अळीवाचे लाडू
- Get link
- X
- Other Apps
माझ्या आईच्या माहेरी खूप मोठं कुटुंब. मला ५ मावश्या आणि २ मामा. त्यातली एक मावशी त्या मानाने जवळ राहायची आणि म्हणून आमचं खूप येणं-जाणं होतं. आम्ही मावशीकडे जायचो तसंच ती पण आमच्याकडे यायची. तिच्या घरापासून बस स्टॅन्ड साधारण ५-७ मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे आमच्याकडे यायच्या एसटीच्या वेळेआधी १० मिनिटे घरातून बाहेर पडले तरी चालायचे. त्यात ती गाडीत जागा पकडण्यासाठी माझ्या मावसभावाला एसटीच्या मागच्या खिडकीतून चढायला लावायची.
तर ह्या सगळ्या गडबडीत तिला आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून आणायच्या असायच्या. निघायच्या पाऊण-एक तास आधी वड्यांचे मिश्रण परतायला घेणार आणि निघायच्या जेमतेम आधी त्याच्या वड्या पाडून आमच्यासाठी डब्यात घालून आणणार. वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करणे तिचा हातखंडा. त्यामुळे वड्या हमखास चांगल्याच झालेल्या असणार.
पण हे सगळं मी आत्ता का सांगत आहे? तर मावशीचा ह्या बाबतीतला वारसा पुढे चालवायचं काम मला मिळालं आहे. गौरीपूजनाच्या दिवशी मैत्रिणीकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. आणि तिला आवडतात म्हणून मला अळिवाचे लाडू न्यायाचे होते. तरी खवलेला नारळ, गूळ आणि अळीव आदल्याच रात्री एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवले होते. तिच्याकडे साधारण १ वाजता जायचे होते. तर त्या मिश्रणाला चटका देऊन तिच्या पुरते लाडू वळायला मला पाऊण वाजला. पटपट न्यायचे होते तेवढे लाडू वळले आणि डब्यात नेले. त्याआधी घरच्या गणपतीलादेखील नैवेद्य दाखवला आणि धावतपळत आमचं गलबत मैत्रिणीच्या घरच्या किनाऱ्याला लागलं.
एवढं पुराण सांगितल्यावर पाककृती व उरलेल्या काही लाडवांचा फक्त फोटो इथे देत आहे.
साहित्य:
नारळ २ खवून
अळीव ५० ग्रॅ
गूळ २ वाट्या चिरून
साखर १/२ वाटी
तूप १ चमचा
वेलदोडे ५-६ पूड करून
कृती:
१. खवलेला नारळ, गूळ, साखर व अळीव एकत्र करून ४-५ तास ठेवावे. त्यामुळे अळीव भिजले जातात.
२. हे सर्व साहित्य व तूप जाड बुडाच्या पातेल्यात अथवा कढईत घेऊन बारीक गॅसवर गरम करायला ठेवावे.
३. अधून मधून झाऱ्याने हे मिश्रण परतून घ्यावे.
४. हे कितपत गरम करायचे तर गूळ पूर्ण विरघळून मिश्रण कोरडे झाले पाहिजे.
५. मिश्रण खूप कोरडे होऊ देऊ नये. किंचित ओलसरपणा हवाच.
६. गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.
७. वेलदोड्याची पूड मिश्रणात घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
८. आता लाडू वळायला घ्यावेत. हे लाडू फार मोठे नसतात. जरा लहानसरच वळायचे.
टिपा:
१. साखर न घालता नुसत्या गुळाचे देखील लाडू करू शकता. अश्या वेळी १/४ वाटी गूळ वाढवायचा.
२. नारळात बराच ओशटपणा (fats) असतो त्यामुळे तुपाचे प्रमाण शक्यतो जास्त नको.
३. हे लाडू थोडे उष्ण असतात त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात करून खातात.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment