Monday, January 23, 2012

माझ्या कन्येचा ब्लॉग

माझ्या कन्येचा ब्लॉग चालू केला आहे. केवळ माझा आळशीपणा म्हणून त्यावर काही पोस्ट केले नव्हते. पण आज तिने काढलेले एक चित्र तिच्या ब्लॉगवर पोस्ट करत आहे. तिच्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे. तुम्ही अवश्य तिच्या ब्लॉगला भेट द्या.

Monday, January 16, 2012

Sunday Syndrome

२-३ वर्षांपूर्वी 'Sunday' नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला. आयेशा टाकिया, अजय देवगण, अर्शद वारसी असे कलाकार होते. मी तो पिक्चर टीव्हीवरंच बघितला होता. मला खूप आवडला. कदाचित तो नेहमीप्रमाणे एखाद्या इंग्लिश पिक्चरची कॉपी असेलसुद्धा. पण म्हणतात न की अज्ञानात सुख असतं. तसंच मी फारसे इंग्लिश पिक्चर बघत नसल्याने मला काही कळलं नाही की तो पिक्चर ओरिजिनल आहे कि कॉपी. पण मनाला आनंद देऊन गेला हे निश्चित. 

तर आज ह्या पिक्चरची आठवण व्हायचं कारण म्हणजे त्या पिक्चरमध्ये जसं आयेशा टाकियाच्या आयुष्यातला फक्त एक रविवार पुसला जातो त्याप्रमाणे माझ्या ऑफिसच्या आयुष्यातले काही महिने पुसले गेले. अर्थात तिच्या आयुष्यातून एक रविवार पुसला जाण्याचं कारण वेगळं होतं आणि माझ्या आयुष्यातले काही महिने पुसले जाण्याचं कारण वेगळं होतं.

तर सध्या मी एकदम नॉस्टॅल्जिक मूडमध्ये असल्याने अश्याच अधूनमधून वेगवेगळ्या आठवणी येत आहेत. त्यामुळे ही गोष्ट आठवली आणि विचार केला की एकदा कागदावर (वर्च्युअल का होईना) उतरवावी. असो.  

झालं काय की माझ्या दुसर्या कन्येच्या वेळेस मी ७ महिन्यांची मॅटर्नीटी लीव्ह घेतली होती. आणि ती सुट्टी २००७ वर्षाखेरीला चालू झाली आणि २००८ मध्ये पुन्हा ऑफिस जॉईन केलं. तो ऑफिसमधला काळ माझ्यासाठी पॉझ झाला होता. आणि मी पुन्हा ऑफिसला येऊ लागले तेव्हा ते नुसतंच रेझ्युम होतं.

त्यामुळे मी जेव्हा आधीच्या वर्षाबद्दल बोलायची तेव्हा ते माझ्यासाठी २००६ असायचं. आणि पुढचं वर्षं २००७ असायचं. तो काळ फार गंमतशीर होता. जेव्हा जेव्हा पुढच्या किंवा मागच्या तारखांचा संदर्भ द्यायची वेळ यायची तेव्हा मला माझ्या मेंदूला बराच ताण द्यावा लागायचा. असो.

पण म्हणतात ना की सगळ्या गोष्टींचं औषध 'काळ' हेच असतं. तसंच मधली ३-४ वर्षं गेली आणि त्या 'Sunday Syndrome' मधून बाहेर आले.    

Saturday, January 14, 2012

कॉलेजमध्ये रुजताना


आम्हा भावंडांच्या शिक्षणासाठी म्हणून आम्ही पुण्यात आलो. शाळेत ५ वर्षं आणि ज्युनियर कॉलेजमध्ये २ वर्षान काढल्यावर इंजिनीयरिंगसाठी बाहेर जायची वेळ आली. खरं तर मी पुण्यासारख्या मोठ्या शहरातून एका लहान गावात असलेल्या कॉलेजमध्ये चालले होते. त्यामुळे मनात इम्प्रेशन असं होतं की आपण भारी असणार. (आपण कसे ग्रेट किंवा भारी आहोत असं समजून घ्यायला आपल्याला किती आवडतं नाही!) पण ती समजूत किती चुकीची होती हे तिकडे पोहोचल्या पोहोचल्या लगेच जाणवलं.

त्याचं मुख्य कारण तेव्हा मी पुण्यात राहत असले तरी १५-१६ वर्षांपूर्वी वातावरण तसं बरंच बाळबोध होतं. त्यात मी आधी मराठी माध्यम आणि नंतर सप सारख्या कॉलेजमध्ये शिकलेले होते. आणि माझ्या कॉलेजमध्ये उत्तर भारतातले आयआयटी  किंवा तत्सम कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले बहुतांशी विद्यार्थी होते.

आणि जे उत्तर भारतीयांना ओळखतात त्यांना हे नक्कीच माहित असेल की त्यांच्या कडे फार पूर्वीपासून दिखावा करण्यावर फार भर असतो. माझा एक वर्ग-मित्र (उत्तर भारतीयच) होता. तो तर सांगायचा की तिकडे लोकांना भले खायला काही नसेल पण आव असा आणतील की काजू-बदाम ह्या खेरीज दुसरं ते काही खातंच नाहीत.  असो.

पुण्याबाहेर त्यामुळे अर्थातच हॉस्टेलमध्ये राहणं आलं. तिथे २४ तास उत्तर भारतीयांबरोबर रहायचं असल्याने आणि त्यात त्यांचं प्राबल्य असल्याने त्यांच्याशी जुळवून घेणे हे एक आव्हान होतं. आपण एका देशाचे नागरिक असलो तरी त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीमध्ये मला बराच फरक जाणवला.

अगदी बारीकसारीक फरक सांगायचे झाले तर सुरुवातीचे काही दिवस आमचं हॉस्टेलमध्ये रॅगिंग झाले त्यात घडलेले काही किस्से. रात्रीची जेवणं झाली की आम्हाला म्हणजे पहिल्या वर्षाच्या मुलींना खाली बोलावण्यात येई. (आमच्याकडे हॉस्टेलची दुमजली बिल्डींग होती. आणि आमची व्यवस्था वरच्या मजल्यावर होती.) रॅगिंगच्या काळात आमच्यावर बरेच निर्बंध तसेच नियम होते. त्यातला एक नियम म्हणजे सिनियर्स समोर जाताना ओढणीसह पंजाबी ड्रेस ह्याच पोषाखात जायचे. तसेच पायात बाथरूमच्या स्लीपर्स असता कामा नये. सर्वात पहिल्या दिवशी असेच आम्हाला बोलावल्यावर आम्ही आमचा जामानिमा करून पोहोचलो.
   
सर्वप्रथम आम्ही नियमांप्रमाणे तयार होवून आलोय की नाही ह्याची पहाणी झाली आणि त्यात माझ्या चपला रिजेक्ट झाल्या. मी ज्या चपला बाहेर वापरायच्या म्हणून आणलेल्या त्या चपला माझ्या सिनियर्सनी बाथरूमच्या स्लीपर्स म्हणून नापसंती दर्शवली. (माझ्या चपलांचं डिझाईन स्लीपर्स सारखं होतं :(). आणि इथेच मला एक धक्का मिळाला.

त्यानंतर आमची ओळख परेड चालू झाली. अर्थातच हिंदीमधून. माझं हिंदीचं ज्ञान हे फक्त पाचवी ते सातवी असं शाळेत शिकलेले आणि उर्वरित हिंदी पिक्चर बघून असेल तेवढेच होते. स्वतःची ओळख सांगताना वडिलांचे नाव सांगणे अपेक्षित होते. मी माझ्या फर्ड्या हिंदीमध्ये चालू केले की 'मेरे पापा का नाम ___ हैं'. झालं. माझ्या सिनियर्सने विचारलं की 'तुम अपने पिताजीको रिस्पेक्ट नहीं देते'. मग पुन्हा माझी टेप चालू की 'मेरे पिताजी का नाम ___ हैं'.          

एकूणच मला जाणवलं आहे की महाराष्ट्रामध्ये वागण्या आणि बोलण्या मध्ये औपचारिकता कमी असते. आपण दुसर्यांना आदर देतो पण बर्याच गोष्टी इंप्लिसिट असतात. मराठी मध्ये दुसर्याला संबोधताना आपण सर्वसाधारणपणे 'तू' किंवा 'तुम्ही' वापरतो. पण हिंदीमध्ये 'तू', 'तुम' आणि 'आप' अशी संबोधने असतात. अश्या बर्याच गोष्टी तिथे नव्याने शिकाव्या लागल्या.

हिंदी भाषा आणि हिंदी भाषिकांची संस्कृती समजावून घेणे हा कॉलेजमध्ये रुळण्याचा एक भाग होता. अश्या अनेक गोष्टी होत्या ज्या नव्याने समजावून घेऊ लागल्या. त्या बघू नंतरच्या भागात सांगण जमल्या तर.

एक विनोद

आई आणि बाबा त्यांच्या ४ वर्षांच्या मुलीबरोबर भारताची क्रिकेटची मॅच बघत असतात. मैदानात राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर असतात. 

आई: द्रविडला अजिबात पोट नाहीये ना!
बाबा: तो काय इतर कोणत्याच खेळाडूंना पोट नाहीये. 
मुलगी: म्हणजे त्याला फक्त पाठ आहे?
.
.
.
.
.
.

=========================================================================
सदर विनोद आमच्या घरात आज सकाळी लाईव्ह घडला आहे. आम्ही जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चाललेली क्रिकेटची मॅच बघत होतो तेव्हा मी जेव्हा द्रविडला अजिबात पोट नाहीये असं म्हटलं तेव्हा हा प्रश्न माझ्या ४ वर्षांच्या मुलीला पडला. आणि त्यातून ह्या विनोदाची निर्मिती घडली. :)  

Friday, January 13, 2012

शहरात रुजताना

परवा रविवार सकाळच्या  - सप्तरंग पुरवणीमध्ये 'महानगरात रुजताना' नावाचा लेख पाहिला. बहुधा वर्षभर चालणारी लेखमाला असावीतो लेख वाचून मला आम्ही पुण्यात राहायला आलो ते दिवस आठवू लागले. साधारण २३-२४ वर्षे झाली आम्हाला इथे येऊन. पुणं  अजून एक शहरंच होतं आणि त्याचं महानगरात रुपांतर झालं नव्हतं. त्यामुळे विचार केला की आपण पण आपला पुण्यात नवीन असतानाच अनुभव इथे लिहावा. 

वडिलांची नोकरी बदलीची होती. त्यामुळे दर वर्षांनी नवीन गावी बदली. आणि साधारण तालुक्यांच्या गावी बदली होत असेमाझी सर्वात मोठी बहिण साधारण दहावीत वगैरे असताना आईने बाबांच्या मागे लागून पुण्यामध्ये घर बुक करायला लावलंआणि तिची बारावी झाल्यावर आम्ही आमचं कुटुंब पुण्यात हलवलंबाबा बदलीच्या ठिकाणी आणि आम्ही पुण्यात अशी द्विस्थळी  यात्रा होती.

तेव्हा मी सहावीत गेले होते. नवीन आमच्या भागातल्या प्रथितयश शाळेत प्रवेश घेतला. आमची शाळा मुला-मुलींची असली तरी मुलींची शाळा सकाळी आणि मुलांची दुपारी असा प्रकार होता. त्यामुळे ६०-६२ नुसत्या मुलीच्या वर्गात उंचीमुळे मला एकदम शेवटचा बेंच मिळाला. माझी शेजारीण एक वर्ष नापास होवून पुन्हा त्याच वर्गात बसली होती. नवीन असल्यामुळे आणि लहान गावातून आलेली असल्यामुळे अर्थातच कोणी माझ्याशी बोलत नव्हतं.

आणि अजून त्यात एक गंमत झाली. मराठी शाळांमध्ये मुलींना फी माफ असते. पण जर ती मुलगी नापास झाली असेल अथवा घरात चौथे अपत्य असेल तर फी माफी नसते. मी घरात चौथं अपत्य असल्याने मला फी माफी नव्हती. त्यामुळे फक्त मला आणि माझ्या शेजारणीला (नापास झाल्याने) फी भरावी लागत होती. इतर मुलींना मला फी का भरावी लागते ह्या गोष्टीची कल्पना नसल्याने त्यांना माझ्या बाबतीत अजून संशय येऊन त्यांनी माझ्याशी बोलणं अजूनच टाळलंअसो.

असेच काही दिवस गेले आणि आमची पहिली चाचणी परीक्षा झाली. त्याचा निकाल लागला आणि शाळेत स्टँडर्ड हुशार मुला-मुलींना मार्क्स मिळतात तसे मार्क्स मिळाले. आणि त्यानंतर माझ्या वर्गातल्या मुलींनी माझ्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली.

कशी गंमत आहे ! एखाद्या ठिकाणी आपली पाळे-मुळे रोवण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी सिद्ध कराव्या लागता नाही