तिळाचे तेल

पुण्यात थंडीचा एवढा जोर आहे की तिच्या पासून बचाव आणि त्यासाठीचे उपाय ह्या शिवाय दुसरं काही सुचत नाहीये. म्हणूनच मग मागची पोस्ट बदामाच्या तेलाबद्दल होती. पण बदामाचे तेल तसे बरेच महाग असते. त्यामुळे त्याचा वापर शक्यतो तोंडापुरताच ठेवला जाऊ शकतो. पण थंडीच्या दिवसात अंग पण बरंच फुटतं. मग त्याच्यावर तिळाचे तेल हा एक घरगुती उपाय आहे.
 
खरंतर त्याकरता पण बाजारात बरेच lotions वगैरे मिळतात. पण माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की अतिउत्साहात मी असल्या सगळ्या गोष्टी विकत आणते आणि वापरायची वेळ आली की कंटाळा करते. मग त्या प्रोडक्टची expiry date उलटून जाते आणि मला ते फेकून द्यावे लागतात. म्हणून मग मला हे घरगुती उपाय स्वस्त आणि परिणामकारक वाटतात.  
 
तर मी सांगत होते तिळाच्या तेलाबद्दल. तिळाचे तेल हे ऊष्ण गुणधर्माचे असते. त्यामुळे थंडीत त्याचा वापर चांगला. त्याचा वापर अनेक पद्धतींनी करता येऊ शकतो. मला २-३ पद्धती माहित आहेत. त्या म्हणजे:
  • रात्री झोपायच्या आधी हातापायांना लावणे. (पण मग काहींना तेलकट अंग घेऊन झोपणे योग्य वाटणार नाही किंवा पांघरूण तेलकट होऊ शकते.)
  • दुसरी पद्धत म्हणजे आंघोळ झाली की हातात थोडे थेंब तिळाचे तेल घेऊन ओल्या अंगावर लावणे. (अंग ओलसर असल्याने थोडे तेल लवकर पसरते.)
  • आणि मला माहित असलेली पण मी स्वतः कधी करून न पाहिलेली पद्धत म्हणजे आंघोळीच्या पाण्यात काही थेंब तेल टाकून त्या पाण्याने आंघोळ करणे.
माझ्या अनुभवानुसार तिळाच्या तेलाचा अजून एक उपयोग म्हणजे एखादा भाग स्नायूंच्या दुखण्याने दुखत असल्यास मालिश केल्यास आराम मिळतो. माझा उजव्या खांद्याचा सांधा एकूण काम, driving आणि दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसून बर्यापैकी दुखतो. मग आंघोळीच्या आधी थोडी तिळाच्या तेलाने मालिश केल्याने बराच आराम मिळतो.

बघा तुम्हाला कितपत फायदा होतो तिळाचे तेल वापरून!

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा