हिरव्या रंगाचा चष्मा
ही गोष्ट एकदा शाळेत असताना एका मैत्रिणीने सांगितली होती. त्या मैत्रिणीशी काहीच संपर्क राहिला नाही. पण ह्या गोष्टीच्या रूपाने तिची आठवण मात्र मनावर कोरली गेली. ========================================================= एक आटपाट नगर होतं. त्या नगराच्या राजाला एक सुकुमार मुलगा होता. परंतु अत्यंत गुणी अश्या ह्या राजपुत्राला अचानक एका विचित्र आजाराने पछाडते. त्या राजपुत्राच्या दृष्टीस जर हिरव्या रंगा व्यतिरिक्त जर कुठला दुसरा रंग पडला तर तो सडकून आजारी पडत असतो. झालं! आपल्या पुत्रप्रेमापोटी तो राजा फतवा काढतो की राज्यात सर्वत्र हिरवाच रंग दिसेल अश्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे पूर्ण राजवाड्यात हिरव्या रंगाचे साम्राज्य पसरते. अवती-भवती सर्वत्र केवळ हिरवाई. जमीन असेल तिथे हिरवे गालिचे आच्छादलेले असतात. पण राजा हा केवळ एक माणूसच असल्याने पूर्ण जगात तो हिरवाई आणूच शकत नव्हता. आकाशाचा निळा रंग तो झाकू शकत नव्हता. पुन्हा राजा चिंताग्रस्त झाला. काय करावं सुचेना. तेवढ्यात त्याच्या राज्यात एक साधू-पुरुष हिंडत फिरत आले. त्यांना सर्वत्र दिसणार्या हिरव्या रंगाचे गूढ कळेन...