मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर ...


मुली अगदी लहान बाळ होत्या तेव्हा त्यांना खेळवताना कायम 'मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर ...' हा खेळ खेळला जायचा. छान चारीठाव जेवणाचं ताट वाढलेलं असायचं त्यात. 

प्रत्यक्षात सणावाराला पण असंच ताट वाढून नैवेद्य दाखवला जातो. पण इतरवेळेस बरेचसे पदार्थ जरी बनवले जात असले तरी प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार ताट वाढून घेणार आणि जेवणार. पण आज मात्र न ठरवता असं साग्रसंगीत ताट वाढलं.

झालं असं की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. विशेष काही स्वयंपाक करायचे ठरवले नव्हते. परंतु दर मंगळवारी आमच्याकडे भेंडीची भाजी झालीच पाहिजे असा शिरस्ता आहे. त्यामुळे हीच भाजी करायची ठरवली. मग नेहमीचंच केलं - भाजी, आमटी, वरण-भात, कोशिंबीर, चटणी (जवस + सुके खोबरे + तीळ + कढीपत्ता लसूण घालून), आंबेहळदीचे लोणचे आणि आम्रखंड (घरचेच पण चितळ्यांच्या)!

पण कोशिंबीर करताना लक्षात आलं की गाजर आणि मुळ्याची एकत्र दही आणि कोथिंबीर घालून कोशिंबीर केल्यावर छान रंगीबेरंगी दिसत होती. मग लक्षात आले की लोणच्याचा केशरी रंग, चटणीचा काळपट रंग, कोशिंबिरीचा लाल, पांढरा आणि हिरवा रंग, पिवळसर केशरी आम्रखंड, पांढरा भात त्यावर पिवळं वरण, हिरवी भाजी अन आमटीचा तिचा रंग - असे विविधरंगी पदार्थ आहेत.

माझ्या नवऱ्यालादेखील जेवायचे म्हणले की असं विविधरंगी पदार्थांनी सजलेलं ताट आवडतं. मग काय घेतलं ताट आणि सजवलं निगुतीने! अन देवाला प्रार्थना केली असंच अनेक रंगांच्या अनुभवांनी नटलेलं आयुष्याचं पान ह्या वर्षी लाभो!

तळटीप: बऱ्याचदा पूर्ण स्वयंपाक करून व्यवस्थित पान वाढलेलं असलं तरी भूक लागलेली असणे वगैरे कारणांनी फोटो काढायचा राहून जायचा. आज मात्र नवऱ्याला भूक लागलेली असताना पण ताट सजवून फोटो काढण्याची मोहीम फत्ते केली!





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)