धपाटे
मराठवाडा, सोलापूर भागात सर्रास केला जाणारा पदार्थ म्हणजे धपाटे. लग्न केल्यानंतर माझ्या अतिशय सुगरण असलेल्या सासूबाईंकडून कित्येक पदार्थ करायला शिकले त्यातला हा एक. सध्या माझी मोठी कन्या सकाळच्या वेळेस घरी असल्याने, आम्हा दोघींसाठी नाष्ट्यामधे धपाटे करायचे ठरवले. अगदी घरातील साहित्य वापरून होणारा पदार्थ पण तरीही अतिशय चविष्ट. साहित्य: ज्वारीचे पीठ, जिरे, ओवा, लसूण, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ - सगळाच मामला अंदाजपंचे ह्यात डाळीचे पीठ आणि कणिक थोड्या प्रमाणात घालतात. कणकेने पिठला थोडा चिकटपणा आल्याने अगदी पातळ धपाटे थापता येतात. (पण आज धपाटे करताना मी ही पीठे घातली नाहीयेत.) कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून भाकरीसाठी जसे पीठ मळून घेतो तसे मळून घेणे. मळलेले पीठ थोडे घट्ट असायला पाहिजे कारण कमीत कमी पीठ लावून धपाटे थापायचे असतात. धपाटे जास्तीत जास्त पातळ थापावेत. धपाटे भाकरीसारखे जरी थापायचे असले तरी भाजताना भाकरीला लावतो तसे पाणी लावायचे नसते. धपाट्याला दोन्ही बाजूला तेल लावून खरपूस भाजून घ्यावे. आणि गरम गरम धपाटे खायला वाढावे...