पास्ता इन टोमॅटो सॉस

ही रेसिपी मी एका साप्ताहिक सकाळच्या अंकात वाचली आहे. उषा पुरोहितांची आहे. पण खालील रेसिपी माझे काही फेरफार करून केलेली आहे. मुख्य म्हणजे त्यांनी ओव्हन मध्ये बेक करायला सांगितले आहे. पण माझ्या कडे मायक्रोवेव्ह नसल्याने मी बेक केले नाहीये. असो. 
सर्वात आधी मी माझ्या घरच्यांवर हा प्रयोग केला. आणि मग यशस्वी झाल्यावर परवा माझ्या मोठ्या लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीला मोठ्या प्रमाणावर केला. सगळ्यांना खूप आवडला. त्यामुळे इथे त्याची कृती टाकत आहे.

साहित्य:
पास्ता               २०० ग्रॅम
टोमॅटो               ५०० ग्रॅम 
कांदा                 १ 
लसूण                 ४-५ पाकळ्या 
गाजर                  १ 
मीर पूड                चवीनुसार 
ऑलिव तेल          २ चमचे
बटर                    १ चमचा 
मीठ                     चवीनुसार
टॅलियन सिझनिंग चवीनुसार

संपूर्ण कृती तीन टप्प्यांमध्ये विभागता येते. 
१. टोमॅटो सॉस तयार करणे.
२. पास्ता पाण्यात उकळून घेणे.
३. टोमॅटो सॉस आणि शिजवलेला पास्ता एकत्र गरम करणे.

सर्व प्रथम आपण टोमॅटो सॉस करायची कृती बघुयात.
१. टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेणे.
२. लसणाच्या पाकळ्याही बारीक चिरून घेणे.
३. गाजर किसून घेणे.
४. कढईमध्ये ऑलिवचे तेल गरम करायला ठेवणे.
५. गरम तेलात सर्व प्रथम कांदा परतून घेणे.
६. कांदा थोडा परतला गेला की लसूण आणि किसलेले गाजर घालणे. हे मिश्रण थोडे परतणे.
७. त्यावर चिरलेला टोमॅटो घालून परतणे.
८. ह्या मिश्रणातला पाण्याचा अंश पूर्णतः जाऊन ते व्यवस्थित शिजेल एवढा वेळ गॅसवर ठेवायचे आहे. (सतत जरी परतले नाही तरी अधून मधून खाली लागत नाहीये न ह्याची काळजी घेत परतावे.)
९. ह्या मिश्रणात मिरपूड घालावी.
१०. पूर्ण शिजलेले मिश्रण कढईतून काढून गार करायला ठेवावे. 
११. गार झालेले मिश्रण मीठ घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. हा झाला टोमॅटो सॉस तयार.

पास्ता शिजवणे.
सहसा ह्याची कृती पास्ताच्या पॅकेटवर दिलेली असते. तरीही पुन्हा एकदा खाली देत आहे.
१. साधारण १०० ग्रॅम पास्ता साठी १ लिटर पाणी गरम करायला ठेवणे.
२. पाण्याला उकळी आली असता त्यात पास्ता घालणे.
३. साधारण ५-१० मिनिटात पास्ता शिजतो.
४. शिजलेला पास्ता एखाद्या स्टीलच्या चाळणीत अथवा रोवळीत काढून त्यावर गार पाणी घालावे. (त्याने पास्ता एकमेकांना न चिकटता सुटा होतो.)



वर नमूद केलेल्या दोन्ही गोष्टी ( टोमॅटो सॉस आणि पास्ता शिजवणे) आपण आधी करून ठेवू शकतो. ऐन वेळेस शेवटची स्टेप करू शकतो.
१. कढईमध्ये बटर गरम करून त्यात शिजवलेला पास्ता घालणे.
२. त्यात तयार टोमॅटो सॉस घालणे. (सॉस पास्ताला व्यवस्थित लागला पाहिजे.)
३. आवडीनुसार टॅलियन सिझनिंग घालणे.
४. सर्व मिश्रण एकजीव होवून गरम झाल्यावर आवडत असल्यास वरून चीज घालून गरम गरम वाढणे.

टीप: टॅलियन सिझनिंग मला पुण्यातील ग्राहक पेठेत मिळाले होते. त्यात वेग-वेगळ्या हर्ब्स वाळवून एकत्र केलेल्या आहेत. ताजे हर्ब्स सुद्धा वापरत येऊ शकतात.
=======================================================================
माझ्या लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीला मी साधारणपणे २०-२५ लोकांसाठी पास्ता बनवला होता. त्यासाठी टोमॅटो सॉस आदल्या दिवशी बनवला होता. आणि पास्ता दुपारीच शिजवून, संध्याकाळी ऐन वेळेस सर्व एकत्र करून गरम केले होते.
त्या दिवशी मी बरेच घोळ घातले होते. म्हणजे सकाळी सत्यनारायणाची पूजा. संध्याकाळी मुलांसाठी पास्ता आणि मोठ्यांसाठी पनीर बटर मसाला, पुलाव, दाल फ्राय आणि पोळ्या सा बेत असा बेत होता. त्यामुळे मला फोटो काढणे जमले नाही. तरी तयार पास्ताचा एक फोटो टाकत आहे.

आणि हा माझ्या मुलीचा पास्ताची वाट बघतानाचा फोटो.




Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा