इस मोड से जाते हैं .... (१)
आपल्या आयुष्याची वाटचाल सुरु असताना अशी काही वळणं येतात की स्वप्नातही कल्पना न केलेला रस्ता आपण चालायला लागतो. बापरे, काही गहन तत्त्वज्ञान सांगण्यासाठी केलेला हा पोस्टप्रपंच तर नाहीये ना! तर तसं काही नसून एका अनुभवाची ही गोष्ट आहे. आणि गोष्ट सांगताना ती रंगतदार करायची असेल तर नमनाला घडाभर तेल ओतणे आले. माझ्या मुलींची शाळा सुरु झाल्यावर सुरुवातीच्या काळात parents-teacher मीटिंगला लोकांना एवढे काय प्रश्न पडतात आणि शिक्षकांशी एवढं काय बोलायचं असतं अशी प्रश्न पडणारी मी. आणि मागच्या वर्षी तन्वी दहावीला असताना PTA मेंबर होऊन शाळा आणि पालकांमधील दुवा होणारी मी, असा माझा पालकत्वाचा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासात शाळेला - त्यांच्या प्रशासनाला येणाऱ्या अडचणी पण लक्षात आल्या. त्यातीलच एक म्हणजे कधी कधी काही कालावधीसाठी शिक्षक उपलब्ध नसणे. त्यामुळे शाळेतील शेवटची PTA मीटिंग झाली तेव्हा मी शाळेत सांगून आले होते की शिक्षकांबद्दल काही अडचण असेल तर मी काही कालावधीसाठी मदत करू शकेन. आणि नवीन सत्राची शाळा सुरु झाल्यावर खरंच त्यांच्या एक शिक्षिका २ आठवड्यांनी जॉईन होणार होत्या. त्यामुळे त्यांची जागा भरून ...