अधुरी एक कहाणी... (शतशब्दकथा)
पाऊस सुरू झालेला पाहून अॅना मोहरली. फेलिक्सने ज्याला ती लाडाने फेलिस म्हणायची, नुकतीच तिला मागणी घातली होती. आज संध्याकाळी त्यांच्या मीलनाचा मुहूर्त ठरला होता. मीलनाची ओढ आणि हा पाऊस तिची हुरहुर वाढवत होता.
दिवसभर पडणारा संततधार पाऊस आता थांबला होता. प्रणयरंगात रंगण्यासाठी दोघांनी एक जागाही शोधली होती. बागेतला हवा तसा एकांत देणारा कोपरा होता तो.
ती घटिका आली आणि फेलिस तिथे पोहोचला तेव्हा अॅना त्याची वाटच पाहत होती. त्याला पाहून अॅना झक्क लाजली. फेलिसने तिला आपल्या बाहुपाशात ओढले आणि...
'डासांचा प्रादूर्भाव टाळा आणि मलेरिया दूर पळवा' अशी घोषणा करत महानगरपालिकेची गाडी औषधाच्या धूराचा झोत त्या बागेच्या कोपर्यान् कोपर्यात मारून गेली!
Comments
Post a Comment