रोनाल्ड रॉस, मलेरिया आणि भारत
मायबोली या मराठी संकेतस्थळावर मराठी दिनानिमित्त असलेल्या उपक्रमांतर्गत हा लेख लिहिला आहे. आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इथे प्रकाशित करत आहे.
=======================================
पावसाळा सुरु झाला की मलेरियाची (हिवताप) साथ हमखास असते. एके ठिकाणी वाचलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी मलेरियामुळे १००० मृत्यू नोंदवले जातात. असा हा मलेरिया हजारो वर्षे जुना आजार मानला जातो. पूर्वी युरोप आणि अमेरिकेमध्येदेखील मलेरियाचा धुमाकूळ होता. असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा पाडाव होण्यात काही अंशी मलेरिया हा आजार कारणीभूत होता.
पूर्वी असे मानले जायचे की मलेरियाची लागण पाणथळ किंवा दलदलीच्या ठिकाणाहून येणाऱ्या दूषित हवेमुळे होते. त्यामुळे त्याचे नाव mal (दूषित) aria (हवा) ह्या इटालियन शब्दावरून पडले. खरं पाहायला गेले तर पाणथळ जागा किंवा दलदलीची ठिकाणे आणि मलेरियाचा जोडलेला संबंध एकप्रकारे योग्य होता. पण त्यामागचा कार्यकारणभाव चुकत होता.
सिंकोनाच्या खोडाच्या सालीपासून क्विनाईन मिळते जे मलेरियावर उपचारासाठी वापरले जाते. मलेरियावरील उपचार म्हणून सिंकोनाचा वापर पण खूप जुना आहे. परंतु मलेरिया ह्या आजाराचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास सुरु झाला तो मात्र एकोणिसाव्या शतकात.
इसवी सन १८५१ मध्ये चार्ल्स इ. जॉन्सन ह्या शास्त्रज्ञाने मलेरिया हा दूषित हवेमुळे होत नाही हा मुद्दा सर्वप्रथम जगासमोर मांडला. त्यानंतर १८८० मध्ये चार्ल्स लुई आफ़ॉन्स लाव्हरां ह्या फ्रेंच शास्त्रज्ञाने अल्जीरियाच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मलेरियाने ग्रस्त मनुष्याच्या रक्तपेशींमध्ये एक काळपट ठिपका पाहिला. आणि मलेरियाची लागण एका परजीवीमुळे होते हे त्याने सर्वप्रथम मांडले. (पण शरीरात हा परजीवी कुठून आणि कसा येतो हे स्पष्ट नव्हते) ह्या आजाराला मलेरिया असे संबोधण्याबाबत लाव्हरांचा तीव्र आक्षेप होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो शब्द अशास्त्रीय असल्याने त्याने 'पालदिस्म' (Paludisme) हे नाव दिले. आजही फ्रान्समध्ये ह्याच नावाचा वापर केला जातो. पण गंमत अशी आहे की आज जर आपण पालदिस्म ह्या शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये शोधायला गेलो तर मलेरिया असाच मिळतो.
दरम्यानच्या काळात सर पॅट्रिक मॅनसन ह्यांनी डासांच्या माध्यमातून हत्तीरोगाची लागण होऊ शकते असा महत्वाचा शोध लावला. आणि तोच मलेरियासंबंधी पुढील संशोधनासाठी उपयोगी पडला. अमेरिकन शास्त्रज्ञ अल्बर्ट फ्रीमन अफ्रिकानस किंग ह्याने १८८३ मध्ये डास आणि मलेरिया यांचा दाट संबंध दाखवणारे १९ तथ्ये मांडली. त्यानंतर १८९७ मध्ये रोनाल्ड रॉस ह्या ब्रिटिश डॉक्टरने डास हे मलेरियाचे वाहक आहेत ह्याचे निश्चित पुरावे दिले. आणि त्याबरोबरच डासाच्या पोटातील मलेरियाच्या परजीवीचे जीवनचक्रही शोधून काढले. हा लेख रोनाल्ड रॉस आणि त्यांनी केलेले मलेरियाविषयी संशोधन ह्याविषयी आहे.
रोनाल्ड रॉस यांचा जन्म १३ मे १८५७ साली अलमोडा (आताच्या उत्तराखंड मधील जिल्ह्याचे ठिकाण) येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना त्यांच्या आई-वडलांनी इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवले. त्यांना लहानपणापासून साहित्य, कविता, संगीत आणि गणित विषयांची आवड होती. त्यांचा एकूण कल साहित्य आणि लेखनाकडे असल्याने त्यांना लेखकच व्हायचे होते परंतु वडलांच्या इच्छेखातर ते डॉक्टर झाले. (जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या काळात महावीरसिंग फोगात होते आणि आहेत.) १८८१ साली मेडिकलचे शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केल्यावर ते भारतीय वैद्यकीय सेवेच्या नोकरमध्ये रुजू झाले. नोकरीमध्ये त्यांची नेमणूक मद्रास, बलुचिस्तान, अंदमान, बंगलोर, सिकंदराबाद अश्या विविध ठिकाणी झाली. १८९४ मध्ये सुट्टीसाठी इंग्लंडमध्ये परत आले असता त्यांची भेट सर पॅट्रिक मॅनसन ह्यांच्याशी झाली. आणि मॅनसन त्यांचे मार्गदर्शक झाले. १८९४ मध्ये मॅनसन यांनी एक पेपर प्रकाशित केला ज्यात त्यांनी मलेरिया आणि डास (किंवा तत्सम कीटक) ह्यांच्यात असलेला संबंध मांडला. मॅनसन ह्यांचा ठाम विश्वास होता की मलेरिया विषयी भारतात जास्त चांगल्या पद्धतीने संशोधन होऊ शकते.
सुट्टीहून भारतात परतल्यावर म्हणजे १९९५ मध्ये रॉस यांची नियुक्ती सिकंदराबाद येथे झाली. तिथे त्यांनी मलेरियावर संशोधन सुरु केले. मॅनसन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रॉस यांनी मलेरियाग्रस्तांच्या रक्तावर पोसलेल्या हजारो डासांचे पोट फाडून निरीक्षण केले. हे डास करड्या रंगाचे आणि अंगावर पांढरे पट्टे असलेले होते. परंतु हे संशोधन अर्धवट स्थितीतच असताना बंगलोरमध्ये कॉलराची साथ पसरल्याने त्यांना तिथे पाठवण्यात आले. आणि संशोधन काही काळासाठी ठप्प झाले. परंतु दरम्यानच्या काळात मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या उटीच्या आसपासच्या भागात रॉस यांचे जाणे झाले. आणि तिथे त्यांना तपकिरी रंगाचे अंगावर पांढरे ठिपके असलेले डास आढळून आले.
मधल्या काळात म्हणजे १८९६ मध्ये ग्रासी (Giovanni Battista Grassi) आणि बिनामी (Amico Bignami) ह्या इटालियन शास्त्रज्ञांनी डासाच्या चाव्याने मलेरियाचा संसर्ग होतो ही परिकल्पना मांडली. असं कित्येकदा होते की एकाच गोष्टीबद्दल अनेक लोक एकाच वेळी परंतु जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन करत असतात.
तर सिकंदराबादला परतल्यावर रॉस यांनी त्यांचे संशोधन पुन्हा नेटाने सुरु केले. त्यांनी आता पांढरे ठिपके असलेल्या तपकिरी रंगाच्या डासांची पैदास केली. आणि हुसेन खान नावाच्या मलेरियाग्रस्त पेशंटला काही पैसे (काही आणे) देऊन त्याला त्या डासांकडून चावून घ्यायला लावले. त्याच डासांना पकडून त्यांचे पोट फाडून त्याचे निरीक्षण रॉस करत असत. ते उन्हाळ्याचे दिवस होते. (आपल्यापैकी कोणी हैदराबाद/सिकंदराबादला जाऊन आले असेल तर कल्पना असेलच की तिथला उन्हाळा किती अंगाची लाही लाही करणारा असतॊ.) अश्या उन्हाळ्यात डास उडून जाऊ नयेत म्हणून प्रचंड उकाड्यात रॉस त्यांचं काम करत असत. ते घेत असलेले अपार कष्ट फळाला आले आणि त्या डासांच्या पोटात रॉस यांना मलेरियाचे परजीवी आढळून आले. आणि त्यानंतर लगेचच डासांच्या पोटात त्या परजीवींची वाढ झालेली दिसून आली. हाच तो ऍनाफिलीस जातीचा डास (ग्रीक भाषेत ऍनाफिलीस म्हणजे कामा ना काजाचे). मलेरियाविषयक संशोधनातील हा महत्त्वाचा टप्पा होता. हा शोध लागल्यानंतर त्यांच्यातील कवीने पत्नीला एक कविता करून पाठवली होती. त्या कवितेचा हा स्वैर अनुवाद.
आजच्या दिवशी विवश होऊन देवाने
माझ्या हाती दिली एक आश्चर्यकारक गोष्ट
त्या देवाची महती गावी तेवढी कमीच!
त्याच्या आदेशानुसार करत होतो
एका रहस्याचा पाठपुरावा
केली ऊर फुटेस्तोवरची मेहनत
हाती लागले तुझे कपटी बीज
शेकडो मृत्यूंना कारणीभूत ठरणारे
ही लहानशी दिसणारी गोष्ट
वाचवणार आहे असंख्य प्राण
हे मृत्यो, कुठे आहे तुझी नांगी?
अन मानवी जीवन गिळंकृत करणाऱ्या चितेच्या त्या ज्वाळा?
इतका महत्त्वपूर्ण शोध रॉस ह्यांनी लावला तरी त्यांची बदली करण्यात आली. ब्रिटिशांचा का असेना सरकारी कारभार तो त्यामुळे रॉस यांच्या संशोधनाबद्दल काहीही आस्था न बाळगता त्यांची बदली केली गेली. बदली देखील अश्या ठिकाणी जिथे मलेरियाचा काहीच प्रादुर्भाव नव्हता. ह्यातून रॉस उद्विग्न झाले आणि मधेच केलेल्या अश्या बदलीला वैतागून त्यांनी नोकरी सोडायचे ठरवले. परंतु सर मॅनसन यांनी मध्यस्थी केली आणि रॉस ह्यांची नियुक्ती कलकत्ता येथे करवली.
तिथे त्यांनी मॅनसन यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक पद्धतीने पक्ष्यांचा वापर करून पुढील संशोधन केले. १८९८ मध्ये त्यांनी पक्ष्यांमधील मलेरियाचा प्रसार पक्ष्यांमधून डासांमध्ये आणि पुन्हा पक्ष्यांमध्ये कसा होतो ते दाखवून दिले. त्यांच्या संशोधनातून असेही स्पष्ट झाले की मलेरियाची लागण झालेल्या पक्ष्यांना जर डास चावले तर मलेरियाचे परजीवी रक्तावाटे डासांच्या शरीरात जातात. आणि निरोगी पक्ष्याला हेच डास चावले तर त्यांना मलेरियाची लागण होते. पुढे त्यांनी असाही शोध लावला की मलेरियाच्या परजीवींची वाढ डासांच्या पोटात होते आणि नंतर ते डासाच्या लाळग्रंथीमध्ये साठवले जातात. त्यामुळे डासाची भूमिका मध्यस्थ पोषक (Intermediate host) अशी ठरते. मलेरियाच्या परजीवींचे जीवनचक्र तसे बरेच किचकट आहे. रॉस यांच्या संशोधनाने त्यातील एक महत्वाचा भाग उलगडला गेला.
रोनाल्ड रॉस, मलेरिया आणि भारत - विज्ञानभाषा मराठी
वर्षानुवर्षे ज्या आजाराने संपूर्ण जगाला त्रासले होते त्याचा बऱ्याच अंशी छडा लावण्यात रॉस यांना यश मिळाले होते. त्याकरता त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित केले.
जगाचा आणि भारताचा मलेरिया विरुद्ध लढा सुरूच आहे. पण त्या लढाईला निर्णायक वळण रोनाल्ड रॉस यांनी भारताच्या मातीतच लावले होते.
Comments
Post a Comment