Friday, March 25, 2011

पोलीसमामा

आज ऑफिस मधून निघाल्यावर खूप दमल्यासारखा वाटत होतं. आणि तरीही काही काम पूर्ण झालंय असं वाटत नव्हतं. Performance measurement साठीचं self -assessment manager ने आज पर्यंत भरून ठेवायला सांगितलं होतं ते पण झालं नव्हतं.  अगदी कंटाळून गेल्यासारखं झालं होतं.    

मग घरी यायला निघाले तर युनिवर्सिटी सर्कल पाशी पोहोचल्या पोचल्या सिग्नल लागला. त्यामुळे गाडी सर्वात पुढे होती. जवळ जवळ २ मिनिटांचा सिग्नल असल्याने मग गाडी बंद करून निवांत इकडचं तिकडचं निरीक्षण चालू होतं. आणि आमचा सिग्नल सुटायला जेमतेम ४० सेकंद उरले असतील आणि औंध रस्त्याने शिवाजी नगर कडे जाणारा एक टेम्पो अचानक उजवीकडे पाषाण रोडला जाण्यासाठी वळला. आणि युनिवर्सिटीच्या गेटच्या बाहेर ट्राफिक पोलीस होते. त्यांनी त्या टेम्पोला थांबवण्यासाठी हात केला. परंतु तो टेम्पो न थांबता पुढे जाऊ लागला. मग त्यांच्यात एक इन्स्पेक्टर होता तो पळत त्या टेम्पोच्या मागे जाऊ लागला. तसे युनिवर्सिटी गेट ते पाषाण रोडची बाजू बरेच अंतर आहे. आणि ती इन्स्पेक्टर तसा बराच सुदृढ होता. पण त्याने पळत पळत जाऊन त्या टेम्पोला गाठले आणि त्याला थांबवले.

सगळे जण ही गंमत बघत होते. मला पण त्या मामांनी पळत जाऊन त्या टेम्पोला पकडणे अनपेक्षित असल्याने मजा वाटली. आणि ऑफिसमधून बाहेर पडताना असलेला ताण-तणाव त्या fit-n-fine मामांना बघून विसरून गेले. 

Tuesday, March 8, 2011

२१ दिवस - एक सवय

मागच्या वर्षी आमच्या कंपनी मध्ये एक ट्रेनिंग झाला होतं. Behavioural training! त्यात आमच्या ट्रेनरने बर्याच गोष्टी सांगितल्या. त्यातली एक गोष्ट होती - एखादी सवय अंगी बाणवण्यासाठी ती गोष्ट रोज अशी सलग २१ दिवस जाणीवपूर्वक करायची. असे करण्याने ती सवय तुमच्यात रुजते. म्हणजे तुमच्या मेंदूच्या एका भागाशी थेट कनेक्शन होते म्हणे. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट आपोआप नियमितपणे करू लागता म्हणजेच ती सवय तुमच्या अंगी बाणली जाते.

जसे एखादे ट्रेनिंग संपले की त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी आपण आचरणात आणायचं ठरवतो तसंच हे ट्रेनिंग संपल्यावर सुद्धा ही गोष्ट करायची ठरवली होती. कधी ऑफिसला वेळेवर पोहोचण्याचा नेम धरायचा ठरवला तर कधी नियमित व्यायाम करायचं ठरवलं. पण ३-४ दिवसातच उत्साह मावळायचा आणि पहिले पाढे पंचावन्न!  

मग असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या पुस्तकी गोष्टी आहेत आणि त्या असल्या ट्रेनरने फक्त शिकवायच्या. आणि आपण तेवढ्या पुरतं ऐकून सोडून द्यायच्या. पण मनात कायम असे विचार येत राहायचे की आपण साधी एक सवय अंगिकारू शकत नाही!

आणि मग काय एक दिवस असंच आलं मनात आणि ठरवून टाकलं की नियमित व्यायाम करणे ही सवय आपण आपल्याला लावून घ्यायची. व्यायाम करणे आणि त्याचे फायदे आपल्याला कितीही ठाऊक असले तरी आळशीपणा मला कायम त्यापासून कायम प्रवृत्त करायचा.

पण तरीही ठरवलं आणि एक दिवस उठले आणि ३ सूर्यनमस्कार घातले आणि १० मिनिटे बाहेर फिरून आले. ३ सूर्यनमस्कार म्हणजे काहीच नाही. आणि फिरायला जायची वेळ काय तर सगळे डबे बनवून, मोठीला शाळेत पाठवून आणि नवर्याला चहा करून दिला की मग ८:१५ ला बाहेर फिरायला पडायचं. मनात विचार यायचा की ८:१५ ही काय फिरायची वेळ आहे का? कित्येक लोकं तर कंपनीची बस पकडायची म्हणून पूर्ण तयार होवून बाहेर पडलेले दिसायचे. पण मनाशी खूणगाठ बांधली की सुरुवात करताना मी किती सूर्यनमस्कार घालते आणि किती वाजता फिरायला बाहेर पडते हा विचार करायचा नाही. फक्त नियमित पणे ह्या गोष्टी चालू ठेवायच्या हे ठरवलं. एकदा तर असं झालं की सगळं उरकायला खूप उशीर झालं आणि मी ८:४५ वाजता फिरायला म्हणून बाहेर पडले. तर अक्षरशः रस्त्यावर फिरायला म्हणून कोणीही नव्हते! :)

असं करता करता ५-६ दिवस उलटून गेले आणि व्यायाम करायची सवय अजून टिकली होती. मग ठरवले की लवकर उठायचं आणि नवरा जिमसाठी म्हणून बाहेर पडायच्या आधी म्हणजे ६:१० - ६:१५ च्या आधी घरी परत यायचं. मग तसं करायला चालू केलं आणि हळू हळू सूर्यनमस्कार सुद्धा वाढवायला चालू केलं.

अरे हो! माझी सवय टिकून राहावी म्हणून मी अजून एक गोष्ट केली. आणि ती म्हणजे मी माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर फक्त दिवसांची गणना - पहिला दिवस, दुसरा दिवस असं टाकायला चालू केलं. हे करण्यामागे कारण हे होतं असे दिवस मोजायला लागले की मित्रमंडळी चौकशी करणार आणि कारण सांगितलं नाही की त्यांना उत्तर मिले पर्यंत चौकशी करत राहणार. आणि ती दिन-गणना चालू ठेवण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करावा लागणार. पूर्णतया लोकांना सांगण्यासाठी म्हणून नाही तरी किमान १-२ दिवस तरी असे होते की ती दिन-गणना चालू ठेवण्या साठी न कंटाळता व्यायाम केला.

असेच दिवसामागून दिवस उलटत गेले आणि २१ दिवसाचा नेम पूर्ण होईपर्यंत रोज १० सूर्यनमस्कार आणि १५ मिनिटे चालणे एवढा व्यायाम मी रोज करू लागले होते किंवा अजून आहे. २१ दिवसांचा हा जो माझा कोर्स (?) आहे तो पूर्ण होऊन जेमतेम १-२ दिवस झाले आहेत. म्हणजे पिक्चरचा जसा 'The End' दाखवतात तसा हा प्रकार आहे. पण खरी गोष्ट त्या पुढे चालू होत असते. तसंच २१ दिवस जसा नेटाने मी व्यायाम केला तसाच (२१ सवय अंगी बाणणे ह्या पेक्षा वरचढ माझा आळशीपणा ठरू शकतो अशी भीती वाटत असल्याने) ह्या पुढेही मला चालू ठेवायचा आहे.

तर बघा तुम्हाला अशीच एखादी सवय अंगिकारायची आहे का ते. आहेच आपला २१ दिवसांचा कोर्स! 

Sunday, March 6, 2011

स्नेहसंमेलन - २

काल झालेले माझ्या धाकटीचे स्नेह-संमेलन हा एक अत्यंत आनंददायी, मनाला सुखावणारा अनुभव होता. आधीच्या पोस्टमध्ये लिहिलं त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि त्याचं त्या सुंदर कार्यक्रमाच्या स्वरूपामधलं ते फळ बघून खरच खूप आनंद झाला.

पण सर्वात जास्त आनंददायी गोष्ट म्हणजे माझ्या कन्येने केलेला डान्स, तिची देहबोली, तिचं मुलीसारखं दिसलेलं गोंडस रूप. (माझी धाकटी कन्या अगदी Tom-boy आहे. म्हणजे ती कपडे फक्त शर्ट आणि pant घालते. केसांना क्लिप, रबर लावणे तर दूरच पण चुकूनही भांग सुद्धा पाडत नाही.)

तिला प्रथम तिच्या शिक्षकांनी 'माकारीना' ह्या गाण्यावरच्या डान्स मध्ये घेतलं होतं. पण आधी सांगितलं त्याम्प्रमाणे तिची देहबोली, तिचं आत्मविश्वास बघून त्यांनी तिला 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' ह्या गाण्यात सुद्धा तिला घेतले. त्या गाण्यात सर्व प्राणी आणि पक्षी सुखाने एका जंगलात नांदत असतात आणि अश्या ह्या जंगलात एक मुलगी बागडत असते. तर ती मुलगी माझ्या धाकट्या कन्येने साकारलेली. आणि सर्वात शेवटी सर्व लहान मुलांचा हात धरून पर्यावरण वाचवा हे सांगणारा बोर्ड हातात घेणे हे काम तिला दिले होते. ती स्टेजवर खरोखरच आली तेव्हा आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. कारण ती छान आत्मविश्वासाने स्टेजवर वावरत होती आणि तालावर नाचत देखील होती. (आम्हाला घरी तिचं डान्स बघून तिची नाचाची शैली सनी देओलची वाटायची.) ही तर आमच्या साठी एक झलक होती.

त्यानंतर तिचा मुख्य डान्स होता. आणि त्यात तिने सगळ्या स्टेप न विसरता तालात केल्या. ती तिच्या वयाच्या मानाने बरीच उंच असल्याने असं वाटत होतं की कोणी ४-५ वर्षांची मुलगी त्या ३ वर्षांच्या मुलींबरोबर नाचत आहे. शेवटी शेवटी तर इतर मुली जेव्हा स्टेप विसरत होत्या तेव्हा त्यांच्या शिक्षिका त्यांना विंगेतून माझ्या कन्येकडे बघून करा असं सांगत होत्या. माझी मोठी लेक तर म्हणाली की मला माहीतच नव्हतं की ही इतका छान डान्स करते. मला तर इतका आनंद झाला की तिचा हा डान्स बघता बघता माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.

आणि ह्या सर्वांवर शेवटची कडी म्हणजे तिला सर्वात आज्ञाधारक आणि मदत करणाऱ्या विद्यार्थ्याचं बक्षीस मिळालं. अक्षरशः कृतकृत्य वाटणे, धन्य होणे अश्या अनेक वाक्प्रचारांचा प्रत्यय आला.
घरात ती धाकटी असल्याने अजूनही मला बाळासारखीच वाटते. आणि तिथे सतेज वर ती इतकी समजूतदार वाटत होती की विचारू नका! तिच्या शिक्षकांनी सुद्धा बक्षीस देताना बक्षीस देण्यामागची कारणीमिमांसा देताना शाळेत शिक्षकांच्या सूचनांच पालन करणे तसेच ती शाळेत तिच्या पेक्षा लहान मुलांप्रती दाखवत असलेला समजूतदारपणा ह्या बद्दल सांगितलं.

प्रत्येक आई-वडलांना आपला मूल फार special वाटत असतं. तसेच आम्हीसुद्धा. परंतु शाळेकडून तशी पावती मिळणं म्हणजे आम्हाला 'सातवे आसमान में' गेल्यासारखं वाटत होतं किंवा अजूनही वाटत आहे. आणि सगळी कडे दवंडी पिटवून सर्वांना हे सांगावंसं वाटत आहे. (अर्थात आत्ता मी हेच आहे :P)

Saturday, March 5, 2011

स्नेह-संमेलन

कालच्या पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे आज आमच्या शेंडेफळाच्या शाळेचे स्नेहसंमेलन होते. आमच्या सर्वांची वरात (५ मोठी आणि ३ लहान अशी ८ माणसे एका गाडीत!) ९ वाजता टिळक स्मारकला पोहोचली. तर टिळक स्मारकचा परिसर लहान-लहान मुले आणि त्यांचे पालक, आज्जी-आजोबांनी फुलून गेला होता. (माझी धाकटी जिथे जाते ती शाळा एक playgroupची शाळा आहे. वय वर्षे १.५ ते जास्तीत जास्त ३.५ पर्यंत.) 
माझी कन्या एका डान्स मध्ये होती. त्यासाठीचा केवळ तिचा फ्रॉक शिवून न झाल्याने तिला फक्त चेहर्याला मेकप करून तिच्या शिक्षकांच्या ताब्यात द्यायचं होतं. ९ पर्यंत तिथे पोहोचायचे असल्याने तिचे प्रातर्विधी, आंघोळ आणि नाष्टा एवढे आटोपून कसेबसे तिथे पोहोचल्याने मेकपचा कार्यक्रम तिथे चालू झाला. मग एकदम गुलाबी गुलाबी गाल, गडद गुलाबी ओठ असा मेकप करून तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केलं.      

मग साधारण पावणे दहाच्या सुमारास कार्यक्रम चालू झाला. आधी त्यांनी कार्यक्रमाची रूप-रेषा समजावून सांगितली त्याप्रमाणे एकूण ८ डान्स होते. आणि सर्वात शेवटी बक्षीस समारंभ. कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर मूळ कार्यक्रम चालू झाला.

सर्वात प्रथम 'welcome song' होते. त्यात बहुधा अगदी लहान म्हणजे २ वर्षाच्या आतील मुलं होती. आणि तो कार्यक्रम म्हणजे ७-८ मुलं एका रांगेत झुक-झुक गाडी सारखे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. आणि त्यांच्या एका बाजूला 'WELCOME' अशी अक्षरे एक-एक करून लावली होती. आणि एक संगीत चालू झालं आणि ती मुलं स्टेजला एक चक्कर मारून पुन्हा विंगेत गेली. तसं पाहायला गेलं तर केवढा सोप्पा प्रकार होतं. पण एवढ्या लहान मुलांकडून एवढ्या, मोठ्या स्टेजवर आणि इतक्या प्रेक्षकांसमोर हे करवून घेणं ही एक मोठी बाब होती.

त्याच्या पुढचा कार्यक्रम होता गणेश वंदना! ओंकार स्वरूप हे गाणं आणि एक-एक लहान मुल स्टेजवर येऊन गणपतीच्या फोटोला फुलं वाहून त्यांना सांगितलेल्या जागी जाऊन थांबत होते. मग पुढचा कार्यक्रम पर्यावरणाचे संवर्धन करा म्हणून सांगणारा 'वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी' ह्या गाण्यावर एक डान्स होता. त्यात वेग-वेगळे प्राणी आणि पक्षी एका जंगलात सुखाने नांदत आहेत आणि एक मुलगी त्यांच्यात आनंदाने बागडत आहे असे दाखवले होते.


मग एक शेतकार्यांचा डान्स होता. त्यानंतर माकारीना ह्या गाण्यावर डान्स होता. उंदीर आणि त्याची टोपी ह्याची गोष्ट सांगणारा एक डान्स होता. अजूनही २ डान्स होते. आणि गंमत सांगायची म्हणजे जर एक डान्स २ मिनिटांचा असेल तर २ डान्स मधला ब्रेक ५-१० मिनिटांचा असायचा. त्या सर्व लहान मुलांना गोळा करून स्टेज वर आणणं. त्या डान्स साठी आवश्यक तयारी करणं अश्या सगळ्या गोष्टींमध्ये तेवढा वेळ जायचा. पण एवढ्या लहान वयाच्या मुलांना घेऊन एवढा कार्यक्रम करणे ही खरोखर खूप कौतुकास्पद बाब असल्याने कोणाचीही काहीही तक्रार नव्हती. कारण आपल्याच घरात असलेल्या एखाद-दुसर्या मुलाला आपल्या सूचनांच पालन करायला लावणे किती अवघड असते हे आपल्याला चांगलेच ठाऊक असते.

त्यामुळे त्या सर्व शिक्षकांनी खरच खूप छान कामगिरी बजावली. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन! 

Friday, March 4, 2011

रंगीत तालीम

उद्या माझ्या धाकट्या कन्येच्या शाळेचे स्नेह-संमेलन टिळक स्मारक येथे आहे. त्याची रंगीत तालीम आज तिथेच होती. सकाळी ९:३० ला तिथे सोडायचे आणि १२:३० वाजता परत घेऊन यायचे. टिळक स्मारक म्हणजे घरापासून बर्या पैकी लांब. मग कोणाल सांगणार म्हणून खास सुट्टी काढून त्या मोहिमेवर गेले.

९:३० वाजता तिथे पोहोचलो आणि तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केल्यावर प्रश्न उरला की तीन तास काय करायचे! पहिले अर्धा-एक तास तिथेच जवळ असलेल्या ग्राहक पेठेत वेळ घालवला. आणि थोडी फार खरेदी केली. (थोडी खरोखर गरजेची आणि फार उगाचच अवांतर). पुन्हा प्रश्न उरला की आता काय करायचे.

शेजारीच S.P. कॉलेज आहे. माझं कॉलेज. खरं तर अकरावी आणि बारावी अशी दोनच वर्षे तिथे काढलेली. पण शाळेतल्या शिस्तबद्ध आणि बंधनयुक्त काळानंतरचा पहिला काही काळ तिथे घालवलेला. त्यामुळे बर्याच आठवणी जोडलेल्या. तसं ते कॉलेज सोडून आता जवळा जवळ १५-१६ वर्षे झाली. आणि एकदा बारावीचा रिझल्ट घेतल्यावर कधी तिकडे मी गेलेच नाही.        

मग आज विचार केला की जाऊन तर बघुयात. खरं तर अकरावी-बारावीला कोणी फार कॉलेजला जाऊन बसतं असं नाही. पण तरीही काही काही शिक्षक असे असतात की त्यांचा ठसा उमटतोच. तसेच माझे S.P. मधले मराठी, इंग्लिश, botany आणि फिजिक्सचे प्रोफेसर होते की ज्यांची ह्या न त्या कारणाने अजूनही आठवण राहिली आहे. त्यामुळे आज विचार केला की त्यांच्या पैकी कोणी शिक्षक भेटतायत का बघू. 

कॉलेजच्या गेटपाशी गेले तर तिथे सुरक्षारक्षक होते. मला भीती की मला हटकले आणि जाऊ नाही दिले तर! पण त्यांना मी कॉलेज मध्ये येण्याशी काही देणे-घेणे नव्हते. (कदाचित माझे वय आणि अवतार त्यांना निरुपद्रवी वाटला असावा.) मग थेट तिथल्या सायन्स डिपार्टमेंटला जायला निघाले. जाता जाता वाटेत लॉन दिसले. लेक्चर बुडवून तिथे आम्ही एकतर टाईम पास किंवा जर्नल भरत बसायचो.

तिथून पुढे आले तर केमेस्ट्री डिपार्टमेंटची बिल्डींग लागली. तिथून येणारे ते विविध रसायनांचे वास... तेव्हा केलेल्या केमेस्ट्री practicals ची आठवण देऊन गेले. तेव्हाच्या केमिस्ट्रीच्या एक अगदी तरुण प्रोफेसर होत्या ज्यांना बघण्यासाठी मुलं लेक्चरला बसायची ती आठवण झाली.

मग मी बायोलोजी डिपार्टमेंटमध्ये गेले. तिथे आम्हाला botany शिकवणाऱ्या एक शिक्षिका होत्या त्यांना भेटायचं होतं. फार कडक होत्या. तेव्हा त्यांची खूप भीती वाटायची. पण चांगला शिकवायच्या. त्यामुळे त्यांना भेटावं असं वाटत होतं. पण नेमक्या परीक्षा चालू असल्याने त्या तेव्हा आल्या नव्हत्या. तीच कथा फिजिक्सच्या आमच्या एक प्रोफेसरना भेटायला गेले तर झाली. परीक्षेमुळे त्या पण अजून आल्या नव्हत्या. थोडी रुखरुख वाटली. मग बाकी आमच्या मराठी आणि इंग्लिशच्या प्रोफेसरना भेटायचं नाद सोडून दिला. आणि तिथून सरळ टिळक स्मारकला आले आणि कन्येच्या रंगीत तालीम संपण्याची वाट बघू लागले. असो. 

तर रंगीत तालमीच्या निमित्ताने S.P. मधल्या त्या १५-२० मिनिटांच्या वेळेत १५-१६ वर्षांपूर्वीच्या काळामध्ये सफर करून आले.