स्नेह-संमेलन

कालच्या पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे आज आमच्या शेंडेफळाच्या शाळेचे स्नेहसंमेलन होते. आमच्या सर्वांची वरात (५ मोठी आणि ३ लहान अशी ८ माणसे एका गाडीत!) ९ वाजता टिळक स्मारकला पोहोचली. तर टिळक स्मारकचा परिसर लहान-लहान मुले आणि त्यांचे पालक, आज्जी-आजोबांनी फुलून गेला होता. (माझी धाकटी जिथे जाते ती शाळा एक playgroupची शाळा आहे. वय वर्षे १.५ ते जास्तीत जास्त ३.५ पर्यंत.) 
माझी कन्या एका डान्स मध्ये होती. त्यासाठीचा केवळ तिचा फ्रॉक शिवून न झाल्याने तिला फक्त चेहर्याला मेकप करून तिच्या शिक्षकांच्या ताब्यात द्यायचं होतं. ९ पर्यंत तिथे पोहोचायचे असल्याने तिचे प्रातर्विधी, आंघोळ आणि नाष्टा एवढे आटोपून कसेबसे तिथे पोहोचल्याने मेकपचा कार्यक्रम तिथे चालू झाला. मग एकदम गुलाबी गुलाबी गाल, गडद गुलाबी ओठ असा मेकप करून तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केलं.      

मग साधारण पावणे दहाच्या सुमारास कार्यक्रम चालू झाला. आधी त्यांनी कार्यक्रमाची रूप-रेषा समजावून सांगितली त्याप्रमाणे एकूण ८ डान्स होते. आणि सर्वात शेवटी बक्षीस समारंभ. कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर मूळ कार्यक्रम चालू झाला.

सर्वात प्रथम 'welcome song' होते. त्यात बहुधा अगदी लहान म्हणजे २ वर्षाच्या आतील मुलं होती. आणि तो कार्यक्रम म्हणजे ७-८ मुलं एका रांगेत झुक-झुक गाडी सारखे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. आणि त्यांच्या एका बाजूला 'WELCOME' अशी अक्षरे एक-एक करून लावली होती. आणि एक संगीत चालू झालं आणि ती मुलं स्टेजला एक चक्कर मारून पुन्हा विंगेत गेली. तसं पाहायला गेलं तर केवढा सोप्पा प्रकार होतं. पण एवढ्या लहान मुलांकडून एवढ्या, मोठ्या स्टेजवर आणि इतक्या प्रेक्षकांसमोर हे करवून घेणं ही एक मोठी बाब होती.

त्याच्या पुढचा कार्यक्रम होता गणेश वंदना! ओंकार स्वरूप हे गाणं आणि एक-एक लहान मुल स्टेजवर येऊन गणपतीच्या फोटोला फुलं वाहून त्यांना सांगितलेल्या जागी जाऊन थांबत होते. मग पुढचा कार्यक्रम पर्यावरणाचे संवर्धन करा म्हणून सांगणारा 'वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी' ह्या गाण्यावर एक डान्स होता. त्यात वेग-वेगळे प्राणी आणि पक्षी एका जंगलात सुखाने नांदत आहेत आणि एक मुलगी त्यांच्यात आनंदाने बागडत आहे असे दाखवले होते.


मग एक शेतकार्यांचा डान्स होता. त्यानंतर माकारीना ह्या गाण्यावर डान्स होता. उंदीर आणि त्याची टोपी ह्याची गोष्ट सांगणारा एक डान्स होता. अजूनही २ डान्स होते. आणि गंमत सांगायची म्हणजे जर एक डान्स २ मिनिटांचा असेल तर २ डान्स मधला ब्रेक ५-१० मिनिटांचा असायचा. त्या सर्व लहान मुलांना गोळा करून स्टेज वर आणणं. त्या डान्स साठी आवश्यक तयारी करणं अश्या सगळ्या गोष्टींमध्ये तेवढा वेळ जायचा. पण एवढ्या लहान वयाच्या मुलांना घेऊन एवढा कार्यक्रम करणे ही खरोखर खूप कौतुकास्पद बाब असल्याने कोणाचीही काहीही तक्रार नव्हती. कारण आपल्याच घरात असलेल्या एखाद-दुसर्या मुलाला आपल्या सूचनांच पालन करायला लावणे किती अवघड असते हे आपल्याला चांगलेच ठाऊक असते.

त्यामुळे त्या सर्व शिक्षकांनी खरच खूप छान कामगिरी बजावली. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन! 

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या वड्या

उगाच काहीतरी!

माया