Posts

Showing posts from July, 2018

गुरूवंदना

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः  गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता, विष्णू हा ह्या विश्वाचा पालनकर्ता आणि महेश हा विनाशक.  तसेच गुरु हा देखील ब्रह्माप्रमाणे विदयार्थ्यांच्या मनात ज्ञानाचे बीज रुजवून सर्जनशीलतेचा निर्माता, विष्णूप्रमाणे दिलेल्या ज्ञानाचे संवर्धन करणारा; तसेच महेशाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा विनाश करणारा असतो. गुरु हा परब्रह्मासमान आहे. अश्या ह्या गुरूला मनोभावे नमस्कार! Brahma is the creator of this universe, Vishnu is the one who maintains it whereas Mahesh is the destroyer.  Similarly, like Brahma Guru sows the seed of knowledge in Vidyarthis' mind so as to let them bloom their creativity. Like Vishnu, Guru helps maintaining their knowledge, And like Mahesh, Guru destroys the ignorance from their mind.  Guru is the 'Parabrahma'. We bow down in front of such a Guru!

तुम बिन जाऊँ कहां.. (शतशब्दकथा)

रोजच्यासारखी मुले शाळेला गेली होती. आता शलाकाने आदित्यच्या डब्याची तयारी सुरु केली. जणूकाही एक शर्यत संपली होती आणि क्षणाचीही उसंत न घेता दुसऱ्या शर्यतीसाठी धावायचे होते. करायची कामे आणि हातातील वेळ यांचं व्यस्तप्रमाण तिच्यावरचे दडपण वाढवत होते. तेवढ्यात आदित्यच्या हातून फ्रिजमधून काढलेली अंडी खाली पडली. झालं शलाकाचा पारा चढला आणि ती त्याला फाडफाड बोलू लागली. खरंतर सकाळच्या कामात मदत करताना झालेला हा अपघात होता त्यामुळे आदित्यही वैतागला. बस झाली ही कटकट, जातोच ऑफिसला म्हणून तो वळला आणि रेडिओवर गाणे लागले 'तुम बिन जाऊँ कहां..' क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ओठांवर स्मितहास्य झळकले. अचानक वातावरणातला ताण निवळला अन् शलाकाचाही चेहरा खुलला!

लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग २)

Image
भाग १: http://mana-tarang.blogspot.com/2018/07/blog-post_9.html पूर्वतयारी आणि पूर्वप्रवास १. ह्या प्रवासाच्या तयारीमध्ये अनेक गोष्टी होत्या. प्रत्यक्ष प्रवासाची बॅग भरणे, औषधपाणी घेणे, नवरा आणि मुलींना सोडून जात असल्याने त्यांच्याशी बोलणे, त्यांना घरात काही खायला-प्यायला लागेल त्याची तयारी करून ठेवणे. असं ट्रीपला जायचं हा निर्णय तर झाला होता. परंतु हा निर्णय का घेतला ह्यामागची भूमिका मुलींना समजावून सांगणे फार महत्वाचे वाटले. कारण तश्या त्या लहान आहेत - मोठी १४ वर्षांची आणि धाकटी १० वर्षांची. त्यांना सांगितले की कुठल्याही जबाबदारीचे ओझे न बाळगता आम्हा तिघींना एकत्र वेळ घालवायचा आहे. तिघींपैकी कोणाच्या घरी जमले तर घराच्या जबाबदाऱ्या संपत नाहीत आणि आईकडे गेले तर तिला कामाचा त्रास होऊ नये म्हणून तिच्याकडे थोडीफार कामाची जबाबदारी घ्यावीच लागते. त्यामुळे सारखा कुठली ना कुठली भूमिका वठवावीच लागते. ही सहल फक्त आमच्या आम्हीच आणि कुठल्याही प्रकारच्या जबाबदारीची झूल न पांघरता करायची सहल होती. माझ्या मुली खूपच समजूतदार असल्याने त्यांनी तसा काहीच आक्षेप घेतला नाही. माझे सासू-स...

लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग १)

प्रस्तावना: १.  मे २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात लेह, लडाखला जाऊन आले. ह्या प्रवासाचे वर्णन नक्की लिहून काढायचे असे ठरवले होते. मग नाव काय द्यायचे त्याचा विचार सूरु केला. आजकाल इंग्लिशमधेच बऱ्याचदा विचार करायची सवय झालेली असल्याने, सुरुवातीला नावसुद्धा इंग्लिशच सुचलं - Leh Ladakh Trip - A Journey Within! पण मग बाकीचे लेखन मराठीमध्ये करणार असल्याने हे नाव कसं चालणार, म्हणून मग पुन्हा विचार सुरु केला. ह्या इंग्लिश नावाचे मला वाटणारे 'लेह लडाख सहल - एक अंतर्मनातला प्रवास' असे भाषांतर सुचले. पण ते फारंच कृत्रिम वाटले. मग पुन्हा नावासाठीचा शोध आणि विचार सुरु झाला.  मग विचार केला की हा प्रवास, मी माझ्यापुरती चाकोरी मोडून केलेला आहे. म्हणजे खरंतर लेह-लडाख हा प्रवास कित्येक लोक सायकल, बाईक किंवा स्वतःची कार घेऊन करतात. पण माझा प्रवास तर 'वीणा वर्ल्ड' सारख्या सहलींचे नियोजनपूर्वक आयोजन करणाऱ्या कंपनीतर्फे एका ३० लोकांच्या समूहाबरोबर केलेला प्रवास होता. मग एवढी काय मोठी गोष्ट! तर हा प्रवास मी माझा नवरा आणि मुली ह्यांच्यासोबत न करता बहिणींबरोबर केला. तसं पाहायला गेलं...

अधुरी एक कहाणी... (शतशब्दकथा)

पाऊस सुरू झालेला पाहून अॅना मोहरली. फेलिक्सने ज्याला ती लाडाने फेलिस म्हणायची, नुकतीच तिला मागणी घातली होती. आज संध्याकाळी त्यांच्या मीलनाचा मुहूर्त ठरला होता. मीलनाची ओढ आणि हा पाऊस तिची हुरहुर वाढवत होता.  दिवसभर पडणारा संततधार पाऊस आता थांबला होता. प्रणयरंगात रंगण्यासाठी दोघांनी एक जागाही शोधली होती. बागेतला हवा तसा एकांत देणारा कोपरा होता तो.  ती घटिका आली आणि फेलिस तिथे पोहोचला तेव्हा अॅना त्याची वाटच पाहत होती. त्याला पाहून अॅना झक्क लाजली. फेलिसने तिला आपल्या बाहुपाशात ओढले आणि...  'डासांचा प्रादूर्भाव टाळा आणि मलेरिया दूर पळवा' अशी घोषणा करत महानगरपालिकेची गाडी औषधाच्या धूराचा झोत त्या बागेच्या कोपर्यान् कोपर्यात मारून गेली!