इस मोड से जाते हैं .... (२)
मुली पहिल्यापासून ह्याच शाळेत असल्याने बऱ्याचश्या शिक्षिकांना मी ओळखत होते तसेच त्याही मला ओळखत होत्या. धाकटीच्या दहावीच्या वर्षात PTA मेंबर म्हणून शाळेत अजूनच येणं-जाणं झालं होतं. पण ३ एप्रिलला जेव्हा शाळेत जाणार होते, तेव्हा टेबलावर ज्या शिक्षकांच्या समोर बसत होते त्यांच्या पंक्तीत बसायचं होतं. नाही म्हटलं तरी थोडी धाकधूक होती. तिथल्या शिक्षिका माझ्या नवीन भूमिकेचा कितपत सहजतेने स्वीकार करतील असं वाटत होतं. पण खरं सांगू मनातली ही शंका क्षणात दूर व्हावी एवढ्या सहजासहजी त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. गंमत म्हणजे शाळेतल्या काम कित्येक मावशींनी पण मला ओळखलं. कोणासाठी मी मोठीची आई होते तर कोणासाठी धाकटीची. मी फक्त नववी आणि दहावीच्या वर्गांना शिकवणार असल्याने, नववी आणि दहावीच्या शिक्षकांच्या स्टाफरूममध्ये मला जागा मिळाली. आणि इतके दिवस श्रावणी आणि तन्वीची आई असलेली मॅम त्यांच्यासाठी शर्वरी झाले. काहीजणी लगेचच अगं-तुगं म्हणायला लागल्या. तर काही जणी अहो-जाहो करत असल्या तरी एक सहकारी म्हणून मैत्र जपत होत्या. शाळेची मधली सुट्टी सकाळी ९:३० वाजता व्हायची. सगळ्य...