लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग २)
पूर्वतयारी आणि पूर्वप्रवास
१.
१.
ह्या प्रवासाच्या तयारीमध्ये अनेक गोष्टी होत्या. प्रत्यक्ष प्रवासाची बॅग भरणे, औषधपाणी घेणे, नवरा आणि मुलींना सोडून जात असल्याने त्यांच्याशी बोलणे, त्यांना घरात काही खायला-प्यायला लागेल त्याची तयारी करून ठेवणे.
असं ट्रीपला जायचं हा निर्णय तर झाला होता. परंतु हा निर्णय का घेतला ह्यामागची भूमिका मुलींना समजावून सांगणे फार महत्वाचे वाटले. कारण तश्या त्या लहान आहेत - मोठी १४ वर्षांची आणि धाकटी १० वर्षांची. त्यांना सांगितले की कुठल्याही जबाबदारीचे ओझे न बाळगता आम्हा तिघींना एकत्र वेळ घालवायचा आहे. तिघींपैकी कोणाच्या घरी जमले तर घराच्या जबाबदाऱ्या संपत नाहीत आणि आईकडे गेले तर तिला कामाचा त्रास होऊ नये म्हणून तिच्याकडे थोडीफार कामाची जबाबदारी घ्यावीच लागते. त्यामुळे सारखा कुठली ना कुठली भूमिका वठवावीच लागते. ही सहल फक्त आमच्या आम्हीच आणि कुठल्याही प्रकारच्या जबाबदारीची झूल न पांघरता करायची सहल होती. माझ्या मुली खूपच समजूतदार असल्याने त्यांनी तसा काहीच आक्षेप घेतला नाही.
माझे सासू-सासरे पण अतिशय समजूतदार आणि सहकार्य करणारे त्यामुळे त्यांनीदेखील ८ दिवस मुलींना सांभाळायची जबादारी अत्यंत आनंदाने स्वीकारली. आणि नवऱ्याने पण ८ दिवस घर सांभाळायची जबाबदारी घेतली. प्रवासाच्या २-३ दिवस आधी थोडाफार खाऊ घरातल्यांची करून ठेवला. त्यामुळे माझ्या पूर्वतयारीमधला एक महत्वाचा भाग पार पडला होता.
प्रत्यक्षात प्रवासाची मुख्य तयारी म्हणजे बॅग भरायला मात्र मी फक्त २-३ दिवस आधीच सुरु केले. तेव्हा मी आमच्या प्रवासाचे वेळापत्रक पाहिले. साधारण गूगलवर तिथे काय तापमान असते हे पहिले आणि प्रत्येक दिवसानुरूप कपडे ठरवले. फार कपडे बरोबर घेऊन ओझे करायचे नाही हे ठरवले होते. त्यामुळे २ जीन्स, ३ टॉप, १ स्कर्ट आणि १ सलवार-कुर्ता एवढेच कपडे घेतले. थंडी असणार म्हणून थर्मल, २ स्वेटर, कानटोपी, हातमोजे एवढा जामानिमा केला. पण आता प्रश्न होता टी कुठली बॅग घेऊन जायची त्याचा. मी एकटी कुठेच जात नसल्याने आमच्या लहान मापाची बॅगच नव्हती. २ बॅग्ज ज्या लोकं परदेशी जाण्यासाठी वापरतात एवढ्या मोठ्या. ह्या प्रवासासाठी नवीन बॅग घ्यायचं जीवावर आलं म्हणून मग मोठीच बॅग घेऊन जायचं ठरवलं. त्यामुळे माझं एकटीचे सामान त्या बॅगेच्या एका कोपऱ्यात बसले होते. पण पर्याय नव्हता कारण विमानाचा प्रवास असल्याने साधी बॅग घेऊन चालणार नव्हते. माईने माझी ही बॅग बघितल्यावर तिला कळेचना एवढी मोठी बॅग कशासाठी. मी चेष्टेमध्ये म्हणलं की मी खूप खरेदी करणार आहे. मग ती पण मला तथास्तु म्हणली!
एवढा लांबचा प्रवास म्हणाला की औषधांची पण जय्यत तयारी हवी. त्यामुळे क्रोसिन, पित्तावरच्या गोळ्या, पोट बिघडले तर त्यावर औषधे, आलेपाक अशी सगळी औषधे बरोबर घेतली. खाण्यापिण्याचा मात्र काही घेतलं नाही कारण वीणा वर्ल्डचे लोक बराच खाऊ देतात जो प्रवासात पुरून उरतो.
ह्यात एक-दोन गोष्टी नमूद करायच्या म्हणजे ही सर्व तयारी करताना आमचा जरा अभ्यास कमी पडला. ह्याआधी थंड हवेच्या ठिकाणी गेलेलो असलो तरी तिथली थंडी आणि लडाखची थंडी ह्यात बराच फरक आहे. तसेच माझं गृहीतक की थंड हवेच्या ठिकाणी मला पित्ताचा त्रास होणार नाही हे चुकीचं ठरलं. असो.
२.
मागच्या भागात लिहिले तसे मला आणि ताईला पुणे ते ठाणे हा एक प्रवास करायचा होता. विमान मुंबईहून असले तरी माई ठाण्याला राहत असल्याने आम्ही आधी ठाण्याला जायचे ठरवले. तसेच विमान २३ तारखेला पहाटे ४ वाजता होते. म्हणजे आम्हाला विमानतळावर किमान रात्रीच्या २ पर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. त्यामुळे आम्ही दोघींनी २२ तारखेला सकाळीच ठाण्याला जायचे ठरवले. कारण संध्याकाळी निघाले तर नवी मुंबईनंतर ट्रॅफिक लागणार आणि दुपारी निघाले तर भरपूर ऊन असणार. त्यामुळे आम्ही सकाळी निघून ठाण्यात थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्यामुळे एकदा आम्ही ठाण्यासाठी गाडीमध्ये बसलो की आमचा प्रवास सुरु होणार होता. त्यामुळे प्रवास सुरु व्हायच्या आधीची तगमग आमची २२ तारखेला सकाळीच संपणार होती.
सकाळी ८:३० च्या शिवनेरीने जायचे ठरले. (८:३० ची शिवनेरी वनाझच्या स्टॉपला ९ पर्यंत येते.) मग नाश्त्याचे काय करायचे. मग माझे धाकटेपण इथेच सुरु झाले. ताईला म्हणलं की तूच उप्पीट कर, मला माझ्या हातचं खायचा कंटाळा आला आहे. तिनेपण अगदी आनंदाने होकार दिला. आम्ही ८:१५ वाजता बसस्टॉपवर पोहोचलो. तर एक शिवनेरी उभी असलेली दिसली. चौकशी केली तर ती ठाण्याला जाणारी ८ वाजताची गाडी होती. आम्ही त्यांना विचारलं की ? आमचं पुढच्या गाडीचे बुकिंग आहे परंतु आत्ताच्या गाडीमध्ये जागा असेल तर आम्ही बसू का? कंडक्टरने ठीक आहे म्हणले. त्यामुळे आमचा प्रवास थोडा आधीच सुरु झाला.
जसा आमचा प्रवास सुरु झाला तश्या आमच्या दोघींच्या गप्पा सुरु झाल्या. कुठल्याही विषयाचे बंधन नाही. म्हणजे पूर्ण बसमध्ये फक्त आम्ही दोघीच पूर्णवेळ गप्पा मारत होतो. मध्ये नाश्ता करत असताना तोंडाला दुसरे काही तरी काम होते म्हणून काय त्या गप्पा बंद असतील! पण ह्या सहलीचे प्रयोजनच एकमेकांबरोबर पूर्ण वेळ घालवणे असल्याने हा मिळालेला वेळीदेखील ह्याच कारणी लावला.
साधारण १२:३० पर्यंत आम्ही माईच्या घरी पोहोचलो. जेवणंवगैरे उरकून ३ च्या सुमारास तिघीही एकत्र आडव्या झालो. पण मग पुन्हा गप्पांचं सत्र सुरु झाले. ह्यावेळेस मात्र ताईने झोपायचे ठरवले. पण मी मात्र स्वतः जागं राहून माईला पण जागं राहायला लावलं आणि आम्ही गप्पा मारत बसलो.
संध्याकाळी मात्र चहा वगैरे उरकल्यावर बाहेर चक्कर मारून यायची ठरवली. लेह, लडाखला भारतीय सैनाईकांची बरीच ठाणी आहेत. आणि हे सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिथे राहत असल्याने आम्ही त्यांच्यासाठी मिठाई घेऊन जायचे ठरवले. मग माईच्या घराजवळच्या मिठाईच्या दुकानात जाऊन खाण्याचे १-२ प्रकार घेतले. ते ओझं अर्थातच माझ्या अतिप्रचंड आणि खूप रिकाम्या असलेल्या बॅगेमधे ठेवायचे ठरले. ठाण्यामध्ये (माई ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते तिथे तरी) सर्रास हिंदीचाच वापर चालतो. तो दुकानदारही हिंदीमध्येच बोलत होता. पण मला हिंदीमध्ये बोलायचा अतिशय कंटाळा आणि मराठी भाषेचा जाज्ज्वल्य अभिमान असल्याने मी मराठीमध्येच बोलत होते. शेवटी तो दुकानदारदेखील मराठीमध्ये बोलू लागला. मला म्हणाला की तुमची कोणी बहीण इथे राहाते का? मी म्हणलं ही काय आता बरोबर आहे ती (म्हणजे माई). तर म्हणे नाही अजून दुसरी कोणी? म्हणलं ही दुसरीपण माझी बहीणच आहे. तर म्हणे नाही, त्या कॉम्प्लेक्समध्ये अजून कोणीतरी राहतात त्यादेखील कायम मराठीमध्येच बोलतात आणि थोड्याफार माझ्यासारख्या दिसतात.
घरी परत येऊन नवीन घेतलेलं हे सामान बॅगेत भरून जेवणवगैरे उरकले. ठाण्याहून विमानतळावर जाण्यासाठी एक कॅब बुक केली होती. ते कॅबचे ड्राइवर माझ्या ठाण्याच्या भाऊजींचे चांगल्या ओळखीचे होते. त्यामुळे रात्री १२:३० वाजता आम्ही निश्चितपणे निघणार होतो. वाटेत गर्दी लागून उशीर होऊ नये म्हणून आम्ही जरा जास्तच लवकर निघालो होतो. आणि १:३० च्या आत विमानतळावर आम्ही चौघी पोहोचलोदेखील.
चौघी???
आमचं ठरलं तर होतं तिघींचं मग ही चौथी कोण? तर माईची मुलगी - श्रेया जिची नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती तीदेखील आमच्याबरोबर आली होती. त्याचं झालं असं की तिच्या अनेक एंट्रन्स परीक्षा मे महिन्याच्या काळात होत्या. आमचं तिघींनीच जाण्याचं ठरलं होतं. परंतु २ वर्षे सतत केलेला अभ्यास आणि त्याबरोबरीने असलेला ताण ह्याला वैतागून श्रेयाला देखील आमच्याबरोबर यायचे होते. आणि नेमक्या आमच्या सहलीच्या तारखेच्या आधीच तिच्या सगळ्या परीक्षा संपल्याने ती आमच्याबरोबर येऊ शकत होती.
त्यामुळे आम्ही तिघी मुरलेल्या वाईनसारख्या आणि श्रेया एक फसफसतं कोल्डड्रिंकसारखी असं चौघींचं कॉकटेल निघालं सहलीला!
क्रमशः
Comments
Post a Comment