असंही व्हॅलेंटाइनचं सेलिब्रेशन...

उगवला प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत 

त्याच्या हृदयाची वाढली होती धडधड 
तिच्याही काळजात होत होतं लकलक
कारण तो होता ट्रेडमिलवर धावत 
आणि तिच्या लेकीच्या व्हॅनचा हॉर्न होता वाजत 

दिला तिने त्याला आवर्जून फूल 
पण होतं ते डब्यातलं कोबीचं फूल 
निघाला मग तो एकटाच लॉंग ड्राईव्हवर 
कारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर 

पोहोचला एकदाचा तो ऑफिसला 
होतीच 'ती' तिथे सोबतीला 
सुरु झालं त्याचं आणि तिचं गूज 
म्हणला तो तिला दिवसभराची राणी माझी तूच 

तिचाही 'तो' होता घरात सोबतीला    
देईना तिला एकही क्षण फुरसतील 

कॉम्प्युटरची सिस्टीम होती त्याची 'शिरीन'
अन घरकामाचा रगाडा तिचा 'फरहाद'

मावळला दिनकर अन झाला त्यांचा कॅन्डल लाईट डिनर 
कारण होती MSEB ची कृपा त्यांच्यावर 

तो शिरला निद्रादेवीच्या कुशीत अन ती बसली लेकीचा प्रोजेक्ट करीत 
म्हणे उगवला होता प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत... 

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या वड्या

उगाच काहीतरी!

माया