आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर
खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे. इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे. आमचा इस्लामपूरला जेमतेम १० महिन्यांचा मुक्काम होता. त्यामुळे तिथल्या माझ्या आठवणी फारच मर्यादित स्वरूपाच्या आहेत. पण बाबांबरोबर जी फिरस्ती झाली त्यातला हा एक टप्पा होता. आणि आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती , जागा काही कारणाने आणि आपलं परस्परांप्रती काही देणे असते म्हणून येतात. तसाच आमच्या आयुष्यातील इस्लामपूरचा टप्पा. आईबाबांनी आधीच येऊन एक घर भाड्याने घेतले. जराशी गावाबाहेर असलेली ती बंगल्यांची कॉलनी होती....