केक थालिपीठ
असे वाटत असेल ना की ही कुठली पाककृती देत आहे मी. कृती पारंपारिकच आहे परंतु लक्ष वेधले जावे म्हणून नावाला ट्विस्ट दिला आहे. केळ आणि कणकेचे गोडाचे थालिपीठ आहे हे. म्हणून केक (केळ आणि कणकेचे) थालिपीठ.
आज प्रथमच मी केले आणि खाल्ले देखील. परंतु चवीची पावती नवर्याने दिली कारण त्याने त्याच्या लहानपणी खाल्ले आहे.
घरी केळी आणून बरेच दिवस झाले होते आणि २ केळी उरून खूप पिकली होती. इतरवेळी कदाचित टाकून दिली असती. पण सध्याच्या काळात आहे ते जिन्नस टाकून न देता कसे वापरता येईल ह्याचा विचार केला जातो. मग केळ घालून शिरा करायचा ठरवला पण २ केळी जास्त झाली असती. मग १ केळ वापरून शिरा आणि दुसरे केळ वापरून ही थालिपीठे केली.
साहित्य:
केळ - १
कणिक - साधारण १.५ वाटी
गूळ - २ मोठे चमचे अगदी बारीक चिरून
मीठ - चिमूटभर
कृती:
वरील सर्व साहित्य एकत्र करून जरा मळल्यासारखे केले. आणि गरजेनुसार पाणी घालून जरा सैलसर पीठ मळले.
ह्या पिठाचे ४ एकसारखे गोळे केले आणि लहान लहान थालिपीठे थापून तुपावर भाजली.
नेहमीची थालिपीठे भाजतो तसे प्रथम झाकण ठेवून भाजले.
तुपावर दोन्ही बाजूने भाजली की खमंग चव येते.
दुधाची प्लास्टिकची पिशवी थालिपीठे थापण्यासाठी वापरली.
नावातला ट्विस्ट आवडला.
ReplyDeleteधन्यवाद! लक्ष वेधून घेण्यासाठी काही तरी वेगळे.
Delete