आठवणी ५ - पुणे -१

आईच्या आग्रहामुळे आम्हा भावंडांच्या शिक्षणाला स्थैर्य यावं ह्यासाठी, पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला आणि आमचा बाडबिस्तरा कायमचा पुण्याला हलवला. त्यामुळे बाबा बदलीच्या गावी आणि आम्ही मुलं आईबरोबर पुण्यात अशी आमची व्यवस्था ठरली. इतकी वर्षे लहान गावात राहिलेलो आम्ही पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहायला आलो. आम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा बदल होता. बाबांसाठी पण हा बदल मोठा होता. कारण त्यांना बदलीच्या गावी आठवडाभर एकटे राहावे लागणार होते. आता मोठं झाल्यावर जाणवतं की बाहेर कामावर असलेला ताण घरी आपल्या माणसांमध्ये आल्यावर निवळतो. पण बाबांना आता कामावरून घरी परत आल्यावर तो निवांतपणा मिळणार नव्हता.      

मला तर आईचं खूपच कौतुक वाटतं. ४ मुलांना घेऊन पुण्यासारख्या शहरात तसा कोणाचा आधार नसताना राहणे सोपे नव्हते. आणि आम्ही मुलं अगदी अडनिड्या वयाची. मोठी बहीण नुकतीच बारावी झालेली, दुसरी बहीण दहावीत गेलेली, भाऊ नववीत आणि मी सहावीत. पण तिने ते शिवधनुष्य लीलया पेललं.          

आम्ही पुण्यात आलो म्हणजे कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीमध्ये राहायला आलो. ३१ वर्षांपूर्वीची डहाणूकर कॉलनी म्हणजे कथा-कादंबऱ्यांमधले एक टुमदार गाव जणू. डेक्कनवरून आले की कर्वे रोडला उजवीकडे वळले की अगदी आखीव-रेखीव डहाणूकर कॉलनी. मुख्य रस्त्याच्या डावीकडे व उजवीकडे शिस्तीत गल्ल्या. त्या गल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूला इमारती. कर्वे रोडवरून आत वळलं की दोन्ही बाजूला ४-४ गल्ल्या झाल्या की डहाणूकरचं सर्कल लागतं. आणि सर्कलनंतर पुन्हा पुढे काही गल्ल्या. कॉलनीमध्ये शिरलं की सर्कलच्या डावीकडच्या रस्त्याने कॉलनीत पुढे जायचं. तसंच कॉलनीमधून बाहेर पडताना सर्कलच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या डाव्या हाताच्या रस्त्याने बाहेर पडायचं. 

१९८८ साली आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा सर्कलच्या आत विशेष काही नव्हतं. काही झाडं होती आणि बाकीची जागा रिकामीच होती. सर्कलला वळसा न मारता सर्कलच्या आतून पलीकडच्या बाजूला जाता येत असे. पण डहाणूकर कॉलनीमध्ये शिरल्या शिरल्या दुतर्फा अनेक झाडे लावलेली. झाडं म्हणजे वृक्ष. विविधरंगी फुलं येणारे वृक्ष. सर्कलच्या बाहेरच्या बाजूने देखील विविध झाडे आहेत. बहावा, पिवळा गुलमोहोर आणि बहुतेक जांभळ्या फुलांची पण झाडे होती बहुतेक. फेब्रुवारीचा महिना सरून गेला की रस्त्यावर अनेक रंगांची उधळण झालेली असायची.

रस्त्याच्या बाजूने वेगवेगळ्या प्रकारची दुकाने - किराणा मालाची, औषधाची. अगदी एक कपड्याचे दुकानसुद्धा होते - यशस्वी नावाचे. तसेच शालेय पाठ्यपुस्तके, वह्या आणि इतर शालोपयोगी साहित्य मिळण्यासाठी नवनीतचे दुकान. त्याच बरोबरीने सागर स्वीट्स आणि सावन स्वीट्स, पूर्वार्ध आणि सपना नावाच्या २ बेकऱ्या. तसेच १-२ जनरल स्टोअर्स देखील. डहाणूकरच्या रस्त्याला वळून असंच सरळ चालत आलं की समोर किर्लोस्कर कमिन्स ह्या कंपनीचं गेट लागणार. आणि आपण चालत आलेला रस्ता डावीकडे वळून कमिन्सच्या मागच्या बाजूने वळणं घेत अंधशाळा, गांधीभवन, गोपीनाथनगर, सहजानंद सोसायटीला जाणार.                   

गांधीभवनच्यापुढे त्यामानाने फारशी वस्ती वाढली नव्हती. आणि आम्ही डहाणूकरमध्ये राहायला आलो तेव्हा आतासारखी वाहनांची गर्दी नसल्याने एकदम निवांत वातावरण असायचं. अपवाद फक्त सकाळी ८ आणि दुपारी ४ वाजताचा. ह्या दोन्ही वेळेस कमिन्सचा भोंगा वाजणार आणि सकाळी ८ च्या आधी कंपनीत जाणाऱ्या वाहनांची गर्दी तर दुपारी ४ नंतर घरी परतणाऱ्यांची. ह्या वेळांत रस्ता ओलांडून जाणे अवघड असायचे.    


त्यावेळी डहाणूकरमध्ये एक-एक इमारत असलेल्या अपार्टमेंट, नाही तर बंगले असेच पाहायला मिळायचे. अर्थात अनेक इमारती असलेल्या २-३ सोसायट्या होत्या. तर आम्ही राहायला आलो ती एक नवी कोरीकरकरीत सोसायटी होती. एकूण ८ इमारती असलेली. पहिल्या ४ इमारती झाल्या की मधे बाग आणि नंतर उरलेल्या ४ इमारती. आम्ही राहायला आलो तेव्हा केवळ सुरुवातीच्या ४ इमारतींमध्ये लोकं राहायला आली होती. पण नंतरच्या ४ इमारतींपैकी राहायला येणारे आम्ही पहिलेच होतो. अजून इतर इमारतींमध्ये किरकोळ काही कामे सुरु होती. आम्ही राहायला आल्या नंतर २-३ आठवड्यांनी १-२ लोकं राहायला आली. आणि हळूहळू आमच्या बाजूच्या इमारती माणसांनी गजबजायला लागल्या. 

आम्ही राहायला आलो तेव्हा बाग म्हणजे नुसतीच एक रिकामी जागा होती. अजून सोसायटीमधला रस्ता पण धड व्हायचा होता. काही दिवसातच रस्त्याचं डांबरीकरण झालं. त्यावेळी डहाणूकरचा मुख्य रस्ता सोडला तर गल्ल्यांचे रस्ते कच्चे होते. त्यामुळे आम्हाला कोण अभिमान की आमची सोसायटी कसली भारी, आमच्या इथे डांबरी रस्ते आणि खाजगी बाग पण आहे. जसजसे सोसायटीचे काम पूर्ण होत होते तसे बिल्डरने सोसायटीला संरक्षक भिंत बांधून छान रंगवली. तसेच त्या भिंतीला लागून, तसेच बागेत रोपे लावली. त्यामुळे सुरुवातीला ओकीबोकी दिसणारी आमची सोसायटी आता देखणं रूप ल्यायला लागली होती. 

आम्ही साधारण मे महिन्याच्या अखेरीस राहायला आलो होतो. डिसेंबरपर्यंत बिल्डरने रस्ते, बाग ह्यांचे सुशोभन केले. आणि २५ डिसेंबरला एक जंगी कार्यक्रम ठेवून फ्लॅटधारकांना मंचावर आमंत्रित करून घराच्या किल्ल्या एका मखमली बटव्यात घालून सुपूर्द केल्या. त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसची शिवमुद्रादेखील सप्रेम भेट दिली. 

आमची बाग म्हणजे झोपाळे, घसरगुंड्या, जंगलजिम, डबलबार, सी-सॉ असे सगळे असलेला एक अखंड लोखंडी संच. आणि बागेच्या एका कोपऱ्यात पांढरीशुभ्र शंकराची मूर्ती जिच्या जटांमधून पाणी वाहणारे कारंजे. माझ्यासाठी तर जिना उताराला की खेळायला झोपाळे, घसरगुंडी असणे हे स्वप्नवत होते.  

पुढील १३ वर्षांत अनेक आठवणी, अनुभव गोळा करत ह्या स्वप्नांच्या नगरीत माझं पुढील आयुष्य घडणार होते.   

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा