रोनाल्ड रॉस, मलेरिया आणि भारत
मायबोली या मराठी संकेतस्थळावर मराठी दिनानिमित्त असलेल्या उपक्रमांतर्गत हा लेख लिहिला आहे. आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इथे प्रकाशित करत आहे. ======================================= पावसाळा सुरु झाला की मलेरियाची (हिवताप) साथ हमखास असते. एके ठिकाणी वाचलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी मलेरियामुळे १००० मृत्यू नोंदवले जातात. असा हा मलेरिया हजारो वर्षे जुना आजार मानला जातो. पूर्वी युरोप आणि अमेरिकेमध्येदेखील मलेरियाचा धुमाकूळ होता. असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा पाडाव होण्यात काही अंशी मलेरिया हा आजार कारणीभूत होता. पूर्वी असे मानले जायचे की मलेरियाची लागण पाणथळ किंवा दलदलीच्या ठिकाणाहून येणाऱ्या दूषित हवेमुळे होते. त्यामुळे त्याचे नाव mal (दूषित) aria (हवा) ह्या इटालियन शब्दावरून पडले. खरं पाहायला गेले तर पाणथळ जागा किंवा दलदलीची ठिकाणे आणि मलेरियाचा जोडलेला संबंध एकप्रकारे योग्य होता. पण त्यामागचा कार्यकारणभाव चुकत होता. सिंकोनाच्या खोडाच्या सालीपासून क्विनाईन मिळते जे मलेरियावर उपचारासाठी वापरले जाते. मलेरियावरील उपचार म्हणून सिंकोन...