दिसला गं बाई दिसला...
मागच्या आठवडयापासून व्हॉट्सअँप आणि फेसबुक वर मेसेज यायला लागले की ३१ चा दिवस (की रात्र?) खास आहे. आणि खासियत काय तर एकाच दिवशी (आता पुन्हा दिवशी की रात्री? फार बोर मारतेय ना!) blood moon, blue moon, super moon आणि चंद्रग्रहण असं सगळं दिसणार आहे. मला बापडीला प्रश्न पडला की पृथ्वीला तर एकच चंद्र, मग ह्या एकाच चंद्राचे एवढे प्रकार दिसणार कसे!
मग शाळेच्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर पण चर्चासत्र सुरु झाले की ३१ जानेवारीचा चंद्र असा काय विशेष असणार आहे. एक मैत्रीण म्हणाली की कदाचित बर्फ पडणाऱ्या पाश्चिमात्य देशात तो निळा दिसत असणार आणि आपल्याकडे लाल. म्हणून मग एकाच वेळी blue noon आणि blood moon आहे असं म्हणत असणार. आणि मैत्रीण हेही म्हणाली की कदाचित म्हणूनच इंग्लिशमध्ये 'once in a blue moon' हा वाक्प्रचार प्रचलित असणार. म्हटलं हे तार्किकदृष्ट्या बरोबर वाटत आहे.
पण त्या देवाला ज्याने तो चंद्र आणि आपल्याला बनवलं, त्यालाच काळजी. (म्हणजे मी सश्रद्ध आहे हो. त्या देवामुळेच पृथ्वी, चंद्र आणि आपण सगळे आहोत ही श्रद्धा - कपूरांची नाही तर माझीच). आणि आमच्या ग्रुपमध्ये अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून विचार करणारी एक मैत्रीण आहे तिने एका इंटरनेट वरील लिंकसह आम्हाला समजावले की नेमकं प्रकरण काय आहे.
तेव्हा कळलं की एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पौर्णिमा आली तर त्या चंद्राला blue moon म्हणायचे, ग्रहण काळात पृथ्वीचा प्रकाश परावर्तित होऊन चंद्र पडणार आणि चंद्र लालसर दिसणार म्हणून तो blood moon आणि पृथ्वीचा जास्त जवळ चंद्र आल्याने नेहमीपेक्षा थोडासा मोठा दिसणार म्हणून तो super moon.
आता असा सुप्पर डुप्पर दिसणारा मून आहे म्हणल्यावर आपण बघायलाच पाहिजे ना! आणि परत आख्खे जग जे पाहणार आणि व्हॉट्सअँप/फेसबुकवर ते पाहिल्याचं पोस्ट करणार ते आपण नाही पाहायचं असं कसं चालणार! आणि न पाहता मी पाहिलं, मी पाहिलं असं सांगायचा स्वभाव नाही हो माझा. त्यात मी २१व्या शतकातली आई! माझ्या मुलींना अश्या घटनेचा शास्त्रीय दृष्टिकोनातूल आनंद घेऊ देणं हे माझं आद्य कर्तव्य. त्यात आता शिक्षिकेची झूल नव्यानेच पांघरली आहे. तर माझ्या शिकवणीच्या मुलांना पण वाटलं पाहिजे ना की आपल्या 'बाई' कसल्या भारी आहेत; नुसतं पुस्तकातला अभ्यास शिकवत नाहीत तर आकाशात पण काय काय होताना दाखवतात.
मग ठरलं तर, माझ्याकडे संध्याकाळी शिकवणीला येणारी मुलं आणि माझ्या मुली असं सगळ्यांना घेऊन गच्चीवर जायचं आणि सगळे मुनमून दाखवायचे. ठरल्याप्रमाणे आमची वरात साडेसहाच्या सुमारास गच्चीवर जाऊन पोहोचली. तर नुकताच सूर्यास्त झालेला असल्याने आकाशात अजून बराच उजेड होता. म्हटलं ह्यात तो चंद्र कसा दिसावा! मग काय वाट बघणं सुरु झाला. आणि अत्यंत कर्तव्यदक्ष शिक्षिकेच्या भूमिकेत जाऊन मुलांना चंद्राचे जे वेगवेगळे प्रकार दिसणार होते त्याची माहिती देऊ लागले. अजूनही चंद्राचा पत्ता नव्हता. तेवढ्यात मला माहीत असलेले मृग नक्षत्र आकाशात दिसले आणि मुलांना ते दाखवून टाकले. तेवढीच माझी कॉलर ताठ की आकाशदर्शनातले मलाही काही कळते.
आणि तेवढ्यात माझ्या धाकटीने आकाशात एके ठिकाणी बोट दाखवून म्हटले की तो बहुतेक चंद्र आहे. डोळे फाडून फाडून पहिले तेव्हा कुठे पुण्यातील प्रदूषण आणि झगमगाटात कुठे तरी चंद्र अंधुकसा दिसला. मग त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून बसलो (म्हणजे उभेच राहिलो). थोड्या वेळाने अजून अंधार झाला आणि पृथ्वीच्या सावलीने ग्रस्त blood moon दिसू लागला.
तेव्हा असं झालं की "दिसला गं बाई दिसला... दिसला गं बाई दिसला... लाल चंद्र आभाळात दिसला गं बाई दिसला...." आणि हुश्श केलं की आता मी फेसबुकवर टाकायला मोकळे, मी पण blue, blood, super moon पाहिला.
Comments
Post a Comment