अरेच्चा, बघता बघता अर्धशतक गाठलं. आत्ताची ही ५१ वी पोस्ट. सुरुवात केली तेव्हा किती लिहायचं, काय लिहायचं हे काहीच ठरवलं नव्हतं. फक्त लिहायचं एवढंच मनात होतं. त्यामुळे हे अर्धशतक गाठायला किती वेळ घेतला हे खरंच महत्वाचं नाहीये. सध्या तरी लिखाण चालू राहिलेय हीच मला महत्वाची गोष्ट वाटतेय. मी जेव्हा नुकतीच कार चालवायला शिकले होते तेव्हा वेगाचं भारी वेड होतं. (म्हणजे तसं ते पूर्णपणे गेलं नाहीये तरीही!) त्या वेगाच्या पायी इच्छित स्थळाला लवकर पोहोचत तर होते पण कित्येक क्षण काळजाचा ठोका चुकवणारे अनुभवाला यायचे. आता मात्र गाडी चालवताना प्रवास निर्धोक आणि आनंददायी होईल हे बघते. त्यामुळे ब्लॉगिंग मध्ये अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अजून खूप लिहायचं आहे. मन-मोकळेपणाने लिहायचे आहे. पण हा प्रवास सुसाट नसेल कदाचित पण मनाला आनंद देणारा नक्कीच असेल.