माया

सध्या राहते त्या सोसायटीमध्ये राहायला येऊन साधारण १५ वर्षे झाली. नुकतीच राहायला आले तेव्हा इथे राहणाऱ्या लोकांच्या थोड्याफार ओळखी होत होत्या. तशी आमची सोसायटी छोटेखानी म्हणजे तीन बिल्डिंगचीच आहे. आणि सोसायटीत मध्य भागात एक कट्टा आहे तिथे महिलामंडळ बसलेलं असतं. तर संध्याकाळी चक्कर मारायला बाहेर पडलं की महिलामंडळाची भेट व्हायची. तिथल्या काकवांचा वयोगट साधारण ४०-४५ च्या पुढचा. छान गप्पा, हसणे-खिदळणे ऐकू यायचे. पण त्यांच्यात अजून एक दणदणीत आवाज ऐकू यायचा. आणि व्यवस्थित पाहिले तर त्या ग्रूपमध्ये सर्वांच्या मानाने खूपच तरुण आणि उत्साही 'ती' दिसायची. कट्ट्यावरच्या बायकांमध्ये तरुणाई आणि चैतन्य घेऊन येणाऱ्या तिचे काही दिवसातच नाव कळले - माया!
राहायला ती अगदी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये. साधारण साडेपाच फूट उंची असलेली, तब्यतीने दणकट, गहूवर्णी आणि तरतरीत अशी ही माया. नंतर कळले की ती मूळची दाक्षिणात्य. परंतु अनेक वर्षे मराठीबहुल भागात राहत असल्याने इंग्लिश-हिंदीमिश्रित मराठी बोलणारी. वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास आणि सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून राहायचे तिचे कसब अगदी वाखाणण्याजोगे. तिचे कपडे आणि राहणीमान तसे मॉडर्न. (म्हणजे त्यावेळेस तिच्यापेक्षा ७-८ वर्षांनी तरुण असूनदेखील माझी राहणी अतिशय काकूबाईसारखी होती.) दोन मुलांची आई असून शाळेत नोकरी करते असे कळले. आणि गंमत म्हणजे तिची शाळा लांब असल्याने ने-आण करण्यासाठी घराच्या गाडीवर ड्रायव्हर होता.
माझ्या आईची एक खूप चांगली मैत्रीण ज्यांच्याशी मासेदेखील चांगले संबंध आहेत त्यांच्याकडून कळले की मायाचे सासू-सासरे काकूंच्या बिल्डिंगमध्ये राहतात. आणि त्या काकुंशीसुद्धा तिचे खूप चांगले संबंध होते. त्या सांगायच्या की तिला माणसांमध्ये राहायचे इतके वेड की सुट्टीच्या दिवसांमध्ये ती कित्येकदा ती सासू-सासऱ्यांबरोबर जाऊन राहायची.
सोसाटीमध्ये पण सोसायटीच्या कार्यकारिणी समितीमध्ये कार्यरत होती. तसेच सोसायटीमधल्या महिलामंडळाचा व्हाट्सअँप ग्रुप पण तिने सुरु केला. बिल्डिंगमधल्या एक काकू - ज्यांना स्वयंपाकाची आवड आणि चांगल्या सुगरण, त्यांना तिने न्यूट्रीशनचा कोर्स करायचे सुचवले. म्हणजे त्यांची आवड तसेच कला ह्याला अजुन काही शिक्षणाची जोड दिली तर व्यवसायामध्ये बदलता येईल.
पाच-सहा वर्षांपूर्वी आमच्या बिल्डिंगमधल्या एका मुलाचे लग्न होते. त्याचा परदेशी असलेला धाकटा भाऊ काही अडचणींमुळे येऊ शकत नव्हता. आणि तेव्हा आतासारखे लाईव्ह विडिओ किंवा विडिओ चॅट इतके प्रचलित नव्हते. मग मायाने त्यांना सुचवले आपण असे काही करू शकतो आणि त्याला लग्न लाईव्ह दाखवू शकतो. त्यासाठी तिने त्यांना हवी ती मदतदेखील केली आणि त्या धाकट्या मुलाला दार अंतरावरून लग्नात सामील होता आले.
२-३ वर्षांपूर्वी कळले की तिच्या तब्येतीच्या काही तक्रारींमुळे ती सोसायटीचे काम करू शकणार नाही. तेव्हा मी माझ्या नोकरी आणि संसाराच्या वेगवान वारूवर स्वार होते. त्यामुळे फारसा विचारच केला गेला नाही की नक्की काय झाले असेल. पण त्यानंतर सकाळी फिरायला बाहेर पडले तर ती दिसायची. तेव्हा अगदीच औपचारिक हाय-हॅलो केले जायचे. सोसायटीच्या व्हॉटसअँप ग्रुपवर एकमेकींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जायच्या.
साधारण २ महिन्यांपूर्वी तिने माझ्याशी संपर्क साधला. तिचा धाकटा मुलगा आता BBA च्या पहिल्या वर्षाला गेला आहे आणि त्याला गणित विषय आहे. दहावीपर्यंत गणित विषय विशेष आवडीने केला नाही आणि अकरावी-बारावी मध्ये घेतलाच नव्हता त्यामुळे आता त्याला शिकवणी लावायची गरज वाटली. म्हणून तिने माझ्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर २-३ आठवड्यांनी ती BBA च्या गणिताचे पुस्तक आणि तिचा धाकटा मुलगा यांना घेऊन मला भेटायला आली. ती भेट म्हणजे तिची आणि माझी प्रत्यक्ष एकमेकींशी बोलणे झालेली पहिली भेट. तरी मी तिला सांगितले की मी माझं क्षेत्र दहावीपर्यंतचा अभ्यास एवढंच ठेवलं आहे. तर मला म्हणे एक नवी संधी म्हणून बघ. कदाचित ह्यातही तुला नवीन विद्यार्थी मिळतील.
मग काय तिचा धाकटा यायला लागला माझ्याकडे शिकवणीला. त्याची गंमतच आहे. त्याच्या आईला त्याच्या गणिताचे जेवढे टेन्शन त्याच्या निम्मेदेखील तो दाखवत नाही. आणि काही ना काही कारणाने त्याच्या आठवड्यातून १-२ दांड्या व्हायला लागल्या. मग शेवटी वैतागून मी मायाला गणपतीच्या आधी २-४ दिवस व्हॉटसअँपवर निरोप पाठवला की तो फार दांड्या मारत आहे तर अभ्यास वेळेत संपवणे अवघड जाईल. तिचे लगेच उत्तरही आले की तिला जरा थंडी-ताप असल्याने थोडे दुर्लक्ष झाले पण आता त्याच्याकडे पुरेसे लक्ष देईल.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच तिच्या धाकट्याचा मेसेज आला की त्याला बरे वाटत नसल्याने तो ४-५ दिवस येणार नाही. मला 'बरे' म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने मी तो विषय सोडून दिला. मग गौरींजेवणाच्या दुसऱ्या दिवशी तो आला पुन्हा क्लासला. त्याला काय झाले होते, कुठल्या डॉक्टरकडे गेला अश्या चौकश्या केल्या आणि नेहमीप्रमाणे अभ्यास केला. त्याला आधीच्या वर्षांच्या पेपरच्या प्रिंटआउट काढायला सांगितल्या होत्या आणि तो करत नव्हता म्हणून त्याला धमकी पण दिली की तू करत नसशील तर तुझ्या आईला मेसेज पाठवेन. तर त्याने नको नको म्हटले आणि मी आजच ते काम करेन असे सांगितले.
आणि दुसऱ्या दिवशी सोसायटीच्या महिलामंडळाच्या ग्रुपवर मेसेज आला की मायची तब्येत खूप बारी नाहीये तर तिला लवकर बरे वाटावे म्हणून देवाकडे प्रार्थना करा. मला समजेचना नक्की काय झाले. आठवड्यापूर्वी तिनेच मला सांगितले होते थंडी-ताप आहे आणि अचानक हे काय झाले. ज्यांनी मेसेज केला होता त्यांनाच फोन केला. तेव्हा कळले की सुरुवात व्हायरलमुळे होणाऱ्या थंडी-तापाने झाली आणिबरे वाटेनं म्हणून तपासण्या केल्या तर कळले की हाडांचा कॅन्सर झाला आहे आणि तो सगळीकडे पसरला आहे. ती ICU मध्ये असून तिला शुद्ध नाहीये. हे कळले तसे माझे मन सैरभैर झाले आणि देवाचा धाव सुरु केला.
परंतु दुपारी ३ वाजता मायाच्या धाकट्या मुलाची क्लाससाठी वाट पाहत असताना मेसेज आला की 'माया गेली'. मन अगदी सुन्न झाले. २-३ वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरवर मात करणारी माया ह्यावेळी मात्र हारली.
दुसऱ्यांच्या चष्म्यातून तुकड्या-तुकड्यांत भेटलेली माया, तिच्याशी खरी ओळख व्हावी असे वाटत असतानाच हे जग सोडून गेली!

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा