माया
सध्या राहते त्या सोसायटीमध्ये राहायला येऊन साधारण १५ वर्षे झाली. नुकतीच राहायला आले तेव्हा इथे राहणाऱ्या लोकांच्या थोड्याफार ओळखी होत होत्या. तशी आमची सोसायटी छोटेखानी म्हणजे तीन बिल्डिंगचीच आहे. आणि सोसायटीत मध्य भागात एक कट्टा आहे तिथे महिलामंडळ बसलेलं असतं. तर संध्याकाळी चक्कर मारायला बाहेर पडलं की महिलामंडळाची भेट व्हायची. तिथल्या काकवांचा वयोगट साधारण ४०-४५ च्या पुढचा. छान गप्पा, हसणे-खिदळणे ऐकू यायचे. पण त्यांच्यात अजून एक दणदणीत आवाज ऐकू यायचा. आणि व्यवस्थित पाहिले तर त्या ग्रूपमध्ये सर्वांच्या मानाने खूपच तरुण आणि उत्साही 'ती' दिसायची. कट्ट्यावरच्या बायकांमध्ये तरुणाई आणि चैतन्य घेऊन येणाऱ्या तिचे काही दिवसातच नाव कळले - माया! राहायला ती अगदी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये. साधारण साडेपाच फूट उंची असलेली, तब्यतीने दणकट, गहूवर्णी आणि तरतरीत अशी ही माया. नंतर कळले की ती मूळची दाक्षिणात्य. परंतु अनेक वर्षे मराठीबहुल भागात राहत असल्याने इंग्लिश-हिंदीमिश्रित मराठी बोलणारी. वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास आणि सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून राहायचे तिचे कसब अगदी वाखाणण्याजोगे. तिचे कपडे...