तंबिटाचे लाडू


खरं तर हा कर्नाटकातील पदार्थ. रोटी-बेटी व्यवहाराने कित्येकदा सीमा धूसर होतात. आमच्याकडे माझी आई माहेरची कानडी आणि मोठी बहीण लग्नानंतर कानडी. पण सीमाभागातील त्यांची गावं. त्यामुळे कित्येक कर्नाटकी पदार्थ माहितीतील आणि आवडीचे. 

मागच्या महिन्यात मोठ्या बहिणीकडे गेले तेव्हा तंबिटाच्या लाडूचं प्रमाणा आणि पद्धत विचारली. त्यांच्याकडे हा लाडू नागपंचमीच्या वेळी करतात. नागपंचमीला हे लाडू करायचा माझाही बेत होता पण तेव्हा जमले नाही. 

मग बाप्पाला नैवेद्य म्हणून हे लाडू केले. ह्या लाडवांचा आकारही विशिष्ट असतो - पेढ्यांसारखा दोन्ही बाजूंनी चपटा. मला काही तो आकार जमला नाही. पण चव मात्र जमली.



साहित्य:
डाळं ४ वाट्या
सुकं खोबरे - १ वाटी किसलेले
जाड पोहे १/२ वाटी
तीळ - १/२ वाटी
डिंक - ३ मोठे चमचे
गूळ - ३ वाट्या चिरून
वेलदोडे - ८ ते १० पूड करून
बेदाणे
काजू-बदाम पूड - १/२ वाटी (ऐच्छिक) 
तूप - ४ वाट्या

कृती:
१. डाळं गरम करून घ्यावी, जेणेकरून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील. 
२. डाळ्यांचे पीठ करून ठेवावे. 
३. तूपात डिंक तळून घ्यावा. डिंक छान फुलून आला पाहिजे. 
४. तळलेला डिंक गार होण्यासाठी बाजूला ठेवावा. 
५. त्याच तूपात जाड पोहे तळून घ्यावेत. 
६. किसलेले खोबरे गुलाबीसर भाजून घ्यावे. 
७. तीळ पण भाजून घेणे. 
८. तळलेले पोहे, डिंक व भाजलेले तीळ मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यावे. 
१०. वरील साहित्य, काजू-बदाम पूड, वेलदोड्याची पूड, बेदाणे हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्यावे. 
११. जाड बुडाच्या कढईत चिरलेला गूळ व तूप गरम करायला ठेवावे. 
१२. गूळ जेमतेम विरघळला की गॅस बंद करावा. 
१४. क्रमांक १० मध्ये एकत्र केलेले मिश्रण आणि तुपात विरघळलेला गूळ नीट एकत्र करून घ्यावे. 
१५. सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर लाडू वळायला घ्यावे. 
१६. हे लाडू आकाराने जरा लहान असतात. तसेच त्यांना खालून व वरून दाबून चपटे करायचे असतात. 





टीप:
१. मी ह्याचं निम्मे प्रमाण घेऊन अंदाजे ३२ लाडू केले. 
२. २ फोटो इथे डकवत आहे. गोलाकार असलेले लाडू मी केले आहेत. तर चपटे लाडू बहिणीने केले आहेत.

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा