Saturday, December 11, 2010

MP3

परवा सहजच माझ्या ऑफीस मधल्या सहकार्याला माझा ब्लॉग दाखवत होतेखरं तर तो तेलुगु त्यामुळे माझा मराठीतला ब्लॉग त्याला काही कळणार नव्हतापण तरीही... मग तो मला विचारत होता की कशाबद्दल लिहितेस? Audio coding? मी म्हणाला की टेक्निकल काहीही नाही फक्त अवांतर
मग मी विचार करू लागले की एखाद दुसरी टेक्निकल विषयावरची पोस्ट लिहायला काही हरकत नाही. आणि ज्या तांत्रिक विषयाबद्दल मी लिहू शकते तो फार वेगळा, समजायला अवघड असा काही नाही. कारण आपण ती टेक्नोलॉजी दैनंदिन जीवनात वापरतो. त्यामुळे आजची पोस्ट mp3 के नाम!
गाण्याच्या mp3 फाईल्स आपण आजकाल किती सर्रास वापरतो नाही. डिजिटल audio players आपण सहजच mp3 players म्हणून टाकतो. मला आठवतंय मी कॉलेज मध्ये असताना म्हणजे साधारण ९८-९९ साली माझी एक मैत्रीण एका सीडी मध्ये शेकडो गाणी घेऊन आली होती. फार नवल वाटलं होतं तेव्हा! कारण तोपर्यंत सीडी मध्ये साधारण -१० गाणी असायची. आणि आजकाल आपण बघतो की एका सीडी मध्ये MP3 format मुळे जवळ जवळ १५० - २०० गाणी बसू शकतात.
नक्की हे MP3 प्रकरण आहे काय? तर त्याला टेक्निकल भाषेत CODEC म्हणतात. म्हणजे CODER - DECODER. CODER चे काम असते त्याला मिळालेली माहिती विशिष्ट कोड वापरून कमीत कमी जागेत बसवायची. आणि अश्या कोड भाषेमधली माहिती सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या स्वरूपात आणण्याचे काम असते DECODER चे.

म्हणजेच आपण ज्या mp3 फाईल्स बघतो त्या कोड केलेल्या असतात. आणि जेव्हा एखाद्या प्लेयर वर आपण ती फाईल चालवतो तेव्हा त्या प्लेयर मधला decoder ती फाईल आपल्याला ऐकू येऊ शकेल अश्या format मध्ये बदलून देतो.

तर हे असं सगळं MP3 मुळे कसं घडू शकतं?
आपण आधी जाणून घेऊयात की पूर्वीची सीडी मध्ये ज्या पद्धतीने गाणी लोड केली असायची ती टेक्नोलॉजी काय आहे तेपूर्वी सीडींमध्ये PCM format गाणी लोड केली जायचीत्यामुळे एका मिनिटाच्या गाण्यासाठी जवळ जवळ 10MB जागा लागायचीम्हणजे मिनिटाचे गाणे म्हणजे 50 MB ही एका गाण्यासाठी लागणारी जागा होय. आणि आता जर आपण बघितलं तर दिसेल कि MP3 format मुळे साधारण एखादे गाणे 4-5MB एवढ्याच साइझचे असते.        
ही गोष्ट सध्या करण्यासाठी तसं म्हणाला तर अगदी साधं तत्व वापरलं आहे. ते म्हणजे ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या गोष्टी टाकून देणे. पण मग कुठली गोष्ट आवश्यक आणि कुठली अनावश्यक हे कसं ठरवायचं? त्यासाठी काही नियम वापरले जातात. 
 
कुठलाही आवाज असो तो ऐकण्यासाठी आपण आपल्या श्रवणेन्द्रियाचा वापर करतो. पण त्या अवयवायाच्या पण काही मर्यादा असतात. तसंच आपले कान विशिष्ट आवाजच ऐकू शकतात. आता विशिष्ट आवाज म्हणजे काय तर 20Hz - 20kHz ह्या रेंजमधले आवाज आपण ऐकू शकतो. म्हणजे ही जी मर्यादा दिली आहे त्या बाहेरचे आवाज अस्तित्वात असले तरी ते आपल्याला ऐकू येत नाहीत. म्हणजेच कुठलाही ध्वनी दिलेल्या मर्यादेच्या बाहेरचा असेल तर आपल्या कानांसाठी अनावश्यक होतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा जेव्हा घराची साफ-सफाई करतो तेव्हा आपण अनावश्यक गोष्टी काढून टाकतो. त्यामुळे गरजेच्या वस्तूंना जागा मिळते.
 
अजून एक नियम आहे जो एखादा ध्वनी/आवाज अनावश्यक आहे की नाही ते ठरवतो. आपण जेव्हा खूप गर्दीच्या ठिकाणी असतो तेव्हा सभोवतालच्या मोठ्या आवाजांमुळे आपल्याला दुसर्या व्यक्तीचे बोलणे (जे इतर आवाजाच्या मानाने लहान आवाजातले असते) ऐकू येत नाही. तसेच गाण्यांमध्ये अनेक वाद्ये वाजत असताना एखादा आवाज आपल्या कानांना ऐकू येऊ शकत नाही तेव्हा तो आवाज अनावश्यक होतो.
 
तर जे CODER असतात ते अशी अनावश्यक माहिती गाळून टाकतात आणि आवश्यक माहिती काही सांकेतिक शब्द वापरून कमीत कमी जागेत बसवतात. तसं म्हणालं तर हे आपल्या दैनंदिन आयुष्यामधला तत्त्व पण किती परिणामकारकरित्या वापरलं आहे नाही!

Thursday, December 9, 2010

कौन बनेगा करोडपती - अंतिम भाग

आज कौन बनेगा करोडपतीचा शेवटचा भाग झाला. आजकाल कुठलाही कार्यक्रम फक्त ९ आठवड्यांच्या कालावधीत संपणे हे एक आश्चर्यच आहे.
 
ई TV मराठीवर या गोजिरवाण्या घरात हि सिरीयल जवळ जवळ आठ वर्षे चालू आहे. माझ्या मोठ्या मुलीच्या जन्म आधीपासून. तिच्या कळत्या वयापासून तिला वर्षानुवर्षे चालणारे कार्यक्रम पहायची सवय झाली आहे. त्यामुळे तिला हा कार्यक्रम इतक्या लवकर संपतो हि फारंच तिच्या शब्दात सांगायचं तर एक अनोखी गोष्ट आहे. (बोलीभाषेत हिंदी शब्दांचा वापर हे हिंदी कार्टून बघण्याचे परिणाम आहेत.)
 
त्यामुळे ह्या कार्यक्रमाबद्दल असलेली टीका कि हा एक reality show आहे, काही उत्तरांसाठी एवढे पैसे असली तरी अमिताभ बच्चनची मी die-hard fan असल्याने  हा कार्यक्रम संपला ह्याची मनाला जरा हुरहुर लागली आहे. . 
 
सूत्रसंचालन करताना हा माणूस कोणी इतरांनी लिहिलेले डायलॉग न म्हणता तो उत्स्फूर्तपणे बोलत आहे असे वाटते. आजचा समारोपाचा डायलॉग पण तसाच होता. जणू तो स्वतःचं मनोगत व्यक्त करत आहे असे वाटत होते.    
 
अजून थोडे दिवस हा कार्यक्रम चालवा असे वाटत असताना हा कार्यक्रम संपणे हे त्याचे एक प्रकारचे यश वाटते.  

Wednesday, December 8, 2010

तिळाचे तेल

पुण्यात थंडीचा एवढा जोर आहे की तिच्या पासून बचाव आणि त्यासाठीचे उपाय ह्या शिवाय दुसरं काही सुचत नाहीये. म्हणूनच मग मागची पोस्ट बदामाच्या तेलाबद्दल होती. पण बदामाचे तेल तसे बरेच महाग असते. त्यामुळे त्याचा वापर शक्यतो तोंडापुरताच ठेवला जाऊ शकतो. पण थंडीच्या दिवसात अंग पण बरंच फुटतं. मग त्याच्यावर तिळाचे तेल हा एक घरगुती उपाय आहे.
 
खरंतर त्याकरता पण बाजारात बरेच lotions वगैरे मिळतात. पण माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की अतिउत्साहात मी असल्या सगळ्या गोष्टी विकत आणते आणि वापरायची वेळ आली की कंटाळा करते. मग त्या प्रोडक्टची expiry date उलटून जाते आणि मला ते फेकून द्यावे लागतात. म्हणून मग मला हे घरगुती उपाय स्वस्त आणि परिणामकारक वाटतात.  
 
तर मी सांगत होते तिळाच्या तेलाबद्दल. तिळाचे तेल हे ऊष्ण गुणधर्माचे असते. त्यामुळे थंडीत त्याचा वापर चांगला. त्याचा वापर अनेक पद्धतींनी करता येऊ शकतो. मला २-३ पद्धती माहित आहेत. त्या म्हणजे:
 • रात्री झोपायच्या आधी हातापायांना लावणे. (पण मग काहींना तेलकट अंग घेऊन झोपणे योग्य वाटणार नाही किंवा पांघरूण तेलकट होऊ शकते.)
 • दुसरी पद्धत म्हणजे आंघोळ झाली की हातात थोडे थेंब तिळाचे तेल घेऊन ओल्या अंगावर लावणे. (अंग ओलसर असल्याने थोडे तेल लवकर पसरते.)
 • आणि मला माहित असलेली पण मी स्वतः कधी करून न पाहिलेली पद्धत म्हणजे आंघोळीच्या पाण्यात काही थेंब तेल टाकून त्या पाण्याने आंघोळ करणे.
माझ्या अनुभवानुसार तिळाच्या तेलाचा अजून एक उपयोग म्हणजे एखादा भाग स्नायूंच्या दुखण्याने दुखत असल्यास मालिश केल्यास आराम मिळतो. माझा उजव्या खांद्याचा सांधा एकूण काम, driving आणि दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसून बर्यापैकी दुखतो. मग आंघोळीच्या आधी थोडी तिळाच्या तेलाने मालिश केल्याने बराच आराम मिळतो.

बघा तुम्हाला कितपत फायदा होतो तिळाचे तेल वापरून!

Monday, December 6, 2010

बदामाचे तेल

खरंतर कागदोपत्री थंडी सुरू होवून एक महिना उलटून गेला. पण निसर्गाने प्रचंड विक्षिप्तपणा करत मधेच पाउस, मधेच प्रचंड उकाडा असे वेगळेच रंग दाखवले. त्यामुळे झाले असे कि जी पोस्ट मी खूप आधी लिहिणार होते ती राहूनंच गेली. पण आता पुण्यात थंडीने भलताच जोर धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर हि पोस्ट लिहायला घेतली आहे.
माझी स्वतःची त्वचा फार कोरडी आहे. त्यात आता थंडी म्हणाल्यावर तर बघायलाच नको. उपाय बरेच असतात. बाजारात मिळणारी विविध क्रीम्स, moisturisers इत्यादी इत्यादी. पण माझ्या अनुभवातला घरगुती आणि प्रभावी उपाय म्हणजे बदामाचे तेल. तसे सर्वांना माहितंच आहे कि बदामात ई विटामिन असते म्हणून. आणि ई विटामिन त्वचेसाठी पोषक असते.
 
मला स्वतःला दुधात बदाम उगाळून चेहर्याला लावतात हे माहित होते. पण एवढे परिश्रम घ्यायचा कंटाळा. मग ह्याला काही सोप्पा पर्याय मिळतो का विचार केला तेव्हा बदामाचे तेल हे उत्तर मिळाले. 
पुण्यात कोथरूडमध्ये (इतर कुठे असेल तर मला कल्पना नाही!) रामकृष्ण oil मिल आहे. तिथे लाकडी घाण्यावर काढलेले तेल मिळते. तिथे विविध प्रकारची तेले मिळतात आणि तिथेच मला बदामाचे तेल मिळाले. खाली त्याचा फोटो देत आहे.
 
मी मुख्यत्वे चेहर्यासाठीच हे तेल वापरते. तर माझ्या अनुभवातून मला कळलेले त्याचे फायदे म्हणजे:
 • त्वचेचा कोरडेपणा जातो.
 • त्वचा एकसारखी (even) होते.
 • चेहरा फेशियल केल्यासारखा  उजळतो.
 • डोळ्या खालची काळी वर्तुळे कमी होतात.
(मी साधारण ५-६ दिवस सलग हे तेल लावल्यावर माझ्या आईने मला विचारले कि फेशियल केले आहे का म्हणून!)
मी हे तेल उन्हाळा सोडला तर थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात वापरते. सध्याचे थंडीचे दिवस बघता इतरांनी (तेलकट त्वचा असणारे) वापरले तरी फायदेशीर ठरू शकेल.

Saturday, December 4, 2010

Latest drawing...

आधी सांगितलं तसं drawing क्लास चालू केला आहे. मधे माझ्या ताईच्या घरी काही अडचणी असल्याने बरेच दिवस क्लास बंद होता. आणि मग जेव्हा पुन्हा सुरु झाला तेव्हा उठून क्लासला जाणे नको वाटत होते. पण विचार केला की आत्ता जर आळस केला तर माझा क्लास कायमचा बंद होईल. म्हणून मग नेटाने पुन्हा चालू केला आहे.
आज जे चित्र इथे पोस्ट करत आहे त्याच्यावर बरेच दिवस काम चालू होते.

आधी रेखाचित्र काढणे आणि मग रंगवणे. माझ्या ताईच्या म्हणण्या नुसार जसजशी मी चित्रे काढत जाईन तसतशी चित्रात रंग भरताना जास्त वेळ लागेल. कारण जास्त details लक्षात येउन तसे रंगवण्याचा प्रयत्न असेल. असो.

तर ह्या चित्राला पण बराच वेळ लागला.         

Saturday, November 27, 2010

२६/११

कालंच २६ नोव्हेंबरला जो दहशतवादी हल्ला झाला त्याला २ वर्षे पूर्ण झाली. टीवी वरच्या विविध वाहिन्या, वर्तमानपत्रे आणि रेडियोवरसुद्धा त्याचीच चर्चा होती. काल घरी येताना रेडियो मिर्चीवर एक जाहिरात/आवाहन पण ऐकलं की तुम्ही सतर्क रहा आणि २६/११ सारख्या घटना टाला. 
मग सहजंच मनात विचार आला की मुंबईमधे लोकल मधेसुद्धा bomb स्फोट घडवून आणले ती घटना कधी झाली. मला तरी तारीख आठवत नाही. मग वाटलं की आपण एवढे निरढावलेले आहोत का की अश्या घटना आपण सहज-सहजी विसरत आहोत. पण मग लक्षात आलं की २६/११ ची घटना आपण विसरत नाही आहोत. असं का?       
ह्या प्रश्नावर विचार करता करता लक्षात आलं की प्रसारमाध्यमे आपल्याला हे अजिबात विसरु देत नाहीयेत.    
लोकलमधे जे स्फोट घडवून आणले त्यात तर २०० च्या वर माणसे मृत्युमुखी पडली आणि शेकडो माणसे जखमी झाली. पण त्या अपघाताचा आपण किंवा कोणी इतर असा स्मरणदिन साजरा करत नाहित. आणि करत असेल तरी ते एवढ्या प्रमाणात नसते की मुंबईच्या बाहेर राहणार्या लोकांच्या ते लक्षात येईल.  
ही बाब झाली स्मरणदिन ह्या प्रकाराबाबतची. पण सरकारी पातळीवर सुद्धा mock-drill वगैरे प्रकार कालच्या दिवसाचे औचित्त्य राखून ठेवण्यात आले होते. 
मग मनात असा विचार येतो की २६/११ च्या हल्ल्यात five-star होटेल मधली उच्चभ्रू आणि परदेशी लोकं टार्गेट झाली म्हणून हे सर्व होत असावं का... सगळीकडे म्हणजे परदेशी प्रसारमाध्यमांनी पण ही सर्व बातमी फार विस्ताराने जगा समोर मांडली. 
मला वाटतंय की दहशतवादी हल्ले करणार्यांना पण लक्षात आलं आहे की भारतातल्या सर्वसामान्य जनतेवर हल्ला करून फारसा फायदा नाही. जरी अश्या हल्ल्यांमधे बरीच मनुष्यहानी झाली तरी ती कोणाच्या एवढी लक्षात राहत नाही. त्या 'Wednesday' ह्या पिक्चर मधे म्हटलं आहे की सर्व सामान्य जनता हे सगलं सहन करते आणि काही दिवसांनी विसरून जाते. म्हणून मग नोंद घेतली जावी आणि लक्षातंही रहावं असं हवं असेल तर उच्चाभ्रुंना लक्ष्य केलं पाहिजे. ही बाब दहशतवाद्यांना समजली आहे म्हणून पुण्यातला तो जर्मन बेकारीवरचा हल्ला घडला.
त्यामुले सत्ताधारी सर्वसामन्यांना कसे किडा-मुंगीसमान समजतात ह्याचा स्मरणदिन वाटतो मला - २६/११!      

Thursday, November 25, 2010

माझ्या आवडीची गाणी

आपण कुठल्याही वयोगटाची चर्चा बघितली तर लक्षात येईल की एक-मेकांच्या छंदा बद्दल बोललं जातं. आणि त्या छन्दांमधे गाणी ऐकणे हा एक छंद असतोच असतो. आणि कुठल्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात ह्या वरून त्या माणसाची अभिरुची आणि तो माणूस कसा आहे ते ठरवलं जातं.

तर मलाही गाणी ऐकायला आवडतात. मला कश्या प्रकारची गाणी आवडतात... जरा अवघड प्रश्न वाटतो मला. कारण माझी आवड बरेचदा त्या त्या वेळची परिस्थिति, सभोवतालची माणसं ह्या वर अवलंबून असतं.

शाळेत असताना एक काळ होता जेव्हा एका पाकिस्तानी गायकाचं 'हवा हवा' हे गाणं आवडायचं. उडती चाल म्हणून मग त्याच्यावर नाच करायला खूप आवडायचं. मग मधला असा एक काळ होता की मैत्रीणीन्ना आवडायच्या म्हणून मलाही गझला आवडायच्या. मग हॉस्टल मधे असताना मैत्रिणी इंग्लिश गाणी ऐकत असल्याने मला पण आवडू लागली. असो.

असं सर्व असलं तरी माझी खास अशी काही आवडीची गाणी आहेत. पण ती गाणी आवडण्याचं कारण म्हणजे त्याच्या बरोबर असलेल्या अनेक आठवणी.

मी अगदी लहान असताना Boney-M नावाचा एक ग्रुप होता त्यांची इंग्लिश गाणी खूप चालायची त्या वेळेस. (मला खरं तर आश्चर्य वाटतं की तसे आम्ही एका फार मोठ्या शहरात राहत नव्हतो. इन्टरनेट तर फारच लांबची गोष्ट TV सुद्धा नुकताच सुरु झाला होता. मग असं असताना माझ्या बाबांनी ती गाणी ऐकली कधी आणि कुठे कोणास ठाउक!) तर ती गाणी अजूनही ऐकली की मला तेव्हाचे ते २ खोल्यांच्या घरातले दिवस आठवतात. घर एवढे लहान असेल तरी खूप पाहुणे यायचे. कसे रहायचो काय माहीत! आणि गंमत अशी होती की त्या घराच्या बरोब्बर समोर एक आड (लहान विहीर) होता. म्हणजे फक्त २ पायरया उतरले की लगेच समोर. पण मी तिकडे कधीच जात नव्हते. (आईने जरी तिकडे जाउ नको असे सांगितले तरी खरोखरच न जाणे हे एक आश्चर्यच होतं. कारण माझं वय वर्षे कमाल ५ होते…). आणि तिथल्या घर-मालकांचा मुलगा जो माझ्याच वयाचा होता तो मात्र नेमका तिथे खेलायला यायचा.

मग मला आठवतं ते सौतन पिक्चर मधला गाणं - ‘शायद मेरी शादी का ख़याल दिल में आया है’. त्या वेळेस बाबांची बदली झाली होती आणि आम्ही गाव बदललं होतं. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा तिथल्या आठवणी जाग्या होतात. तिथे बघितलेला प्रचंड दुष्काळ. माझी आई आणि मोठ्या बहिणी कुठून कुठून लाम्बून पाणी आणायच्या. मग भांडी घासायला पाणी जास्त लागू नये म्हणून आईने पत्रावळी आणल्या होत्या जेवायला!

अजून एक त्या गावाची आठवण म्हणजे उन्हाळ्यात दुष्काळ असल्याने भीमेचे पात्र पूर्ण कोरडे ठणठणीत असायचं आणि मग त्या नदी पात्रात बैल-गाडीची शर्यत व्हायची. बैल प्रचंड वेगात पळत असायचे. तेव्हा पाहताना कधी भीती वाटली नाही पण आता असं वाटतं की कधी एखादा बैल उधळला असता तर... 

मग  तेही गाव बदललं आणि दुसरीकडे जेमतेम १० महीने राहिलो आणि मग पुण्याला रहायला आलो. तेव्हा पासून जी पुण्याशी नाळ जोडली गेली ती आजतागायत! मग बरीच गाणी आली आणि गेली. 

मला   ठळकपणे आठवतं म्हणजे 'जो जीता वोही सिकंदर' मधली गाणी. तेव्हा मी दहावीत होते. शाली जीवनातलं शेवटचं वर्ष, बरयापैकी केलेला अभ्यास, मैत्रिणीं बरोबर शालेला आणि क्लासला जाणे. मग क्लास झाला की निवांत तासन तास मारलेल्या गप्पा. अश्या किती तरी आठवणी...

शालेमधली एक आठवण आहे. मी आणि घरा जवळची एक मैत्रिण अश्या आम्ही दोघी एकत्र यायचो जायचो. मग अधून मधून माझी सायकल पंक्चर तरी असायची नाही तर हवा तरी कमी असायची. मग मी बसने शालेला जायचे. मग येताना माझी मैत्रिण मला म्हणायची की जाऊ आपण एकत्र. अर्धं अंतर मी तुला डबल सीट घेते अर्ध अंतर तू घे. मग ती मला SNDT च्या चढावर डबल सीट घ्यायची आणि मी तिला घ्यायची वेळ आली की मला काही जमायचं नाही. मग थोडं अंतर चालत, थोडं अंतर पुन्हा तिने मला डबल सीट घेणे असा करत आम्ही घरी पोहोचायचो.   

मग आठवतात तो रंगीला पिक्चरची गाणी. माझा इंजीनियरिंगचं पहिलं वर्ष. घरा पासून लांब होस्टेल मधले ते दिवस. पूर्णपणे वेगळ्या अनुभवाची सुरुवात. नविन  वातावरण, नविन मैत्रिणींबरोबरचे ते दिवस आणि त्यातून येणारी घराची आठवण. रंगीलाची गाणी ऐकली की अजून ते सगळ आत्ता नुकतंच घडून  गेले आहे असे वाटते.

अशीच इंजीनियरिंगची ३ वर्षे उलटून गेली आणि शेवटचे वर्ष आले. दिल तो पागल है नुकताच रिलीज झालेला. असंच एक communication चं practical करत असताना आम्ही चौघी मैत्रिणीन्नी ठरवलं की हा पिक्चर बघायचा. हे सगळ ठरवलं ११ च्या सुमारास. आणि शो बघायचा ठरला १२ चा. practical अर्धवट टाकून धावत पळत होस्टेलवर आलो. पटकन आवरलं. मेस मधून राजमा आणि भात असा डबा भरून घेतला आणि थियेटर वर १२:१५ ला पोहोचलो. काय थ्रिल वाटलं होतं हे सगळ करताना. अजूनही ह्या पिक्चरची गाणी ऐकली की सगळी घटना rewind आणि play होते.

शिक्षण संपलं. नोकरी चालू झाली. लग्न झालं. मुली झाल्या. आयुष्य अगदी वेगात पळत होतं. बरीच गाणी आली आणि गेली. कुठल्या घटनांची त्यांच्याशी सांगड़ घालायला वेळही नव्हता. पण आता मुली जेव्हा त्यातल्या त्यात जरा मोठ्या झाल्यावर पुन्हा जुनी सवय जागी झाली आहे. 

मग  'ओम शांती ओम' चं ते 'छन से टूटे कोई सपना' ऐकलं की recession सुरु व्हायच्या सुमारास आमचा एक प्रोजेक्ट ज्याच्या कडून आमच्या आणि पूर्ण कंपनीच्या खूप अपेक्षा असताना तो प्रोजेक्ट न आल्याने त्या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे अवस्था झाली होती. आत्ताच तो पिक्चर टीवी वर बघताना त्या आठवणीन्ना पुन्हा उजाला मिळाला. 

आणि   आत्ता लेटेस्ट आवडणारं गाणं मनाजे 'once upon a time in Mumbai' मधलं 'पी लूं' हे गाणं. अत्यन्त नाकात गाणारया मोहित चौहानने हे गाणं म्हणलं आहे. त्यामुले आधी फारसं आवडलं नव्हतं. पण मधे एकदा client कडून हे गाणं आमच्या decoderने decode होत नाही म्हणून आलं होतं. आणि तेव्हा ते बर्याचदा ऐकलं. त्यामुले त्या गाण्याकडे बघायचा दुसराच angle मिळाला असल्याने हे गाणं रेडिओ वर कधीही लागलं तरी आवर्जून ऐकते.       

अशी किती गाणी आली आणि गेली. पण काही काही गाणी आठवणीन्चा गंध ठेवून गेली. मनाच्या कुपीत जपून ठेवावीत अशी ही माझी आवडती गाणी...

माझी कलाकुसर

जेव्हा जागतिक मंदीची लाट आली होती तेव्हा त्याचा थोड्या फार प्रमाणात मला पण फटका बसला.  अगदी नोकरी जरी गमावली नाही तरी प्रोजेक्ट नव्हता. मग काय करायचे हा एक यक्षप्रश्न होता. मग विविध ब्लॉग वाचायला सुरुवात केली. त्यात एक ब्लॉग सापडला. kalanirmitee.blogspot.com. जिचा ब्लॉग आहे ती एक खूपच चांगली कलाकार आहे. 

बऱ्याच वेग-वेगळ्या कलांचे आविष्कार तिथे बघायला मिळतात. त्यातच paper quilling नावाचा प्रकार बघायला मिळाला. बघायला मिळाला म्हणण्यापेक्षा जो एक प्रकार मी आधी बघितला होता त्याला paper quilling म्हणतात हे कळले. 

मग   त्याच्या पासून प्रेरणा घेउन मी पण घरी सामान आणलं आणि काही प्रयोग चालू केले. त्यातलाच एक प्रयोग इथे खाली देत आहे...     

   

Wednesday, November 24, 2010

गैरहजेरी

इतक्या दिवसांची माझ्या ब्लॉग वरची गैरहजेरी...  मनात खूप काही चालू होतं. माझ्या ब्लॉगच्या  नावाप्रमाणे बरेच तरंग उठत होते पण ते इथपर्यन्त पोहोचलेच नाहित.  जसं समुद्रातली प्रत्येक लाट काठापर्यन्त पोहोचत नाही तसंच काहीसं झालं. 

रोज सकाळी सकाळी ६:३० च्या आधीचा वेळ माझा स्वतःचा असतो. मग स्वयंपाक करता करता बरेच विचार येत असतात डोक्यात. मग असं वाटतं की हे आपण ब्लॉगवर नक्की लिहायला पाहिजे. पण दिवस संपता संपता जेव्हा ब्लॉग वर लिहायची वेळ येते तेव्हा ती ऊर्मी संपलेली असते किंवा तेवढी पुरेशी नसते.  एक तर पोस्ट लिहायला पण घेतली पण ती अजून अर्धवट अवस्थेमधे आहे.  

आज पण आत्ता जेव्हा ही पोस्ट लिहायला घेतली तेव्हा नक्की काय लिहावे हा प्रश्न होता. पण विचार केला की निदान लिहायला तर सुरुवात करावी मग बघू काय होतं ते. आणि झालंही तसंच. काही तरी लिहावं हा विचार करून सुरुवात केली.

ही पोस्ट म्हणजे इतक्या दिवसात काही न लिहीण्याचे जे चक्र सुरु झाले होते ते संपवणारी असावी ही आशा.  

Tuesday, November 9, 2010

Comfort zone

आत्ता नुकतीच एक पोस्ट इंग्लिश मधे टाकली. कारण ज्या मी केलेल्या दिवाळीच्या पदार्थांचे appraisal करायचे होते. आणि तो प्रकार मला असे वाटले की मी इंग्लिश मधेच जास्त सहजतेने मांडू शकले असते. 
मराठी ही जरी मातृभाषा असली तरी दैनंदिन जीवनात इंग्लिशचा वापर जास्त असल्याने ती जास्त comfortable वाटली. आणि ह्या comfort zone मधे गेल्यावर बरंच बरं वाटलं.

आजंच एके ठिकाणी वाचलं की comfort zone हे कूपमंडूक वृत्तीला दिलेले एक गोंडस नाव आहे. पण बर्याच दिवसांनी comfort zone मधे जाउन येणे बरं वाटलं.  

पण हा फक्त एक बदल होता. पुन्हा आपली मायबोली मराठी आहेचे लेखन करायला.

Appraisal

Though I could not write anything about my Diwali preparations, I’ve decided to do an appraisal of my Diwali-Faral and write about it… :D (Recently we had a presentation given by our center head, regarding the overall appraisal procedure in the company. So still I have that hang-over… :P)

Before starting this write-up, I checked the exact meaning of appraisal on the net. It means ‘the act of estimating or judging the nature or value of something or someone’. So in this post I’m going to evaluate my tryst with Diwali-Faral.

As I mentioned before I still have that hang-over of the meeting about Appraisal, I’ll start with formal procedure of the appraisal. So the very first is to set the goals based on which we can evaluate the performance. So what were the goals that I set for myself?

I decided to make variety of items for diwali which can be listed below:
 • Chivda
 • Laadu (Besan)
 • Laadu (Rawa-Naral)
 • Karanji
 • Shankarpali
 • Anarase
 • Chakali
 • Shev
 • Chirote
Time allotted to achieve the target - only an evening and a complete day before Diwali.
Any assistance availed – None.
Any other challenges– very much present.

(As I am setting the goals, I have entered into a manager’s role. So what is a manager's take on this?
The challenges are the one’s that make our life interesting. What is life without challenges – a monotonous journey! Have you ever traveled from Pune to Solapur? It’s a plain road. The journey is very boring and tiresome. Whereas the road between Pune-Mumbai is full of ghats and tunnels; hence the journey is quite interesting… As the challenges are integral part of our life, face them and grow yourself!!!)

Hmmm… the target was quite aggressive!!! Was it achieved? The honest answer is 'No'. Then what was achieved? Well the list includes: 
 • Laadu (Rawa-Naral)
 • Karanji
 • Shankarpali
 • Anarase
 • Chakali
 • Shev
 • Chirote

Still the score is around 75%. Distinction!!!

But evaluation should include not just quantitative but qualitative approach as well. So except Chakali and Chirote, rest of the things was of above average quality.

What is my absolute rating? (Now as it was described in our company meeting absolute score is an individual score like the percentage we get in any exam.). I would call it as exceeded expectation. (We have 4 levels - Does not meet, Meets, Exceeds expectation and Far exceeds).

Areas improvement:
Need to improve on planning. May be one more day of leave before Diwali can help.
Some of the works can be delegated away to save on time.

Strengths:
Possesses potential to achieve the target and excel in it.

The final normalized rating:
The normalized rating is nothing but ranking amongst many people. As the appraisal is of my performance, I would compare it with my previous year performance instead of other people.

Previous few years, because of some or the other reason, I was not preparing any of these items at home. Hence it’s a significant improvement and the normalized rating can be kept at Exceeds!!! :P

With this appraisal, I can hope that next year I can use this post to have a better performance.

Monday, November 8, 2010

Speed thrills but...

प्रसंग १:   साधारण ७-८ महिन्यांपूर्वी स्थळ: बाणेर रोड  वेळ: साधारणतः ६:३० - ६:४५
James Bond ला जसे license to kill मिळालेले असते तसे बाणेर रोड वर गाडी चालवणारे सर्व जणांना license to drive fast मिळाल्यासारखे  वागत असतात. तर अर्थातच मला पण हे असे license मिळाले आहे अश्या थाटात मी पण गाडी चालवत असते. टू-व्हीलर वर एकदा एक छोटा एक्सिडेंट झाला आहे तरी वेगाचं वेड काही कमी होत नाही. 

त्या दिवशी तर नवर्याची गाडी असल्याने तर सूसाट चालले होते. (असं वाटतं की जर १४०० cc ची गाडी चालवायची तर सावकाश चालवून तिला न्याय कसा मिळणार! ) University chya सिग्नलला पोहोचायच्या थोडं आधी मी एका गाडीला असच कट मारला आणि पुढे गेले. आणि त्या वेळेस डोक्यात विचार आला की आपण एवढे वेगात गाडी चालवत आहोत आणि काही अपघात झाला तर...
माझा स्वतःचा काही बरं वाईट झाला तर निदान  माझ्या स्वतःपुरता तरी प्रश्न मिटलेला असेल. पण त्या व्यतिरिक्त माझ्या हातून काही घडला तर! आणि ह्या विचाराने मी प्रचंड हादरले. आणि जरा सावकाश गाडी चालवायला लागले.

प्रसंग २:  तीच संध्याकाळ  स्थळ: माझे घर आणि त्या समोरचा रस्ता   वेळ: साधारणतः ७:३० - ७:४५
ऑफिस मधून आम्ही घरी पोहोचलो होतो. माझ्या घरा समोरचा रस्ता १०० फूटी आहे. अत्यंत गुळगुलीत आहे. आणि त्या वेळेस रोड divider सुद्धा नसल्याने तो जणू रन-वे सारखा वाटायचा. मग तर काय लोकांना वाटायचं (किंवा अजूनही वाटतं!) की त्यांना fast किंवा rash driving करण्याचा अधिकार आहे. तर तसे लहान-सहान अपघात होतंच होते. पण मोठ्ठा अपघात अजून कधी झाला नव्हता.   

नुकतेच आम्ही हात-पाय धुवून खोलीत बसलो होतो. (आमची खोली road facing आहे.) आणि एका कारचा करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. आणि त्या पाठोपाठ एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. बहुतेक तो मुलगा त्या अपघातात जखमी झाला होता. अगदी घरा समोर एक्सिडेंट झाला होता पण मधे एक झाड असल्याने काही दिसत नव्हते. पण बरीच लोकं तिकडे धावताना दिसते होती.

नंतर कळलेल्या वृत्तान्ता नुसार एक लहान मुलगा रस्ता ओलांडत होता. एक होंडा सिटी अत्यंत वेगात आली आणि कारच्या ड्राईवरने त्या मुलाला पाहून ब्रेक दाबायचा प्रयत्न केला पण... पण त्या गाडीने त्या लहान मुलाला उडवले होते. आणि त्या गाडीचा ब्रेक इतका जोरात लागला होता की गाडी पूर्ण विरुद्ध दिशेला वळली होती. आणि तो ड्राईवर तिकडून पलुन गेला होता.  

तो लहान मुलगा (वय वर्षे ८) काही तासांनी मृत्युमुखी पडला होता... :( आणि पोलिसांनी त्या ड्राईवरला पकडले होते. २१ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांची नविन गाडी चालवत होता तो पकडला गेला होता.  २१ वर्षे वय म्हणजे अजून नुकतीच आयुष्याची सुरुवात होती. आणि अशी ही तारुण्याच्या मस्ती मधे केलेली चूक कदाचित आयुष्य भराची किम्मत मोजायला लावणार होती.

ह्या सर्व प्रकाराची मी एक साक्षीदार होते. ज्या गोष्टीची केवळ एका तासा पूर्वी नुसत्या कल्पनेने भीती वाटली होती ती गोष्ट प्रत्यक्ष घडताना मी पाहिली होती. नख-शिखान्त हादरले होते. रस्त्या वर बर्याचदा "Speed thrills but it kills" हे घोषवाक्य वाचला होतं. पण त्याचा नक्की काय अर्थ होतो ह्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

जसं आधी सांगितलं तसं वेगात गाडी चालवणे हा मूळ स्वभाव असल्याने अजूनही फास्ट गाडी चालवण्याचा मोह होतो. पण रस्त्यावर ते घोषवाक्य दिसतं आणि तो अपघाताचा प्रसंग आठवतो आणि accelerator वरचा पाय आपोआप बाजूला होतो... 

काही तरी...

बरेच दिवस झाले काहीच नविन पोस्ट केला नाही. कित्ती गोष्टी ठरवल्या होत्या लिहायच्या म्हणून. पण सगळे राहूनच गेले. दिवाळीच्या  शुभेच्छा द्यायच्या होत्या, मी केलेल्या पदार्थांबद्दल लिहायचे होते पण राहूनच गेले. उत्साहाने ओतप्रोत भरलेली दिवाळी आली आणि भरपूर आनंद देऊन गेली.

एखादा कार्यक्रम आपण जर ठरवला असेल तर कसं आपण पूर्ण झोकुन देऊन काम करतो. आणि तो कार्यक्रम संपला की कसे रितेपण येते तसे आत्ता झाले आहे. एकदम रिकामं-रिकामं वाटत आहे. आता काय करू असे झाले आहे.

मग लक्षात आले की अरे, आपला ब्लॉग आहे ना... कित्येक दिवसात आपण काहीच लिहिला नाही. म्हणून मग आज म्हणला की काही तरी लिहावं. पण अर्थात काय लिहावं हे निश्चित नसल्याने काय शीर्षक द्यावे हाही एक मोठा प्रश्न होता. म्हणून काही तरी लिहायचा विचार करून लिहायला घेतल्याने 'काही तरी' असे शीर्षक देऊन टाकले. म्हणजे मग नावातंच एक disclaimer टाकल्याने नक्की काय लिहायचे ह्याचे बंधन नाही. आणि काय लिहिल ते फार अर्थ पूर्ण असायला पाहिजे असंही नाही. (कसली हुशार आहे ना मी... :P)

आता सुरुवात केल्यावर मात्र वाटतं की असं कसं... काही तरी असं नाव जरी दिला असलं तरी इतकं पण दिशाहीन कसं लिहावं...

लहान असताना आईच्या मागे भूक लागली की काय कटकट चालू करायची की मला भूक लागली काही तरी दे ना... आई म्हणायची की नक्की काय हवे ते सांग. कारण काही तरी नावाचा पदार्थ तिला माहीत नाही... पण बहुतेक त्या वेळेस पण तो एक प्रकारचा disclaimer असावा. की आईने काही खायला दिले तर त्याला नाकरन्याचे आपल्याला स्वातंत्र्य असावा. नावडता पदार्थ आला तर मला काही तरी मधे हे अपेक्षितच नव्हते म्हणण्याचा पर्याय हाती असावा असे वाटत असावे कदाचित. असो. तर 'काही तरी' ह्या नावाप्रमाणे काही तरी विषयांतर केले. (अर्थात हे स्वातंत्र्य आहेच त्या disclaimer ने).

पण आता काही तरी लिहायचं म्हणून किती भरकतावे ह्या काही मर्यादा! आणि दिशाहीन होडी चालवल्याने कुठल्यातरी किनारी कसे पोहोचायचे हाही प्रश्नच निर्माण करून ठेवला. मग सोडून देऊ का ही नाव अशीच वाटेत? 

अश्या बेवारस नावा जेव्हा आपण खूप दिवसांनी बघतो तेव्हा फार केविलवाण्या दिसतात नाही! कदाचित काही दिवसांनी माझी ही पोस्ट पण फार केविलवाणी दिसेल. दिसली तर दिसू देत. आत्ता तरी ह्या पोस्टने मला बरच ताजं-तवाने झाल्या सारखे वाटत आहे. बघूयात नंतरचे नंतर...

Saturday, October 30, 2010

while(1)

Programming मधे (मला फक्त C programming येतं त्यामधे तरी निदान ) वेग-वेगळी loops असतात. त्यातलंच एक while loop. तर जेव्हा वरील दिल्या प्रमाणे (while (1)) loop असते तेव्हा त्याला infinite loop म्हणतात. एकदा ते loop चालू झाले की  आपण काही conditon देऊन ब्रेक केल्या शिवाय ते ब्रेक होत नाही.

तसच आपल्या मनाचं पण होतं बर्र्याचदा... एकदा एका विचारत अडकले की त्यातून काही केल्या बाहेर येत नाही. आपल्याला काळात असतं की ह्यातून बाहेर पडायला पाहिजे पण ती ब्रेक contition काही केल्या execute होतंच नाही. आपलं मनाचं प्रोग्राम्मिंग काही तरी चुकतं बहुतेक!

त्या लूपच्या बाहेर कित्येक चांगल्या गोष्टी असतात. पण मन मात्र नको त्या गोष्टींचा विचार करत आपली सगळी शक्ती त्यात खर्ची करत बसतं...

आपल्या कामात जेव्हा एखादी functionality implement करायची असते तेव्हा आपण किती गोष्टी करतो. वेग-वेगळी डिजाईन docs. प्रत्येक error contition साठी check  आणि आपला प्रोग्राम कुठल्याही infinite लूप न जाण्याची घेतलेली precaution.

काही काही लोक उपजतच फार चांगले प्रोग्रामर असतात मनाचे. पण कित्येक लोकांना आवर्जून प्रयत्न करावे लागतात हे programming skill कमावायचे. कुठल्या मनस्थितीत आपण अडकलो आहोत आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी काय करावे लागेल ह्याचा पूर्ण विचार करून ठेवणे फार आवश्यक आहे. आधी अत्यंत प्रयत्न पूर्वक ह्या गोष्टीची सवय करून घेणे गरजेचे आहे. असा म्हणतात की एखादी गोष्ट आपण प्रयत्न पूर्वक करू लागलो की काही दिवसांनी ती आपल्या नकळत घडू लागते. (असे म्हणे !!!)

तर आज अश्याच एका लूप मधे होते मी. (चला! 'होते' असं मी स्वतः म्हणत असल्याने मी त्यातून बाहेर पडले असं म्हणायला काही हरकत नाही.) काय करावे काही सुचत नव्हते आणि ही नविन पोस्ट लिहायला घेतली आणि त्यातून आपोआप बाहेर पडले. तर सध्या तरी माझ्या while loop ला ब्रेक मिळाला आहे. असेच तुम्ही पण कधी कुठल्या while loop मधे फिरायला लागलात तर तुम्हालाही break मिळो...      

Friday, October 29, 2010

आजची हजेरी...

रोज ब्लॉग वर काही ना काही पोस्ट करायची एवढी सवय झालीये की काहीच पोस्ट नाही करायचा म्हणजे काही तरी चुकल्या सारखा वाटतं. (एखादी गोष्ट नव्याने करायला लागला की कसं त्याचाच नाद लागतो तसा झाला आहे. )


आज आता लिहिलं तर काही नाही मग पोस्ट काय करायचं.... तर असच नव्याने काढलेले एखादं चित्र टाकावा असं म्हणते. आवडलं तर अवश्य सांगा...

Thursday, October 28, 2010

सरळ रेष

आधी सांगितले तसे हौसेने drawing क्लास चालू केला आहे. तर असच एका क्लास मधे दाराच्या चौकटीला टेकून उभ्या असलेल्या बाईचे चित्र काढायचे होते. आधी बाई काढली आणि मग चौकट काढायची होती. ही सगळी चित्रकला freehand. तर अशी ही चौकट बिन पट्टीची काढली. माझी शिक्षिका जिला मी ताई म्हणते ती मला म्हणाली ‘अरे वा! बिन पट्टीची छान सरळ रेष काढली आहेस’. तर माझे उत्तर होते की सरळ रेष draw करणे सोप्पे झाले आहे. त्या पेक्षा वेगले आकार किंवा गोलाई काढने फार अवघड जाते. असो.

तर मुद्दा हा आहे की चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता सरळ रेषेची इतकी सवय झाली आहे की त्याच्या पलिकडे जाऊन वेगले आकार, वेगले विचार करणे अवघड जात आहे.

काही लेखन करायला जावे तरी एकदम concise. आपण शाळेत असताना कसे मराठीचा पेपर म्हणला की छान विस्तृत उत्तरे लिहायची आणि शास्त्र म्हणला की मुद्द्यांमधे उत्तरे लिहायची. आता मात्र असे काही विस्ताराने लिहिणं इतकं अवघड जातं ना…

आता सुद्धा लिहायला घेतलं खरं पण असं वाटतंय की मला जे सांगायचं आहे ते सांगून झालं आहे की! मग आता पाल्हाळ कशाला लावायचं. पण हेच जमत नाहिये की नलातली controlled धारेपेक्षा धबधबा जास्त मनोहारी असतो. (आता हे असलं वाक्य लिहिलं की असं वाटतंय की किती पुस्तकी वाक्य लिहिलंय मी… :P)

तर सारखे सावाधानतेत जगायची सवय लागली आहे. मोकले स्वच्छंदी वागायची भीतीच वाटते. त्या सरळ रेषेच्या बाहेर जायची भीती वाटते. सारखं वाटत राहतं की आपण असं केलं तर आपलं काही चुकेल का? कोणी आपल्याला काही म्हणेल का?

पडता येईल का मला ह्या सरळ रेषेच्या बाहेर!!!!

Wednesday, October 27, 2010

तिरंगी प्रेमळ माकड

 माझी धाकटी कन्या – वय वर्षे 3. तिच्या कल्पना शक्ती बद्दल काय बोलावे! अजुन शाळेत जात नाही. परन्तु तिची ताई आणि आजू-बाजूची मुले शाळेत जात असल्याने ती पण तिच्या कल्पनेतल्या शाळेत जाते.

तिच्या शाळेत तिच्या एक धांडे teacher आहेत. तिला जे काही येत असेल ते सगळे त्यांनी तिला शिकवलेले असते. मग तिच्या शाळेत अनेक प्राणी आहेत. उदाहरनार्था जिराफ, हत्ती, भू-भू, मनी-माऊ आणि माकड.

त्यातली मनी माऊ तर तिच्या कडे बघून हसते आणि तिच्या गालावरून हात फिरवून तिला माया-माया पण करते.

तिचे कल्पना-विश्व इतके रंगी-बिरंगी आहे की काय सांगू… J आणि ती अत्यंत रसभरीत वर्णन करते की त्याचे चित्र सुद्धा नजरे समोर येते.

तर अश्या तिच्या कल्पनाविश्वताल्या एका माकडाचे ती आज आम्हाला वर्णन करून सांगत होती. तर त्या माकडाचे डोके निळ्या रंगाचे होते आणि पाठ गुलाबी तर त्याची शेपटी हिरवी. असे हे तिरंगी माकड अत्यंत प्रेमळ होते आणि ते तिच्या कडे बघून हसले. आणि तिला चक्क न चावता तिला माया माया केली.

खूप गम्मत वाटली तिच्या ह्या रंगी-बिरंगी माकडाचे वर्णन ऐकून… J

Sunday, October 24, 2010

माझी ऑफिस मधे एक मैत्रिण आहे तिचा एक ब्लॉग आहे. तसा म्हणला तर बरच अलीकडे तिने ब्लॉग्गिंग सुरु केला आहे. आणि ती मला कायम सांगत असते की मी एक feedjit नावाचे gadget traffic बघण्यासाठी वापरत आहे आणि अमुक प्रकारचे लोक विसित करत आहे असा ती मला कायम उत्साहात सांगत असते. तेव्हा तिचा कौतुक अवश्य करत असते. पण जेव्हा माज्या ब्लॉग वर माझ्या व्यतिरिक्त इतर visitor जेव्हा मी पाहिला/पाहिली तेव्हा मला कोण आनंद झाला!
ह्या ब्लॉग मुले पुन्हा एकदा लहान झाल्याचा आनंद मिळत आहे.  लहानपणी कसा काहीही नविन गोष्ट केली की इतरांनी ती किमान पहावी आणि कौतुकही करावा. आताही अगदी असच वाटत आहे. आता फरक फक्त एवढा आहे की निदान इतरांनी हा ब्लॉग पहावा तरी ही अपेक्षा... :)
हा आनंद साजरा करण्यासाठी ही पोस्ट. बघूयात अजून काय कारणास्तव नविन नविन पोस्ट लिहायच्या ते...
  

Wednesday, October 20, 2010

माझी चित्रकला!!!

रोज नव-नविन ब्लोग्स वाचणारी मी आज जेव्हा ब्लॉग लिहायला चालू करते तेव्हा अनेक प्रश्न पडत आहेत. माझ्या पोस्ट चे title मराठी मधे कसे द्यावे. तर जर कोणाला ह्या प्रश्नाचे उत्तर देता आले तर मला अवश्य कलवावे...

तर नमनाला घडाभर तेल ओतले कारण मला मराठी मधे पोस्ट चे शीर्षक मला देता आले नाही... :( तर ही पोस्ट लिहायचे कारण म्हणजे माझ्यातील हौशी चित्रकाराचे (?) चित्र इथे पोस्ट कराचे आहे.

शाळेत असताना कधी माहीत नव्हते की थोडे जास्त परिश्रम घेतले तर अंगातील कला जेवाध्य असतील तेवढ्या विकसित होतील. पण म्हणतात न "It is better late than never ".

आत्ता एक चित्रकलेचा क्लास लावला आहे. त्यापैकीच एक चित्र इथे पोस्ट करत आहे.

श्री गणेशा!

गावाकडच्या जत्रेत वेग-वेगळ्या प्रकारची माणसा यायची असे म्हणतात - हौशे, नवशे आणि गवशे... तसंच ह्या ब्लॉग च्या जत्रेतली मी हौशी... :)

ब्लॉग च्या नाव प्रमाणे मनात बरेच तरंग असतात. त्यांना मूर्त स्वरुप इथे देता येइल असे वाटते.