आठवणी २ - मु. पो. बारामती
आठवणी १ - प्रस्तावना माझे बाबा पाटबंधारे खात्यात कामाला असल्याने त्यांची साधारण दर चार वर्षांनी बदली होत असे. पाटबंधारे खात्याची कामे सुरू असतील अशा ठिकाणी म्हणजेच बर्यापैकी लहान आणि अगदीच क्वचित शहरात बदली होत असे. आई बाबांचे लग्न झाल्यापासून आणि माझ्या जन्माच्या आधी भाळवणी, सातारा, करमाळा अशा ठिकाणी बदल्या झाल्या होत्या. बदली झाली की चंबूगबाळे आवरायचे अन् निघायचे. सामानाची बांधाबांध व्यवस्थित करता यावी म्हणून आईने त्या काळात मिळत असतील ती खोकी तसेच पॅकिंगसाठी म्हणून आमचे लहानपणीचे कपडे सांभाळून ठेवले होते. एवढी गावे फिरलो तरी कपाचा एक टवकासुध्दा निघाला नाही असं पॅकिंग असायचं. आमची अशी फिरस्ती सुरू होती तोपर्यंत मी बरीच लहान होते त्यामुळे आवराआवरीत मदत केलेली मला तरी आठवत नाही. खरंतर आज पर्यंत मला वाटत होते की मला पूर्वीचे काहीच आठवत नाहीये. जणू आठवणींचे गाठोडे कुठेतरी सोडून आले आहे. पण आज आवर्जून बसले तर ते गाठोडे आणि त्यातल्या कित्येक आठवणी सापडल्या आहेत. ह्या आठवणींचे तुकडे वेचता वेचता केवढा कोलाज तयार होतो ते बघायचं. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची तर सोलापूरप...