, 2011

पेपर क्विलिंग - भेटकार्ड

मला कलाकुसर करायला बर्यापैकी आवडते. त्यातल्या त्यात कागद वापरून विविध वस्तू करायला जास्त आवडतं. त्यातलाच एक प्रकार म्हणजे पेपर क्विलिंग! मला फार आवडणारा प्रकार. फार सुंदर दिसते. करणारे बरेच advanced प्रकार करतात. (internet आपण ते बघू शकतो) माझी कला साधी भेटकार्डे करण्यापुरती मर्यादित आहे.
 
त्यापैकीच एक भेटकार्ड खाली पोस्ट करत आहे. 


Thursday, January 13, 2011

फोर्ट जाधवगडची सैर

पुण्याजवळ सासवड रस्त्यावर विठ्ठल कामतांच फोर्ट जाधवगड म्हणून एक हॉटेल आहे. पूर्वी जाधवांची ती गढी होती. तिचं मूळ स्वरूप जास्तीत जास्त ठेवून त्यांनी एका हॉटेल मध्ये रूपांतर केलं आहे.

मध्ये त्यांच्या हॉटेलच्या मार्केटींगचा भाग म्हणून काही discount देऊन एक वर्षाचं सदस्यत्व देत होते. त्यात बर्याच गोष्टी complimentary पण होत्या/आहेत. असंच काही तरी वेगळा अनुभव म्हणून ते सदस्यत्व घेतलं. त्यातीलच एक भाग म्हणजे तिथे एक दिवस एक रात्र मुक्काम मोफत होता.      
अनायसे मला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टी असते. मुलींना तर काय नाताळची सुट्टी असतेच. आणि सगळ्यांनी एकत्र निवांत वेळ घालवावा अश्या विचाराने नवर्याने पण रजा काढलेली असल्याने एक दिवस तिकडे घालवायचा ठरलं.     

खरं तर पुण्यापासूनचं अंतर आहे साधारण ३५ किलोमीटर. पण अर्ध्याहून अधिक रस्ता हा शहर आणि वर्दळीच्या भागातला असल्याने जायला यायला त्यामानाने बराच वेळ लागला.

पण तिथे पोहोचल्यावर मात्र तुतारी वाजवून जंगी स्वागत झाले. आणि विनाकारण जास्त वेळच्या झालेल्या प्रवासाचा शीण गेला. पूर्वीची गढी आताचं हॉटेल असल्याने त्याचा प्रवेशद्वार दगडी आणि छान मोठा आहे. तिथली receptionist नउवारी साडी नेसून अगदी मराठमोळ्या वेशात होती. तिथल्या काही कर्मचाऱ्यांचा वेश मावळ्यान सारखा होता. माझ्या मुलींसाठी ती एक वेगळीच दुनिया होती.

एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या जवळ जवळ सर्व सुविधा तिथे आहेत. जिम, पोहायचा तलाव, २ प्रकारची restaurants आणि conference hall आणि तत्सम सुविधा.
हॉटेल उभारताना गढीचा जास्तीत जास्त राखण्याचा प्रयत्न केल्याने आम्हाला दिलेल्या खोलीची एक भिंत पूर्ण दगडी होती. आणि त्यामुळे खोली प्रचंड थंड होती. पण छान होती.   


तसा अवतीभवती छोटासा परिसर आहे फिरायला. एक देउळ आहे. चिंचेच्या झाडाला बांधलेले झोके आहेत.

आणि हो! एक वस्तू-संग्रहालय पण आहे. अनेक जुन्या घरगुती वापराच्या, स्वयंपाक घरात लागणाऱ्या अश्या अनेक वस्तू तिथे आहेत.
 
तशी म्हणाली तर छोटीशीच जागा आहे फिरायला जायला. एका दिवसात जाऊन यायला. पण एखाद्या दिवसाचा पूर्ण निवांतपणा अनुभवायला मुकाम करायला काही हरकत नाही!    

Are they twins!!!

मला दोन मुली आहेत. मोठी - वय वर्षे ७ आणि धाकटी - वय वर्षे ३. 
 
मागच्या आठवड्यात आम्ही एका लग्नाला गेलो होतो. तर एका बाईने माझ्या नवर्याला विचारले की "Are they twins ?"
 

आता बहिणीच असल्याने दोघींची चेहरेपट्टी बरीच सारखी आहे. म्हणजे धाकटीच्या जन्मानंतर कित्येक जण म्हणत होते की दोघी मोठ्या झाल्यावर जुळ्यासारख्या दिसतील म्हणून! आम्हालाही वाटतं की मोठ्या झाल्यावर त्या बर्याच सारख्या दिसतील. माझी धाकटी कन्या पण वयाच्या मानाने जरा उंच आहे पण तरीही आत्ता (म्हणजे एवढ्या लहान वयात ४ वर्षांचं अंतर खूप जास्त असताना)  असं विचारणं म्हणजे मला कमालच वाटली

Wednesday, January 12, 2011

Van!!!

माझी मोठी कन्या सध्या दुसरीत आहे. शाळा तशी जवळच आहे. पण van ने येते जाते. सकाळी सकाळी ७:३० वाजता तिची van येते. तसं जरा लवकरच असल्याने तिच्याच्याने उठणं होत नाही आणि त्यामुळे आवरणं.
 
तरी नशीबाने आमच्या घरातून बिल्डींगचा गेट आणि रस्ता दिसत असल्याने van जरी आली तरी van च्या काकांना थांबवता येतं. आणि van च्या होर्नचा आवाज अगदी स्वयंपाकघरापर्यंत येतो. 
 
तर असंच एक दिवस कन्या तयार होउन निघायच्या बेतात असताना मला हॉर्नचा आवाज आला. पण जरा van च्या कर्णकर्कश्य पेक्षा थोडा नाजूक वाटला. त्याला खिडकीपाशी जाउन सांगणं आवश्यक होतं कि कन्या खाली उतरतच आहे आणि थांब म्हणून. म्हणून घाईघाईने खिडकीपाशी गेले आणि खाली वाकून van ला नजर शोधू लागली तर van काही दिसेना. तिचे van चे काका एका वेगळ्याच कारपाशी उभे राहिलेले होते. 
 
अजून बारकाईने पाहिले तर ती होंडा सिविक होती आणि त्यात शाळेची मुलं पण होती. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला आणि काकांना विचारलं की कोणाची कार आहे म्हणून! तर ती त्यांच्या भावाची कार होती/आहे. आणि ते पण पांढऱ्या नंबरप्लेटवर काळे नंबर असलेली म्हणजे खाजगी वाहन.
 
मला माहित होते की त्या van च्या काकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण होंडा सिविक स्वतःची असणे म्हणजे मला फारच गंमत वाटली. :)         

Monday, January 10, 2011

अजून एक चित्र

डिसेम्बेरच्या शेवटच्या आठवड्यात आम्हाला ऑफिसला सुट्टी असते. त्यामुळे ते जवळ जवळ ८-१० दिवस फक्त मुली आणि घर ह्यांच्यातच घालवले. त्यामुळे ब्लोग जरा दुर्लक्षित राहिला. त्यामुळे ही खूप दिवसांनंतरची हजेरी.
चित्रकलेचा क्लास अर्थातच चालू आहे. आता जस-जसे दिवस जात आहेत तस-तसे माझी गुरु मला चित्रकलेतली वेग-वेगळी तंत्र शिकवत आहे. हे चित्र त्यातलाच एक भाग. बर्याच त्रुटी राहिल्या आहेत. पण अजून जमेल ही आशा आहेच...
बघा तुम्हाला कसं वाटतंय हे चित्र ते!