रंगीत तालीम

उद्या माझ्या धाकट्या कन्येच्या शाळेचे स्नेह-संमेलन टिळक स्मारक येथे आहे. त्याची रंगीत तालीम आज तिथेच होती. सकाळी ९:३० ला तिथे सोडायचे आणि १२:३० वाजता परत घेऊन यायचे. टिळक स्मारक म्हणजे घरापासून बर्या पैकी लांब. मग कोणाल सांगणार म्हणून खास सुट्टी काढून त्या मोहिमेवर गेले.

९:३० वाजता तिथे पोहोचलो आणि तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केल्यावर प्रश्न उरला की तीन तास काय करायचे! पहिले अर्धा-एक तास तिथेच जवळ असलेल्या ग्राहक पेठेत वेळ घालवला. आणि थोडी फार खरेदी केली. (थोडी खरोखर गरजेची आणि फार उगाचच अवांतर). पुन्हा प्रश्न उरला की आता काय करायचे.

शेजारीच S.P. कॉलेज आहे. माझं कॉलेज. खरं तर अकरावी आणि बारावी अशी दोनच वर्षे तिथे काढलेली. पण शाळेतल्या शिस्तबद्ध आणि बंधनयुक्त काळानंतरचा पहिला काही काळ तिथे घालवलेला. त्यामुळे बर्याच आठवणी जोडलेल्या. तसं ते कॉलेज सोडून आता जवळा जवळ १५-१६ वर्षे झाली. आणि एकदा बारावीचा रिझल्ट घेतल्यावर कधी तिकडे मी गेलेच नाही.        

मग आज विचार केला की जाऊन तर बघुयात. खरं तर अकरावी-बारावीला कोणी फार कॉलेजला जाऊन बसतं असं नाही. पण तरीही काही काही शिक्षक असे असतात की त्यांचा ठसा उमटतोच. तसेच माझे S.P. मधले मराठी, इंग्लिश, botany आणि फिजिक्सचे प्रोफेसर होते की ज्यांची ह्या न त्या कारणाने अजूनही आठवण राहिली आहे. त्यामुळे आज विचार केला की त्यांच्या पैकी कोणी शिक्षक भेटतायत का बघू. 

कॉलेजच्या गेटपाशी गेले तर तिथे सुरक्षारक्षक होते. मला भीती की मला हटकले आणि जाऊ नाही दिले तर! पण त्यांना मी कॉलेज मध्ये येण्याशी काही देणे-घेणे नव्हते. (कदाचित माझे वय आणि अवतार त्यांना निरुपद्रवी वाटला असावा.) मग थेट तिथल्या सायन्स डिपार्टमेंटला जायला निघाले. जाता जाता वाटेत लॉन दिसले. लेक्चर बुडवून तिथे आम्ही एकतर टाईम पास किंवा जर्नल भरत बसायचो.

तिथून पुढे आले तर केमेस्ट्री डिपार्टमेंटची बिल्डींग लागली. तिथून येणारे ते विविध रसायनांचे वास... तेव्हा केलेल्या केमेस्ट्री practicals ची आठवण देऊन गेले. तेव्हाच्या केमिस्ट्रीच्या एक अगदी तरुण प्रोफेसर होत्या ज्यांना बघण्यासाठी मुलं लेक्चरला बसायची ती आठवण झाली.

मग मी बायोलोजी डिपार्टमेंटमध्ये गेले. तिथे आम्हाला botany शिकवणाऱ्या एक शिक्षिका होत्या त्यांना भेटायचं होतं. फार कडक होत्या. तेव्हा त्यांची खूप भीती वाटायची. पण चांगला शिकवायच्या. त्यामुळे त्यांना भेटावं असं वाटत होतं. पण नेमक्या परीक्षा चालू असल्याने त्या तेव्हा आल्या नव्हत्या. तीच कथा फिजिक्सच्या आमच्या एक प्रोफेसरना भेटायला गेले तर झाली. परीक्षेमुळे त्या पण अजून आल्या नव्हत्या. थोडी रुखरुख वाटली. मग बाकी आमच्या मराठी आणि इंग्लिशच्या प्रोफेसरना भेटायचं नाद सोडून दिला. आणि तिथून सरळ टिळक स्मारकला आले आणि कन्येच्या रंगीत तालीम संपण्याची वाट बघू लागले. असो. 

तर रंगीत तालमीच्या निमित्ताने S.P. मधल्या त्या १५-२० मिनिटांच्या वेळेत १५-१६ वर्षांपूर्वीच्या काळामध्ये सफर करून आले.

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)