एका बेडकाची गोष्ट

माझी आधीची कंपनी सर्व्हिस बेस्ड कंपनी असल्याने बिहेवियरल ट्रेनिंग बरीच असायची. असंच एक ट्रेनिंग केलं होतं त्यात आमच्या ट्रेनरने ही बेडकाची गोष्ट सांगितली होती. मनात कायमच्या राहिलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे.
=====================================================================
एकदा काही संशोधक एका बेडकावर प्रयोग करत होते. प्रयोग असा होता की बेडूक किती तापमानाचे गरम पाणी सहन करू शकतो. सर्व प्रथम त्यांनी पाण्याचं तापमान ९० अंश ठेवलं. म्हणजे पाणी उकळायला लागाच्या आधीचं तापमान. त्यांनी बेडकाला त्या पाण्यात टाकलं तसं त्याने टुणकन बाहेर उडी मारली. मग संशोधकांना वाटलं की हे तापमान खूप जास्त होत आहे म्हणून त्यांनी पाण्याचं तापमान बरंच कमी केलं आणि ५० अंश ठेवलं. पुन्हा बेडकाला त्यात टाकलं तर त्याने पुन्हा पाण्याबाहेर उडी मारली. पाण्याचं तापमान अजून कमी केलं. ४० अंश ठेवलं. पण ते तापमान पण बेडकाला सहन झालं नाही आणि त्याने बाहेर उडी मारली.

मग संशोधकांनी विचार केला की बेडकाला पाण्यातच ठेवायचे आणि हळू-हळू पाण्याचे तापमान वाढवायचे. म्हणजे त्यांना नक्की कळेल की कुठल्या तापमानाला बेडूक पाण्याबाहेर उडी मारतो ते. 

झालं. मग त्यांनी पाण्याचा तापमान सर्वसामान्य तापमानापासून सुरुवात करून हळूहळू वाढवायला चालू केले. पाण्याचे तापमान ३५ अंश, ३६ अंश, ३७ अंश असं करत करत ४० अंशांपर्यंत पोहोचले तरी बेडकाने काही हालचाल केली नाही. 

बेडकाने ४० अंश तापमान झाले तरी पाण्या बाहेर उडी मारली नाही म्हणून संशोधकांना जरा संशय आला आणि त्यांनी तपासलं तर तो बेडूक मरण पावला होता. 

तर झालं काय की जस जसं पाण्याचं तापमान वाढत गेलं तस तसा तो बेडूक स्वतःला परिस्थितीनुरूप अडजस्ट करत होता. पण एक वेळ अशी आली की त्या बेडकाला पाण्याचं तापमान सहन झालं नाही आणि तो मारून गेला. हळू हळू वाढत असलेल्या तापमानामुळे त्याला लक्षातच आले नाही की पाण्याचं वाढतं तापमान आपल्याला सोसावण्याच्या पलीकडच आहे आणि आपण पाण्यातून बाहेर यायला हवं.
=====================================================================
आपल्याही बाबतीत काही अंशी असंच होतं. आपल्या आयुष्यात अनेक ताणतणाव येत असतात. आणि आपण ते झेलून आपलं आयुष्य जगात किंवा जगायचा प्रयत्न करत असतो. पण असे ताण आपण किती सहन करायचे कारण रबर जसं एका मर्यादेच्या पुढे ताणलं की तुटून जातं तसंच आपल्याही बाबतीत घडू शकतं.

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा