ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स
गेले काही दिवस ऑफिसमध्ये बरेच काम आहे. घरी सुद्धा श्रावण महिना आणि नंतर गौरी गणपतीमुळे स्वैपाकघरात जरा जास्त वेळ घालवला जातोय. त्यामुळे ब्लॉगवर सलग दुसरी पोस्ट एका खाद्यपदार्थाची आहे. असो.
खूप पूर्वी मी कुठे तरी ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स ही रेसिपी वाचली होती. पण आत्ता ती करून बघायचा योग आला. माझ्या दोन्ही मुलींना हा प्रकार खूप आवडला. ज्वारीचे पीठ वापरले असल्याने पोटभरीचे होते. (मध्ये एकदा आमच्या संध्याकाळच्या स्वैपाकाच्या मावशी आल्या नाहीत तर ह्या नूडल्स आम्ही जेवणात खाल्ल्या.)
नूडल्स साठी लागणारे पदार्थ खालील प्रमाणे:
ज्वारीचे पीठ - १ वाटी
लसूण - २ -३ पाकळ्या
जिरे - १ चमचा
ओवा - १/२ चमचा
कोथिंबीर
हळद (रंग येण्यापुरती)
कांदा - १ बारीक उभे काप करून
तेल - १ चमचा
मीठ
कृती:
१. लसूण, जिरे, ओवा आणि कोथिंबीर सर्व एकत्र मिक्सरवर बारीक करून घ्यावेत.
२. ज्वारीचे पीठ परातीत घेऊन त्यात हळद, मीठ आणि वरील वाटलेले साहित्य मिसळावे.
३. वरील सर्व साहित्यात पाणी मिसळून भाकरीकरता मळतो तसा गोळा मळून घ्यावा.
४. चकली/शेव करायचा सोऱ्या घ्यावा. नूडल्स करण्याकरता बारीक शेव करायची ताटली वापरावी.
५. मळलेल्या पिठाचा गोळा सोऱ्यात भरून स्टीलच्या चाळणीवर त्याची खालील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे नूडल्स/शेव बनवावेत. (चाळणीवर नूडल्स घालायच्या आधी चाळणीला तेलाचा हात लावून घ्यावा.)
६. ही चाळणी ज्या पातेल्यावर व्यवस्थित बसेल अश्या पातेल्यात थोडे पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवून ह्या नूडल्स वाफवायला gas वर ठेवाव्यात.
७. साधारण १० मिनिटात नूडल्स वाफवून होतात.
७. एका कढईमध्ये तेल घेऊन तापवायला ठेवावे.
८. तेल तापल्यावर त्यात कांदा घालून परतून घ्यावा. (आवडत असल्यास टोमाटो तसेच इतर भाज्या पण ह्यात आपण घालू शकतो.)
९. आता ह्यात वाफवलेल्या नूडल्स घालून थोडे परतावे. आणि गरम गरम खायला वाढावे.
टीप:
माझ्या मुलींना कोथिंबीर आवडत नसल्याने मी सजावटीसाठी कोथिंबीरीचा वापर केला नाहीये. तसेच त्या खाणार म्हणून लाल तिखट, हिरवी मिरची अथवा कुठल्याही मसाल्याचा वापर केला नाहीये. आपल्या वैयक्तिक आवडीनुसार आपण इतर पदार्थ वापरू शकतो.
Comments
Post a Comment