तुम बिन जाऊँ कहां.. (शतशब्दकथा)

रोजच्यासारखी मुले शाळेला गेली होती. आता शलाकाने आदित्यच्या डब्याची तयारी सुरु केली. जणूकाही एक शर्यत संपली होती आणि क्षणाचीही उसंत न घेता दुसऱ्या शर्यतीसाठी धावायचे होते. करायची कामे आणि हातातील वेळ यांचं व्यस्तप्रमाण तिच्यावरचे दडपण वाढवत होते.

तेवढ्यात आदित्यच्या हातून फ्रिजमधून काढलेली अंडी खाली पडली. झालं शलाकाचा पारा चढला आणि ती त्याला फाडफाड बोलू लागली. खरंतर सकाळच्या कामात मदत करताना झालेला हा अपघात होता त्यामुळे आदित्यही वैतागला.

बस झाली ही कटकट, जातोच ऑफिसला म्हणून तो वळला आणि रेडिओवर गाणे लागले 'तुम बिन जाऊँ कहां..'

क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ओठांवर स्मितहास्य झळकले. अचानक वातावरणातला ताण निवळला अन् शलाकाचाही चेहरा खुलला!

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा