कैरीची चटणी

कैरीची चटणी

हा कैरीच्या चटणीचा प्रकार माझा विशेष आवडता आहे. एकतर लहानपणापासून ह्याच पद्धतीने केलेली चटणी खाल्ली आहे. तसेच शाळेत असताना म्हणजे साधारण सातवी-आठवी मध्ये असताना आम्ही मैत्रिणींनी स्वयंपाक केला होता तेव्हा मी ही चटणी केली होती आणि सगळ्यांना खूप आवडली होती. तर विचार केला की तुम्हा सर्वांना त्याची पाककृती सांगावी.  

तर आता अजून पाल्हाळ न लावता साहित्य आणि कृती सांगते. 
साहित्य:
कैऱ्या - पाव किलो
गूळ   - बारीक चिरून १/२ वाटी 
तिखट - २-३ चमचे  
दाण्याचा कूट - २-३ चहाचे चमचे 
मीठ - चवीनुसार 

फोडणीसाठी:
तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि किंचित मेथ्याची पूड   

कृती:
१. कैऱ्या स्वच्छ धुऊन घेणे आणि साल काढून किसून घेणे. 
२. किसलेल्या कैरीमध्ये तिखट, मीठ, गूळ आणि दाण्याचा कूट मिसळणे. 
३. सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित कालवून घेणे. 
४.  सांगितलेले पदार्थ वापरून फोडणी करून घेणे आणि चटणीमध्ये मिसळणे.

तर आंबट, तिखट आणि गोड चवीची चटणी तयार आहे. 



टीप:
१. कैरीच्या आंबट चवीमुळे गोडसर चव येण्यासाठी गूळ व्यवस्थित प्रमाणात घालणे आवश्यक आहे. गुळाच्या बरोबरीने थोडी साखर घातली तरी छान चव येते. 
२. मी ह्या वेळेस चटणी करताना ब्याडगी मिरचीचे तिखट घातले आहे त्यामुळे छान लालभडक रंग आला आहे.  
३. फोडणीमध्ये मेथ्याची पूड किंचित घातल्याने खूप छान चव येते. पण नसेल अथवा घालायची नसेल तर घातली नाही तरी चालेल.
४. ही चटणी बरेच दिवस टिकते. आणि जेवढी जास्त मुरेल तेवढी छान लागते. 

पाककृतीचा स्रोत: माझी आई 

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा