Posts

Showing posts from April, 2019

उसू पराठा

Image
तर आंतरजालावरच्या एकूण वावरातून असं निदर्शनास आले आहे की पदार्थ काहीही असला तरी नाव आणि फोटो दिलखेचक असले पाहिजेत. त्यामुळे हे नाव. त्यातले घटक पदार्थ काय आहेत हे वाचून तुम्हालाही हे लक्षात येईल. तर सर्वात प्रथम आपण घटक पदार्थ काय आहेत ते बघू. कणिक आदल्या रात्रीची पालक, मेथी आणि चुक्याची पातळ भाजी लसणाच्या दोन पाकळ्या थोडी जिरे पूड हळद तिखट मीठ कृती: सर्व घटक पदार्थ एकत्र करून आणि अगदी गरज लागेल तसे पाणी मिसळून गोळा मळून घ्या. तेलाचा हात लावून १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. आता लहान लहान गोळे करून पराठे लाटून घ्या आणि खरपूस भाजून घ्या. आवडीप्रमाणे चटणी, लोणचे अथवा सॉस ह्यांच्या सोबत ह्या पराठ्यांचा चट्टामट्टा करा. इथे मी चटणी वाढली आहे. चटणी घरचीच आहे पण सोलापूरच्या खैरमोडयांच्या!  😀 तर साहित्य आणि कृती वाचून नावाचा उलगडा झालाच असेल. आणि नसेल तर आता सांगते. उसू पराठा म्हणजे उरलेसुरल्याचा पराठा!  

दिल के टुकडे टुकडे कर के...

Image
सकाळी सकाळी काय माझा देवदास झालाय असं वाटत असेल ना! पण तसं काही नसून कहानी में थोडा twist हैं!  आज सकाळी आलं मनात फ्लॉवरची भाजी करूयात आणि घालू म्हणलं बटाटा त्यात. पण हाय रे कर्मा! बटाटे तर संपले होते. आणि संभाला था मैंने बहोत अपने दिल को म्हणत जो बटाटा बाजूला ठेवला होता तो वापरायची वेळ आली. हाच तो फोटोमधला बटाटा - दिलवाला बटाटा!   मग काय 'दिल के टुकडे टुकडे कर के, मुस्कुरा के चल दिये' म्हणत म्हणत भाजीत घालण्यासाठी त्याचे काप केले. त्याचाही फोटो इथे डकवला आहे. मग म्हणाल मुस्कुरानेवाली मी कुठे आहे? तर सकाळी सकाळी डब्याच्या घाईमध्ये बराच अवतार असतो. म्हणजे दिवसभरात अनेकविध कामे पार पडताना वेगवेगळे अवतार धारण करावे लागतात त्यातलाच एक असतो, पण तरीही त्याचा फोटो काढून चारचौघात दाखवण्यासारखा नसतो. पण सकाळच्या गडबडीचा वेळेत एका बटाट्याने मूड एकदम फिल्मी केला म्हणून इथे त्याचं कौतुक सांगावं म्हटलं.   आता विचाराल की भाजीचा फोटो कुठे आहे? तर भाजी गेली डब्यात भरून.