गणपतीपूजन आणि मोदक


गणपती आणि मोदक आपल्या मनातले घट्ट समीकरण. घरी गणपतीची स्थापना आणि पूजन करायचे म्हणजे मोदक हे केलेच पाहिजे. तर माहेर मराठवाड्यातील असल्याने मोदक म्हणजे तळणीचे मोदक हेच माहित. (आणि माझ्या बाबांना अजूनही तेच आवडतात.) पण मग आम्ही पुण्यात राहायला आलो आणि उकडीचे मोदक हा प्रकार कळला. तसेच लग्नानंतर अनेक नवनवीन गोष्टी करून पाहण्याची हौस असल्याने आणि नवरा पण सगळं कौतुकाने खाणाऱ्यांपैकी असल्याने उकडीचे मोदक करायला सुरुवात केली. पण वर्षातून केवळ एकदा केल्याने त्यावर फारसा हात असा बसलाच नाही. 

सासर सोलापूरचे असल्याने तिकडे पण तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक केले जात नाहीत. परंतु आमच्याकडे कणकेच्या पारीत मोदकाचे सारण भरून त्यांना वाफवायची पद्धत आहे (दिंड करतो तसे). तसं पहिला गेलं तर करायला सोप्पे. त्यामुळे ह्यावेळेस तश्याच पद्धतीने केले. आणि त्यात लेकीने मोदक करायला मदत केली. म्हणजे जेवढे केले त्यातल्या निम्म्याच्यावर तर तिनेच केले. मी कणकेची पारी लाटून देत होते आणि ती त्यात सारण भरून मोदक तयार करत होती. त्यामुळे ह्यावेळेसच्या मोदकांचे विशेष कौतुक. 


तसा ह्यावेळेचा गणेशोत्सव खासंच आहे. बरेच वर्षं स्वयंपाक, साफ-सफाई तसेच मला जमेल तशी सजावट असं नवऱ्याच्या मदतीने करत होते. अलीकडे २-४ वर्षे सजावट करताना मुलींचा सहभाग असायचा. पण ह्यावर्षी मुलींनी इतके काम केले - घर अतिशय स्वच्छ आवरले तसेच जी माफक सजावट केली त्यात मदत केली. आणि महत्वाचे म्हणजे मोठीने मोदक करायला मदत केली आपल्या मुलांनी आपल्या बरोबरीने काम करून सहभागी होणे, ह्या मनाला अतिशय सुखावणाऱ्या गोष्टीची सुरुवात आजच्या गणेशपूजनाच्या दिवशी झाली. गणपती आहेच ना सुखकर्ता!

Comments

  1. khup chan...
    follow me on kalyanikhalkar.blogspot.com for interesting blogs...

    ReplyDelete
  2. कल्याणी, अनेकानेक धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सुरळीच्या वड्या

उगाच काहीतरी!

माया