माझ्या आवडीची गाणी

आपण कुठल्याही वयोगटाची चर्चा बघितली तर लक्षात येईल की एक-मेकांच्या छंदा बद्दल बोललं जातं. आणि त्या छन्दांमधे गाणी ऐकणे हा एक छंद असतोच असतो. आणि कुठल्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात ह्या वरून त्या माणसाची अभिरुची आणि तो माणूस कसा आहे ते ठरवलं जातं.

तर मलाही गाणी ऐकायला आवडतात. मला कश्या प्रकारची गाणी आवडतात... जरा अवघड प्रश्न वाटतो मला. कारण माझी आवड बरेचदा त्या त्या वेळची परिस्थिति, सभोवतालची माणसं ह्या वर अवलंबून असतं.

शाळेत असताना एक काळ होता जेव्हा एका पाकिस्तानी गायकाचं 'हवा हवा' हे गाणं आवडायचं. उडती चाल म्हणून मग त्याच्यावर नाच करायला खूप आवडायचं. मग मधला असा एक काळ होता की मैत्रीणीन्ना आवडायच्या म्हणून मलाही गझला आवडायच्या. मग हॉस्टल मधे असताना मैत्रिणी इंग्लिश गाणी ऐकत असल्याने मला पण आवडू लागली. असो.

असं सर्व असलं तरी माझी खास अशी काही आवडीची गाणी आहेत. पण ती गाणी आवडण्याचं कारण म्हणजे त्याच्या बरोबर असलेल्या अनेक आठवणी.

मी अगदी लहान असताना Boney-M नावाचा एक ग्रुप होता त्यांची इंग्लिश गाणी खूप चालायची त्या वेळेस. (मला खरं तर आश्चर्य वाटतं की तसे आम्ही एका फार मोठ्या शहरात राहत नव्हतो. इन्टरनेट तर फारच लांबची गोष्ट TV सुद्धा नुकताच सुरु झाला होता. मग असं असताना माझ्या बाबांनी ती गाणी ऐकली कधी आणि कुठे कोणास ठाउक!) तर ती गाणी अजूनही ऐकली की मला तेव्हाचे ते २ खोल्यांच्या घरातले दिवस आठवतात. घर एवढे लहान असेल तरी खूप पाहुणे यायचे. कसे रहायचो काय माहीत! आणि गंमत अशी होती की त्या घराच्या बरोब्बर समोर एक आड (लहान विहीर) होता. म्हणजे फक्त २ पायरया उतरले की लगेच समोर. पण मी तिकडे कधीच जात नव्हते. (आईने जरी तिकडे जाउ नको असे सांगितले तरी खरोखरच न जाणे हे एक आश्चर्यच होतं. कारण माझं वय वर्षे कमाल ५ होते…). आणि तिथल्या घर-मालकांचा मुलगा जो माझ्याच वयाचा होता तो मात्र नेमका तिथे खेलायला यायचा.

मग मला आठवतं ते सौतन पिक्चर मधला गाणं - ‘शायद मेरी शादी का ख़याल दिल में आया है’. त्या वेळेस बाबांची बदली झाली होती आणि आम्ही गाव बदललं होतं. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा तिथल्या आठवणी जाग्या होतात. तिथे बघितलेला प्रचंड दुष्काळ. माझी आई आणि मोठ्या बहिणी कुठून कुठून लाम्बून पाणी आणायच्या. मग भांडी घासायला पाणी जास्त लागू नये म्हणून आईने पत्रावळी आणल्या होत्या जेवायला!

अजून एक त्या गावाची आठवण म्हणजे उन्हाळ्यात दुष्काळ असल्याने भीमेचे पात्र पूर्ण कोरडे ठणठणीत असायचं आणि मग त्या नदी पात्रात बैल-गाडीची शर्यत व्हायची. बैल प्रचंड वेगात पळत असायचे. तेव्हा पाहताना कधी भीती वाटली नाही पण आता असं वाटतं की कधी एखादा बैल उधळला असता तर... 

मग  तेही गाव बदललं आणि दुसरीकडे जेमतेम १० महीने राहिलो आणि मग पुण्याला रहायला आलो. तेव्हा पासून जी पुण्याशी नाळ जोडली गेली ती आजतागायत! मग बरीच गाणी आली आणि गेली. 

मला   ठळकपणे आठवतं म्हणजे 'जो जीता वोही सिकंदर' मधली गाणी. तेव्हा मी दहावीत होते. शाली जीवनातलं शेवटचं वर्ष, बरयापैकी केलेला अभ्यास, मैत्रिणीं बरोबर शालेला आणि क्लासला जाणे. मग क्लास झाला की निवांत तासन तास मारलेल्या गप्पा. अश्या किती तरी आठवणी...

शालेमधली एक आठवण आहे. मी आणि घरा जवळची एक मैत्रिण अश्या आम्ही दोघी एकत्र यायचो जायचो. मग अधून मधून माझी सायकल पंक्चर तरी असायची नाही तर हवा तरी कमी असायची. मग मी बसने शालेला जायचे. मग येताना माझी मैत्रिण मला म्हणायची की जाऊ आपण एकत्र. अर्धं अंतर मी तुला डबल सीट घेते अर्ध अंतर तू घे. मग ती मला SNDT च्या चढावर डबल सीट घ्यायची आणि मी तिला घ्यायची वेळ आली की मला काही जमायचं नाही. मग थोडं अंतर चालत, थोडं अंतर पुन्हा तिने मला डबल सीट घेणे असा करत आम्ही घरी पोहोचायचो.   

मग आठवतात तो रंगीला पिक्चरची गाणी. माझा इंजीनियरिंगचं पहिलं वर्ष. घरा पासून लांब होस्टेल मधले ते दिवस. पूर्णपणे वेगळ्या अनुभवाची सुरुवात. नविन  वातावरण, नविन मैत्रिणींबरोबरचे ते दिवस आणि त्यातून येणारी घराची आठवण. रंगीलाची गाणी ऐकली की अजून ते सगळ आत्ता नुकतंच घडून  गेले आहे असे वाटते.

अशीच इंजीनियरिंगची ३ वर्षे उलटून गेली आणि शेवटचे वर्ष आले. दिल तो पागल है नुकताच रिलीज झालेला. असंच एक communication चं practical करत असताना आम्ही चौघी मैत्रिणीन्नी ठरवलं की हा पिक्चर बघायचा. हे सगळ ठरवलं ११ च्या सुमारास. आणि शो बघायचा ठरला १२ चा. practical अर्धवट टाकून धावत पळत होस्टेलवर आलो. पटकन आवरलं. मेस मधून राजमा आणि भात असा डबा भरून घेतला आणि थियेटर वर १२:१५ ला पोहोचलो. काय थ्रिल वाटलं होतं हे सगळ करताना. अजूनही ह्या पिक्चरची गाणी ऐकली की सगळी घटना rewind आणि play होते.

शिक्षण संपलं. नोकरी चालू झाली. लग्न झालं. मुली झाल्या. आयुष्य अगदी वेगात पळत होतं. बरीच गाणी आली आणि गेली. कुठल्या घटनांची त्यांच्याशी सांगड़ घालायला वेळही नव्हता. पण आता मुली जेव्हा त्यातल्या त्यात जरा मोठ्या झाल्यावर पुन्हा जुनी सवय जागी झाली आहे. 

मग  'ओम शांती ओम' चं ते 'छन से टूटे कोई सपना' ऐकलं की recession सुरु व्हायच्या सुमारास आमचा एक प्रोजेक्ट ज्याच्या कडून आमच्या आणि पूर्ण कंपनीच्या खूप अपेक्षा असताना तो प्रोजेक्ट न आल्याने त्या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे अवस्था झाली होती. आत्ताच तो पिक्चर टीवी वर बघताना त्या आठवणीन्ना पुन्हा उजाला मिळाला. 

आणि   आत्ता लेटेस्ट आवडणारं गाणं मनाजे 'once upon a time in Mumbai' मधलं 'पी लूं' हे गाणं. अत्यन्त नाकात गाणारया मोहित चौहानने हे गाणं म्हणलं आहे. त्यामुले आधी फारसं आवडलं नव्हतं. पण मधे एकदा client कडून हे गाणं आमच्या decoderने decode होत नाही म्हणून आलं होतं. आणि तेव्हा ते बर्याचदा ऐकलं. त्यामुले त्या गाण्याकडे बघायचा दुसराच angle मिळाला असल्याने हे गाणं रेडिओ वर कधीही लागलं तरी आवर्जून ऐकते.       

अशी किती गाणी आली आणि गेली. पण काही काही गाणी आठवणीन्चा गंध ठेवून गेली. मनाच्या कुपीत जपून ठेवावीत अशी ही माझी आवडती गाणी...

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)