अरे संसार संसार...

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, तव्हा मिळते भाकर   
बहिणाबाईंची ही शाळेत शिकलेली कविता. आज आठवण यायचं कारण काय? तर झालं असं की आज कित्येक दिवसांनी एकावेळी बऱ्याच भाकरी केल्या. त्या करत असताना मला माझा भाकरी करायला कशी  शिकले तो प्रवास आठवला.

माझ्या माहेरी सकाळी पोळ्या आणि रात्रीच्या जेवणात भाकरी अशी सवय आहे. सकाळचं संध्याकाळी अजिबात चालायचं नाही. अर्थातच हे सर्व काम आईच करत असे. परंतु आईला स्पॉन्डिलायटिसचा खूप  त्रास सुरु झाल्यावर पोळ्या करण्यासाठी बाई कामावर ठेवल्या. पण संध्याकाळी आईला ताज्या भाकरी कराव्याच लागत. मला मोठ्या २ बहिणी असल्याने कित्येक वर्षे घरात मला फारसं काम करावं लागलं नाही. (माझ्या मधल्या बहिणीने तर माझे इतके लाड केलेले आहेत की मी नेहमी म्हणते की आईपेक्षा पण जास्त लाड केले तिने.)

परंतु माझ्या लग्नाआधीची २ वर्षे म्हणजे मी नुकतीच ४ वर्षे हॉस्टेलवर राहून आले होते तोवर दोघींचीही लग्नं होऊन घरात आम्ही चौघंच होतो. आणि आईचं मानेचे दुखणं आता कायमचा सोबती झाले होते. त्यामुळे असंच कधीतरी तिला मदत व्हावी म्हणून भाकरी करायला शिकायचे ठरवले. तसं बघून बघून काय करायचे हे माहित होते. कारण आई स्वयंपाक करत असायची तेव्हा मी आमच्या स्वयंपाकघराच्या दारात बसून तिच्याशी गप्पा मारत असायची. हॉस्टेलमधून सुट्टीसाठी परत यायची तेव्हा तिथल्या गोष्टी आणि पुण्यात परत आल्यावर नोकरीच्या येथील गप्पा असं सुरु असायचं.
तर एखादा पदार्थ कसा करतात हे नजरेखालून जाणे हा  भाकरी करायला शिकण्यातील पहिला टप्पा मी  पार केला होता. पुढची पायरी होती ती म्हणजे भाकरीसाठी पीठ मळणे. अर्थातच ही पायरी फार महत्वाची असते हे आईने आवर्जून सांगितलेले अजून आठवते. पीठ व्यवस्थित मळले नाही तर भाकरी नीट थापली न जाता तुटणार हे ठरलेले. पिठात पाणी घालून गोळा बनवून घेतल्यावर तो हाताच्या तळव्याच्या मनगटाच्या वरच्या भागाने चांगला मळून घेतला की भाकरी कशी छान थापता येते. आईच्या मार्गदर्शनाखाली पीठ चांगलं मळून भाकरी थापणे ही क्रिया जमू लागली.



आईची सवय आहे भाकरी परातीमध्ये करायची. त्यामुळे मी पण भाकरी परातीमध्येच थापायला शिकले. पण भाकरी थापून झाल्यावर तिला उचलून तव्यावर सुखरूप पोहोचवणे हे एक दिव्य असायचं. मग सुरुवातीचे काही दिवस मी भाकरी थापली की आई उचलून तव्यावर टाकायची आणि भाजायची. मग आईने सुचवले की पीठ परातीमध्ये मळायचे आणि भाकरी पोळपाटावर थापायची म्हणजे उचलायला सोप्पी जाते. मग काही दिवस तसं करायला सुरु केले. मग काय, भाकरीचे पीठ मळून, भाकरी थापून, पोळपाटावरून उचलून तव्यावर टाकण्यापर्यंत मजल गेली.

पुन्हा पुढचा टप्पा सोपा नव्हताच. कारण तव्यावर भाकरी टाकल्यावर वरच्या बाजूला सगळीकडून पाण्याचा हात चटकन फिरवायचा असतो. पण तेव्हा स्वयंपाकघरात अगदीच नगण्य काम करत असल्याने हाताला ते चटके सहनच व्हायचे नाहीत. सगळीकडून पाणी फिरवता फिरवता बराच वेळ जायचा आणि भाकरी गरजेपेक्षा जास्त भाजली जायची. त्यामुळे तव्यावर आतल्या बाजूला असलेल्या भाकरीच्या बाजूला भेगा पडायच्या. मग आईने सुचवलं की एखादी चिंधी घेऊनपाण्यात ओली करून ती भाकरीवरून फिरवली की हाताला चटके न बसता सगळीकडे पाणी लावता येईल. पण तो प्रकार काही मी केला नाही. आणि हळू हळू हातानेच सगळीकडे पाणी पसरवून लावायला शिकले. हे आठवलं की आईबद्दलचा आदर अजून दुणावतो. कारण तिने कधीच कुठली गोष्ट अवघड आहेतुला त्रास होईल किंवा जमणार नाही असं न सांगता येणाऱ्या अडचणींवर उपाय सुचवून नवनवीन गोष्टी शिकायला आणि करायला प्रवृत्त केले.  

भाकरीला पाणी लावून झाल्यावर भाकरी उलटणे त्यातल्या त्यात अवघड जायचे. (अजूनही कधी कधी तवा किती तापलाय ह्याचा अंदाज चुकला तर थोडाफार गोंधळ होतो.) पण तेही करता यायला लागलं. ह्यानंतर भाकरीला जरा कडकपणा येतो त्यामुळे तव्यावरून उचलणं सोपे गेले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे थेट गॅसच्या ज्वाळांवर भाकरी भाजणे. गॅसची ज्योत मंद करून तवा आधी बाजूला काढून ठेवायचा आणि भाकरी तव्यावरून उचलून मोठ्या ज्वाळांवर भाजायची हेही जमू लागले. सर्वात प्रथम मी जेव्हा हे करू शकले आणि भाकरी टम्म फुगलेली दिसली तेव्हा झालेला आनंद काय वर्णावा!  

अश्या रीतीने मी भाकरी करायला शिकले. तेही पोळ्या करायला शिकायच्या आधी. अधूनमधून मग मी करत असे भाकरी. आईला मला हे काम सांगायला नको वाटत असे. कारण तिच्या म्हणण्यानुसार नंतर आयुष्यभर हेच करायचे आहे. पण माझी घरकामातील बाकीची मदत अगदी नगण्य असल्याने, मी खारीचा वाट उचलत आहे असे वाटायचे आणि मी भाकरी करायचे.

मग काय लग्नानंतर तर सगळीच जबाबदारी आली तसे भाकरी करणे त्यातलाच एक भाग होऊन गेले. मधल्या काळात करत नव्हते. पण आता अलीकडे पुन्हा करू लागले आहे. मुलींनादेखील गरम भाकरी खायला आवडू लागल्याने करायला उत्साह वाटायला लागला आहे. तरी माझी ताई अगदी पातळ भाकरी करते तश्या काही जमत नाहीत. पण काय आहे ना की ज्या भाकरी करते त्या घरच्यांना आवडत असल्याने मी फारसा जीवाला त्रास करून घेत नाही. 


तर हे असे माझे भाकरीपुराण. आताशा भाकरीसाठी लागणारा शिधा जरी जीवाला चटके बसून मिळत असला तरी भाकरी मात्र हाताला चटके न बसता करता येते!








Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा