भेंडीची भाजी

परवा डब्यासाठी भाजी करायची म्हणून भेंडी घेतली. भेंडीची भाजी चोरटी होते म्हणून अर्धा किलो घेतली. परंतु सकाळी सकाळी जेव्हा चिरायला घेतली तेव्हा त्यातली निम्मी किडकी निघाली. त्यामुळे झाला असं की डब्यासाठी पुरेशी भाजी झाली नाही आणि किडकी निघाल्याने बघत बघत भेंडी चिरावी लागल्याने  त्यात वेळ बराच गेला. त्यामुळे जीव वैतागून गेला.
मग जेव्हा जेवायला गेले तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना सांगत होते की मी कशी डब्याला पुरावी म्हणून एवढी  भाजी आणली आणि किडकी निघाल्याने मला पुरेशी भाजी आणता आली नाही आणि सकाळी चिरताना वेळ पण गेला. एकूणच मी तक्रारींचा सूर आळवत होते.
माझी एक मैत्रीण म्हणाली की भेंडी किडकी निघाली याचा अर्थ ती चांगली आहे. आम्हाला प्रश्न पडला किडकी भेंडी चांगली कशी असू शकते. तर तिचा त्या मागचा विचार असा की भेंडी किडली ह्याचा अर्थ शेतकऱ्यांनी जास्त कीटकनाशकं त्यावर फवारली नाहीयेत. म्हणजेच मला कमीत कीटकनाशकं मारलेली भाजी मिळाली.
आहे की नाही सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करायची कमाल!
तिने जो विचार केला तो योग्य असेल अथवा नसेल. पण मी विकत आणलेली भाजी किडकी होती हे सत्य होतं. आणि ते मी तक्रार करत स्वीकारावं वा असा सकारात्मक विचार करत स्वीकारावं हा प्रश्न होता.
खरं तर आपण सकारात्मक विचार करण्याबद्दल अथवा प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याबद्दल कायम काही न काही वाचन करत असतो अथवा ऐकत असतो. पण प्रत्यक्षात तसं कृतीमध्ये उतरवणे खरंच अवघड!
माझ्या मैत्रिणीने मात्र भेंडीच्या भाजीच्या निमित्ताने मात्र मला चांगला सकारात्मक दृष्टिकोनाचा धडा दिला... :) 

Comments

  1. :) आहे खरा सकारात्मक दृष्टिकोन.

    ReplyDelete
  2. मनस्विताताई सकारात्मक दृष्टीकोन पटला..

    ReplyDelete
  3. धन्यवाद! अर्थातच हा सकारात्मक दृष्टीकोन माझ्या मैत्रिणीचा आहे... आणि मला मिळालेला तो एक धडा आहे :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)