निर्लेप

काल 'सकाळ' मध्ये मुक्तपीठ सदरातला लेख वाचला. तो एका स्त्रीरोगतज्ज्ञाने लिहिला होता. त्याचा सारांश असा होता की एक  मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्यांच्याकडे येत होती. त्या मुलीचे वागणे अतिशय संयत आणि तिचा नवरा एकूण कमी बोलणे, भावना कमी व्यक्त करणे हे सदरातला होता. त्या डॉक्टरना तिच्या नवर्याच्या वागण्याबाबत आश्चर्य वाटत होते. त्यात त्या मुलीची तारीख जवळ यायला लागल्यावर ती तिच्या आई सोबत येऊ लागली. तेव्हाही त्या डॉक्टरना असेच वाटले की त्याने (नवर्याने) अजूनच अंग काढून घेतले. 
यथावकाश त्या मुलीला प्रसूतिवेदना सुरु झाल्या आणि ती त्या अत्यंत धीराने सोसत होती. कळ आल्यावर केवळ तोंड थोडे वाकडे होत असे. पण ती कायम कसला तरी जप करत होती. तिला एक मुलगा झाला. बालरोगतज्ज्ञांनी त्याला तपासले आणि बाळाला घरच्यांच्या सुपूर्द केले. बाळ झाल्यावर त्या नवर्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित झळकले. परंतु दुर्दैवाने ते बाळ दुसर्याच दिवशी काही कारणांनी मृत्युमुखी पडले. बाळाच्या आईला धक्का बसू नये म्हणून तिला बाळ सिरीयस हे असे सांगितले आणि बाळाच्या बाबांना मात्र बोलावून घेऊन सत्यपरिस्थितीची कल्पना दिली. त्यावेळेस त्याने २ मिनिटे शांत बसून खिशातून एक जपमाळ काढून जप केला.  त्या २ मिनिटात तो एकदम शांत झाला आणि शांतपणे परिस्थितीचा स्वीकार केला.


त्या नंतर त्या बाळाच्या आईला हळू हळू मानसिक तयारी करून कल्पना देण्यासाठी बाळ खूप सिरीयस  आहे असे सांगायला सुरुवात केली असता ती म्हणाली की बाळाला जेव्हा खोलीतून नेले तेव्हाच तिला कल्पना आली होती. आणि डॉक्टरांना तसेच तिच्या नवर्याला सेटल होता यावे म्हणून ती काही बोलली नाही. नंतर त्या दोघांनी सांगितले की ते दोघंही गोंदवलेकर  महाराजांची उपासना आणि नामस्मरण करतात.  आणि त्यामुळे भावनाविवश न होता ते परिस्थितीला शांतपणे सामोरे जाऊ शकले. असो.


तर आपण एखादं वाचन करतो तेव्हा आपल्याशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक त्यामुळे माझं मन अस्वस्थ झालं असावं. ज्या व्यक्तींचा अनुभव तिथे मांडला होता ते दोघं जास्तीत जास्त तिशीत असणार आहेत. (आजकालच्या सभोवतालच्या परिस्थितीनुरूप काढलेला हा वयाचा अंदाज.) नुकतीच आयुष्याची सुरुवात असताना हे असं निर्लेप असणं मला तरी फार अस्वस्थ करणारं वाटलं. भावनेच्या भरात वाहावून जाणे जरी अपेक्षित नसले तरी वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेणे, त्यात भिजून जाणे, त्या व्यक्त करणे हे सर्व किती स्वाभाविक वाटते. कदाचित त्यामुळे हे असं कोरडेपण मला अंगावर आल्यासारखे वाटले. 

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा