आठवणी ३ - आठवणींच्या शिंपल्यातले खेड


बारामतीमधून पसारा आवरला आणि पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगरला आम्ही आलो. पुण्यापासून जेमतेम एक तासाच्या अंतरावर असलेले राजगुरूनगर तसे खेडेगावच. म्हणून त्याचे नाव खेडच होते. पण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंपैकी राजगुरू ह्या गावाचे, म्हणून त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ राजगुरूनगर हे नाव ठेवण्यात आले. पण शाळेत कसे खरे नाव असते आणि घरी एखादे लाडाचे आणि तेच आपल्या आवडीचे. तसेच राजगुरूनगरमध्ये राहणाऱ्यांसाठी ते कायमच खेड होते. खेड म्हणजे पुणे-नाशिक हायवेवर नाशिककडे जाताना भीमा नदीवरचा पूल ओलांडल्यावर डाव्या बाजूला उतरले की वसलेले गाव. थोडे अंतर चालले की वेस ओलांडायची आणि मग गावामध्ये प्रवेश.

खेडमध्ये आम्ही ऑगस्ट १९८३मध्ये राहायला गेलो. मी तेव्हा नुकतीच पहिलीत गेले होते. तर तिथे गेल्यावर बाबांनी आधी एका नव्याने बांधलेल्या चाळीत दोन शेजार-शेजारची घरे भाड्याने घेतली. पण अतिशय निकृष्ट प्रतीचे बांधकाम होते. त्यामुळे पावसाळा असल्याने घर गळत होते. मग आईने जवळपास चौकशी केल्यावर कळले की जवळच कटारे वकिलांकडे जागा रिकामी होत आहे. मग आम्ही साधारण २ महिन्यांत तिकडे राहायला गेलो आणि आमचा राजगुरूनगरच्या रहिवासाचा पत्ता ४ वर्षांकरता तोच राहिला. कटारे वकील म्हणजे भाऊसा वकिली करत होते. त्यामुळे गावातले तसे ते मोठे प्रस्थ होते. गावातील त्या काळातील जी मोठी शाळा होती, त्या शाळेच्या ट्रस्टींपैकी एक होते. त्यामुळे आम्ही गावात नवीन जरी राहायला गेलेलो असलो, तरी शाळेत वट निर्माण झाला होता.

कटारे वकिलांची बिल्डिंग म्हणजे एक तीन मजली घर. तळमजला भाड्याने आणि वरील घरात घरमालक राहत होते. घरमालकांच्या म्हणजे भाऊसांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली होती आणि आम्ही तिथे राहायला गेल्यावर मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्यामुळे त्यांच्या घरात भाऊसा, भाभी, त्यांची दोन मुले आणि एक सून अशी माणसे होती. आमचे हे घर अगदी रस्त्यावर होते. तीन पायऱ्या चढून यायचे की एक व्हरांडा लागणार. कित्येकदा भाऊसांचे पत्रकार तिथे येऊन बसत असत. मग व्हरांड्यातून आमच्या घरात यायला दोन दारे - एका दाराने हॉलमध्ये प्रवेश आणि दुसऱ्या दाराने बेडरूममध्ये प्रवेश. आणि तिसरे एक दार होते, त्या दारातून जिन्याने घरमालकांच्या घरी जायचा रस्ता. आमचे हे घर आम्ही आधीच्या ठिकाणी राहत होतो तिथल्या घरांच्या मानाने खूपच प्रशस्त होते. बराच मोठा हॉल आणि बेडरूमही तशीच मोठी. त्या बेडरूमला लागून एक छोटी स्टोअर रूमदेखील होती. स्वयंपाकघरही बऱ्यापैकी मोठे. स्वयंपाकघरात ओटादेखील होता. एक पॅसेज संडास-बाथरूमकडे जाणारा. बाथरूम तर खूपच मोठे. जवळपास आठ बाय सहाचे असेल. मग घराच्या मागे एक हौद आणि धुणे-भांडी करायला जागा. धुण्यासाठी एक मोठा दगडदेखील होता आणि मागे इंग्रजी L आकाराची जागा.

आमच्या घरातील आम्ही चार भावंडे आणि आई-बाबा अशा सहा माणसांपैकी मोठ्या दोघी बहिणी बेडरूममध्ये झोपायच्या आणि आई-बाबा,भाऊ व मी हॉलमध्ये. आम्ही हॉलमध्ये गाद्या टाकून झोपायचो. झोपण्यासाठी गाद्या टाकल्या की मी बाबांना घोडा घोडा करायला लावायची. ते पण चौथीमध्ये असेपर्यंत. बाबा गादीवर २-३ चकरा मारायचे आणि मग म्हणायचे, "घोडं आता खुतलं" आणि मग मी खाली उतरायचे. बाबा माझे इतके लाड करायचे की मी बिनधास्तपणे त्यांच्याशी काहीही बोलायचे. एकदा त्यांना गुढीपाडवा म्हणायला लावलं आणि मग त्यांना म्हटलं, "नीट बोल गाढवा." माझ्या दृष्टीने ती एक गंमत होती. पण गमतीतसुद्धा बाबांना गाढव म्हणायचे नसते हे माहीतच नव्हते. पण बाबांनी ते खेळकरपणे घेतले. एकदा तर त्यांना तुमची जात काय हे विचारायचादेखील उपद्व्याप केला होता. बाबांनी आम्हाला मारणे तर लांबची गोष्ट, साधे रागवयाचेसुद्धा नाहीत. एकदा मी घरात कोणाला तरी उलट बोलले किंवा काहीतरी चुकीचे वागले होते. मग माझी तक्रार बाबांकडे गेली. मग बाबांनी दिवसभर असे केले की मला जवळ घ्यायचे आणि गालावर हात फिरवून म्हणायचे की मी तुझे लाड करतो म्हणजे तू लाडाने वेडे व्हावे असे नाही. दिवसभर हे असे सांगून सांगून, मला जे कळायचे होते ते कळले. मी वागले ते चुकीचे आहे हे दाखवून द्यायची त्यांची ही पद्धत होती.

To err is human ह्यावर माझा गाढा विश्वास असल्याने माझ्याकडून अजून एक प्रकार घडला होता. चौथीत असताना गणिताचा घरचा अभ्यास करायचा विसरले. तर शाळेतल्या बाईंनी सांगितले की जा, बाबांना घेऊन ये शाळेत. मग काय, मधल्या सुट्टीत रडत रडत घरी आले. बाबांना सांगितले, तर बाबा म्हणाले की "मी सांगितले होते का की अभ्यास करू नकोस म्हणून? मी येणार नाही. तुला काय निस्तरायचे आहे ते निस्तर." तेव्हा काही परस्पर निस्तरणे शक्य नसल्याने माझी मोठी बहीण माझ्याबरोबर शाळेत आली. तिला पाहून शाळेतल्या बाई हसायलाच लागल्या. पण ह्या प्रकरणानंतर एक धडा मिळाला की आपल्या चुका शक्यतो आपणच निस्तरायच्या.

आमची शाळा घरापासून इतकी जवळ होती की सकाळी सात वाजताच्या शाळेसाठी आम्ही घरातून सातला पाच कमी असताना निघायचो आणि मधल्या सुट्टीत खाण्यासाठी घरी यायचो. शाळेच्या रस्त्यावरच पोस्ट ऑफिस होते. मग मधल्या सुट्टीत घरी येताना विचारून यायचे की आमचे काही पत्र आहे का. असेल तर घेऊन घरी यायचे. शाळेच्या रस्त्यावरच दोन दुकाने होती. एका दुकानात वह्या, पुस्तके, स्टेशनरीचे साहित्य मिळायचे. त्या दुकानाचे नाव विसरले. तिथे बॉलपेनच्या रिफिलमध्ये शाई भरून मिळायची. आणि त्रिमूर्ती नावाचे दुसरे एक दुकान होते, तिथे ह्या सगळ्या गोष्टी तर मिळायच्याच त्याबरोबरीने खेळणी, कानातली, गळ्यातलीसुद्धा मिळायची. मला त्या दुकानात जायला खूप आवडायचे. दुसरी की तिसरीच्या रिझल्टनंतर आईने मला त्रिमूर्तीमधून एक टी सेट आणि भांडीकुंड्यांचा सेट बक्षीस म्हणून घेतला होता.

शाळेजवळच मंडई होती. फक्त सकाळच्या वेळेस तिथे भाज्या मिळायच्या. तिथेच जवळ पोलीस ठाणे होते. पोलीस ठाण्याच्या आवारात एक कुठले तरी देऊळ होते. त्या देवळात कधी कधी संध्याकाळच्या वेळेस भाऊसा आणि भाभींबरोबर मी गेलेले आठवते. घरापासून शाळेच्या विरुद्ध दिशेला गावातली बाजारपेठ होती. बाजारपेठेच्या इथून आत गेले की एक गढई होती. म्हणजे मला आठवतेय त्याप्रमाणे ते खूप मोठे, मोकळे पटांगण होते. तिथे आठवडी बाजार भरायचा. बाजारपेठेतून सरळ रस्ता नदीपात्राकडे जायचा. उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे ठणठणीत पडलेले असायचे. बाजारपेठेच्या रस्त्यावरून नदीपात्राकडे अशी बैलांची शर्यत असायची. एकदा ती शर्यत बघायला गेले होते, हे आठवते.

खेड म्हणजे अगदी टिपिकल लहान गावासारखे. तिथे मोमीन आळी होती. मोमीन आळीत स्टँडवर बोंबील टाकलेले असायचे. तो वास आवडत नसल्याने नाक दाबूनच तिथून यावे लागे. ब्राह्मण आळी होती. ब्राह्मण आळीत बरेच वाडे होते. माझ्या फारशा कोणी मैत्रिणी तिकडे राहत नसल्याने माझे काही एवढे जाणे व्हायचे नाही. बाजारपेठेच्या आसपास बरेच जैन मारवाडी लोक राहत होते. आमचे घरमालकदेखील जैन मारवाडी. घराजवळच जैन लोकांचे स्थानक होते. गावात ब्राह्मण लोकांचे विठ्ठलाचे मंदिर होते, तसेच शिंपी समाजाचे पण विठ्ठल मंदिर होते. मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर दुसऱ्या विठ्ठल मंदिरात खेळायला जायची. एकदा तर आम्ही त्या विठ्ठल मंदिरात बाहुला-बाहुलीचे लग्न लावले होते. मी, माझी मधली बहीण, माझी मैत्रीण असे आम्ही तयार होऊन वगैरे भरदुपारी लग्न लावायला गेलो होतो. आमचा बाहुला होता म्हणून मैत्रिणीने - जिची बाहुली होती, तिने खेळण्यातली काही भांडी हुंडा म्हणून दिली होती.

गावाबाहेर म्हणजे नदीच्या जवळ सिद्धेश्वर मंदिर आहे. नागपंचमीला आम्ही तिकडे जात असू. बायका-मुली तिथे फुगड्या खेळणे, वडाच्या पारंब्यांना धरून झोके घेणे असे खेळ खेळत असत. सिद्धेश्वर मंदिराजवळच हुतात्मा राजगुरू महाविद्यालय हे कॉलेज आहे. माझ्या मोठ्या बहिणीची अकरावी ह्याच कॉलेजमध्ये झाली. तिच्या वयाच्या मुलींनी मॅक्सी घालायची फॅशन होती.

आमच्या घराच्या आसपास माझ्या वयाचे कोणीच नसल्याने मला दुसरीकडे कुठेतरी जाऊन खेळावे लागे. घराजवळच लिखिते मंदिर म्हणून होते, कधी आम्ही त्याच्या मंडपात जाऊन खेळत असू. मग आमच्या घराच्या मागे एक वस्ती होती, तिथे वर्गातली एक मुलगी राहायची. कधीकधी मी तिच्याबरोबर खेळायला जायचे. तिथे तर सगळ्यांच्या घराची दारे सताड उघडी असल्याने, कोणाच्याही घरात घुसून लपाछपीसाठी लपलेले आठवते. मग माझी एक मैत्रीण - तेव्हाची बेस्ट फ्रेंड बाजारपेठेत राहत होती, तिच्याकडे खेळायला जात असे. माझी ती मैत्रीण बरीच श्रीमंत होती. त्या काळी त्यांच्याकडे गॅसची एजन्सी होती. त्यांच्याकडे अँबॅसॅडर होती. पण तिने कधी पैशांचा तोरा दाखवलेला आठवत नाही. तिच्या आजीने संथारा घेतला होता, ही उगाचच एक आठवण.

खेडमध्ये असताना तसे बरेच प्रकार केले. एके वर्षी आम्ही गणपती बसवायचा ठरवला. जी मैत्रीण बाजारपेठेत राहायची, तिच्याच घरी बसवायचा ठरवला. मग आख्ख्या बाजारपेठेत वर्गणी मागत हिंडलो होतो. कसाबसा गणपती बसवून ते वर्ष पार पाडले आणि पुढच्या वर्षी सगळे विसरून गेलो. एके दिवशी ठरवले की मैत्रिणी-मैत्रिणींनी मिळून, संध्याकाळचे आपापले डबे घेऊन शाळेच्या ग्राउंडवर जायचे. मला अजून आठवते की तेव्हा आईने मला सुसला करून दिला होता. एकदा असेच घराजवळून एक बैलगाडी चालली होती, तर त्यात बसून वेशीपर्यंत गेलो होतो. मधले काही दिवस तर मी बिनचप्पलची फिरत होते असे आठवतेय. असे का, हे मात्र आठवत नाहीये.

खेडच्या शाळेतल्या रिझल्टसंदर्भातल्या काही आठवणी आहेत. खेडमध्ये इयत्ता पहिली हे माझे पहिले शैक्षणिक वर्ष होते. वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी बाबांना म्हटले की माझा पहिला नंबर येणार आहे. असे म्हणत त्यांच्याबरोबर रिझल्ट आणायला गेले आणि गंमत म्हणजे माझा दहावा नंबर आला होता. त्यानंतर बाबांना कधीच रिझल्टसाठी बरोबर नेले नाही. मी अभ्यासाचे काही का दिवे लावेना, पण त्यांच्यामुळे माझा रिझल्ट वाईट लागला असे व्हायला नको, म्हणून नंतर त्यांच्याबरोबर रिझल्ट आणायला कधी गेलेच नाही. मग पुन्हा चौथीत कमाल केली. दुसरीत तिसरा नंबर आला होता आणि तिसरीत दुसरा नंबर आला होता, म्हणून मी जाहीर केले की आता चौथीत माझा पहिला नंबर येणार. नाचत नाचत शाळेत गेले, तर चौथा नंबर आला होता. एकटीच गेले होते, त्यामुळे रडत रडत घरी यायला लागले, तर वाटेत आशू टेलरचे दुकान होते आणि नेमका त्याने शिवलेला फ्रॉक घातला होता म्हणून तो कौतुकाने माझ्याकडे पाहत होता. पण मला रडण्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. काय विचार करून मी स्वतःकडून अशा काही अपेक्षा ठेवल्या होत्या, कोणास ठाऊक!

शाळेच्या अनेक मिश्र आठवणींपैकी एक म्हणजे मारवाडी समाजातील अनेकांकडची लग्ने शाळेत होत असत. गावात लग्नासाठी कार्यालय वगैरे नव्हते ना. एकदा तर आमची शाळा चालू असताना एका लग्नसमारंभाची तयारी सुरू होती. तसेच एकदा सिनेअभिनेता सचिनचा ऑर्केस्ट्रा होता. तोही कार्यक्रम शाळेतच झाला होता.

खेडची आणखीएक आठवण म्हणजे १५ ऑगस्टला आणि २६ जानेवारीला आमच्या शाळेतर्फे प्रभात फेरी निघायची. शाळेचे आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र घोषणा देत, पूर्ण गावात एक फेरी मारायचो. २६ जानेवारीला विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असायचे. ह्या कार्यक्रमासाठी म्हणून एके वर्षी बाबांनी शाळेच्या ग्राउंडवर रोडरोलर फिरवून दिला होता.

एके वर्षी खेडमध्ये खूप दुष्काळ पडला होता. माझ्या मोठ्या बहिणीची दहावीची परीक्षा होती. आणि नेमके पाणी कुठून तरी लांबून भरावे लागत होते. कमी दाबामुळे पाणी घरात येत नव्हते. अभ्यास-परीक्षा असताना मोठी बहीण आईला मदत करत होती. पाणी वाचवण्यासाठी म्हणून आईने पत्रावळ्या आणल्या होत्या. म्हणजे तेवढेच ताटे धुवायला लागणारे पाणी वाचणार. आमची आई फार हिकमती. अवघड प्रसंगांमधून हातपाय न गाळता, कायम काहीतरी मार्ग शोधून काढणार.

खेडमध्ये असतानाच बाबांनी व्हीसीआर घेतला होता. पुण्यात हाँगकाँग लेनमध्ये चंदन कॅसेट लायब्ररी होती, तिथून बाबा हिंदी पिक्चरच्या कॅसेट्स भाड्याने घेऊन यायचे. असे आम्ही व्हीसीआरवर कित्येक पिक्चर पाहिले. बाबांनी ब्लँक कॅसेटसुद्धा आणल्या होत्या. त्यात टीव्हीवर लागणारे कित्येक पिक्चर रेकॉर्ड करून त्यांची पारायणे केली होती. त्याच सुमारास माझ्या भावाची मुंज झाली होती आणि मुंजीत व्हिडिओ शूटिंग केले होते. तेव्हा व्हिडिओ शूटिंग हा प्रकार खूप नवीन होता. आमच्या गावात तर व्हिडिओ शूटिंग करणारे आम्ही दुसरेच होतो. त्यामुळे व्हिडिओ शूटिंगमध्ये आपण यावे म्हणून बाबांच्या ऑफिसमधले कोणीतरी एक जण इतके पुढे पुढे करत होते की बस.

खेडमधले दिवस असेच मजेचे चालले होते. आईने बाबांच्या मागे लागून पुण्यात घर विकत घेण्याचा मोठा निर्णय घ्यायला लावला होता. पण तेवढ्यात बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. पुण्यातल्या घराचा ताबा मिळायला आणखी एक वर्ष होते. भाऊसा म्हणत होते की बाबांनी तिकडे जावे आणि आईने आम्हा मुलांना घेऊन इथेच राहावे. पण नेमके त्या सुमारास आमच्या घरासमोर मिनी थिएटर म्हणून प्रकार सुरू झाला होता आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्हा मुलांना घेऊन तिथे राहणे आईला योग्य वाटले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आमचे चंबूगबाळे आवरायची वेळ आली. नवीन गाव, नवीन अनुभवांना सामोरे जाताना खेडमधल्या आठवणींचे बरेच मोठे गाठोडे बांधून घेतले.

Comments

Popular posts from this blog

माझ्या आवडीची गाणी

अरे संसार संसार...

सुरळीच्या वड्या