हत्ती आणि दोरी
ही गोष्ट मला बर्याच दिवसांपूर्वी एका ईमेल मध्ये आली होती. मनाला खूप भावली म्हणून इथे देत आहे.
=======================================================================
एके दिवशी एक माणूस एका गावात चक्कर मारत असतो. तर त्याला तिथे एक विलक्षण दृश्य दिसतं. एक भला-मोठ्ठा हत्ती एका खांबापाशी उभा असतो. आणि थोडं जवळ जाऊन पाहता त्याला असं दिसतं की त्या हत्तीच्या पायाला एक दोरी बांधली आहे आणि तिचं दुसरं टोक त्या खांबाला बांधलेलं आहे. त्या माणसाला प्रचंड आश्चर्य वाटतं की एवढा अजस्त्र हत्ती ती सुतळी तोडून तिथून सुटायचा प्रयत्न न करता तिथेच बंधकासारखा उभा आहे.
तो माणूस त्या हत्तीच्या मालकाला शोधतो आणि त्याला विचारतो की एवढा मोठा हत्ती केवळ पायाला बांधलेल्या दोरीने कसा काय एके जागी बदला गेला आहे? तेव्हा तो मालक सांगतो की तो हत्ती जेव्हा एक लहान पिल्लू होता तेव्हाच त्याच्या पायाला अशी दोरी बांधलेली. त्यावेळेस त्याने ती दोरी तोडून सुटायचा प्रयत्न केला पण त्याची शक्ती कमी पडल्याने सुटू शकला नाही.
आता त्या हत्तीच्या मनात ती दोरी न तुटण्याची भावना ठाम झालेली असल्याने तो ती तोडायचा प्रयत्न करत नाही.
=======================================================================
खरंच असे किती लहान-सहान बंध आपल्याला एका ठिकाणी जखडून ठेवत असतील नाही!
=======================================================================
=======================================================================
आज मी ही पोस्ट टाकली आणि ऑफिसमध्ये अश्याच प्रकारची चर्चा झाली. म्हणलं की ती तुम्हा सर्वांना सांगावी.
तर झालं काय की मी एका सेमीकंडक्टर कंपनीमध्ये काम करते. तर आमच्याकडे एका नवीन प्रोसेसरवर काम चालू झालं आहे. म्हणजे तो प्रोसेसर अजून मार्केटमध्ये यायचा आहे पण आम्ही काम चालू केलं आहे. तर मी आणि माझा मेनेजर तसे अजून कंपनी मध्ये नवीन असल्याने आम्ही जुन्या प्रोसेसरवर काम केलेलं नसल्याने आमची पाटी कोरी आहे. तर जुन्या पेक्षा नवीन प्रोसेसरमध्ये प्रोग्रामिंगसाठी खूप सोयी दिल्या आहेत. पण जे आधीपासून काम करतात त्यांच्या मनात आधीच्या प्रोसेसरसाठीचे रीस्ट्रीक्शंस अजून आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीचे काही जुने बंध आहेत जे त्यांना झुगारून द्यायला कदाचित वेळ लागणार आहे.
Comments
Post a Comment