Posts

Showing posts from 2019

उसू पराठा

Image
तर आंतरजालावरच्या एकूण वावरातून असं निदर्शनास आले आहे की पदार्थ काहीही असला तरी नाव आणि फोटो दिलखेचक असले पाहिजेत. त्यामुळे हे नाव. त्यातले घटक पदार्थ काय आहेत हे वाचून तुम्हालाही हे लक्षात येईल. तर सर्वात प्रथम आपण घटक पदार्थ काय आहेत ते बघू. कणिक आदल्या रात्रीची पालक, मेथी आणि चुक्याची पातळ भाजी लसणाच्या दोन पाकळ्या थोडी जिरे पूड हळद तिखट मीठ कृती: सर्व घटक पदार्थ एकत्र करून आणि अगदी गरज लागेल तसे पाणी मिसळून गोळा मळून घ्या. तेलाचा हात लावून १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. आता लहान लहान गोळे करून पराठे लाटून घ्या आणि खरपूस भाजून घ्या. आवडीप्रमाणे चटणी, लोणचे अथवा सॉस ह्यांच्या सोबत ह्या पराठ्यांचा चट्टामट्टा करा. इथे मी चटणी वाढली आहे. चटणी घरचीच आहे पण सोलापूरच्या खैरमोडयांच्या!  😀 तर साहित्य आणि कृती वाचून नावाचा उलगडा झालाच असेल. आणि नसेल तर आता सांगते. उसू पराठा म्हणजे उरलेसुरल्याचा पराठा!  

दिल के टुकडे टुकडे कर के...

Image
सकाळी सकाळी काय माझा देवदास झालाय असं वाटत असेल ना! पण तसं काही नसून कहानी में थोडा twist हैं!  आज सकाळी आलं मनात फ्लॉवरची भाजी करूयात आणि घालू म्हणलं बटाटा त्यात. पण हाय रे कर्मा! बटाटे तर संपले होते. आणि संभाला था मैंने बहोत अपने दिल को म्हणत जो बटाटा बाजूला ठेवला होता तो वापरायची वेळ आली. हाच तो फोटोमधला बटाटा - दिलवाला बटाटा!   मग काय 'दिल के टुकडे टुकडे कर के, मुस्कुरा के चल दिये' म्हणत म्हणत भाजीत घालण्यासाठी त्याचे काप केले. त्याचाही फोटो इथे डकवला आहे. मग म्हणाल मुस्कुरानेवाली मी कुठे आहे? तर सकाळी सकाळी डब्याच्या घाईमध्ये बराच अवतार असतो. म्हणजे दिवसभरात अनेकविध कामे पार पडताना वेगवेगळे अवतार धारण करावे लागतात त्यातलाच एक असतो, पण तरीही त्याचा फोटो काढून चारचौघात दाखवण्यासारखा नसतो. पण सकाळच्या गडबडीचा वेळेत एका बटाट्याने मूड एकदम फिल्मी केला म्हणून इथे त्याचं कौतुक सांगावं म्हटलं.   आता विचाराल की भाजीचा फोटो कुठे आहे? तर भाजी गेली डब्यात भरून. 

रोनाल्ड रॉस, मलेरिया आणि भारत

Image
मायबोली या मराठी संकेतस्थळावर मराठी दिनानिमित्त असलेल्या उपक्रमांतर्गत हा लेख लिहिला आहे. आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इथे प्रकाशित करत आहे.   ======================================= पावसाळा सुरु झाला की मलेरियाची (हिवताप) साथ हमखास असते. एके ठिकाणी वाचलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी मलेरियामुळे १००० मृत्यू नोंदवले जातात. असा हा मलेरिया हजारो वर्षे जुना आजार मानला जातो. पूर्वी युरोप आणि अमेरिकेमध्येदेखील मलेरियाचा धुमाकूळ होता. असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा पाडाव होण्यात काही अंशी मलेरिया हा आजार कारणीभूत होता.  पूर्वी असे मानले जायचे की मलेरियाची लागण पाणथळ किंवा दलदलीच्या ठिकाणाहून येणाऱ्या दूषित हवेमुळे होते. त्यामुळे त्याचे नाव mal (दूषित) aria (हवा) ह्या इटालियन शब्दावरून पडले. खरं पाहायला गेले तर पाणथळ जागा किंवा दलदलीची ठिकाणे आणि मलेरियाचा जोडलेला संबंध एकप्रकारे योग्य होता. पण त्यामागचा कार्यकारणभाव चुकत होता.   सिंकोनाच्या खोडाच्या सालीपासून क्विनाईन मिळते जे मलेरियावर उपचारासाठी वापरले जाते. मलेरियावरील उपचार म्हणून सिंकोन...

गं कुणीतरी येणार येणार गं...

रविवारी संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो तर घरासमोर जी शाळा आहे तिच्या पटांगणावर मांडव घालायचं काम सुरु होतं. अर्थातच कन्यारत्नाकडून प्रश्न विचारला गेला की कश्यासाठी मांडव बांधला जात आहे. अर्थातच माझ्याकडे उत्तर नव्हतं. (जेव्हा पासून तिला गणित आणि शास्त्र शिकवत आहे तेव्हा पासून तिला असे वाटते की तिने कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर माझ्याकडे असते.) विचार केला की असेल शाळेचा काहीतरी कार्यक्रम. कालचा दिवस पण तसाच गेला. खिडकीतून पाहीले तर मांडव अजून दिसत होता आणि कार्यक्रम झाल्याचा काही आवाजही आला नव्हता. म्हणजे कालपर्यंत काही कार्यक्रम झाला नव्हता. आणि आज त्याचा खुलासा झाला. कारण आज सुट्टीनिमित्त सकाळी क्लास ठेवला होता. तर माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन सांगितले की आज समोरच्या शाळेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. म्हणलं, अच्छा... याचिसाठी आहे सारा अट्टहास! साधारण १०च्या सुमारास बाहेर पाहिलं तर लोकांची गर्दी तर जमा होतंच होती, पण त्याचबरोबर बरेच पोलीस येऊन थांबले होते. १०च्या पुढे फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांची तीन तासांची परीक्षा असल्याने अधूनमधून कार्यक्रम...

लसणाच्या पातीची चटणी

Image
ह्या रविवारी आठवडी बाजारात भाजीखरेदीला गेलो होतो तेव्हा लसणाची पात दिसली. तेव्हा अर्थातच विकत घ्यायचा मोह टाळता नाही आला. घरी आणली खरी ,  पण पुढे काही करायला आजचा मुहूर्त लागला. काय केलं तर पातीची चटणी. त्याचीच कृती इथे देत आहे. साहित्य: लसणाची पात  जिरे - १/२चमचा लाल तिखट - १ चमचा मीठ - चवीनुसार कृती: १. पात स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावी. २. पातीचे जाडसर काप करून घ्यावेत म्हणजे बारीक करायला सोपे जाईल. ३. जाडीभरडी चिरलेली पात आणि इतर साहित्य दगडी खलबत्त्यामध्ये घेऊन बारीक करावे. अत्यंत झणझणीत अशी चटणी तयार आहे. लसणाची स्वतःची चव आणि तिखट ह्याने जी चव येते ती झटका देणारी असते. दगडी खलबत्त्यामध्ये चटणी बारीक केल्याने त्यात पाणी अजिबात घातले नाहीये ,  त्यामुळे ही चटणी बरेच दिवस टिकते. मिक्सरमध्ये करता येईल का ?  तर अर्थातच हो. पण एकूण साहित्य कमी असल्याने बारीक करताना कदाचित पाण्याचा वापर करावा लागेल. माहितीचा स्रोत: सासूबाई   

अरे संसार संसार...

Image
अरे संसार संसार , जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके , तव्हा मिळते भाकर    बहिणाबाईंची ही शाळेत शिकलेली कविता. आज आठवण यायचं कारण काय ? तर झालं असं की आज कित्येक दिवसांनी एकावेळी बऱ्याच भाकरी केल्या. त्या करत असताना मला माझा भाकरी करायला कशी  शिकले तो प्रवास आठवला. माझ्या माहेरी सकाळी पोळ्या आणि रात्रीच्या जेवणात भाकरी अशी सवय आहे. सकाळचं संध्याकाळी अजिबात चालायचं नाही. अर्थातच हे सर्व काम आईच करत असे. परंतु आईला स्पॉन्डिलायटिसचा खूप   त्रास सुरु झाल्यावर पोळ्या करण्यासाठी बाई कामावर ठेवल्या . पण संध्याकाळी आईला ताज्या भाकरी कराव्याच लागत. मला मोठ्या २ बहिणी असल्याने कित्येक वर्षे घरात मला फारसं काम करावं लागलं नाही. ( माझ्या मधल्या बहिणीने तर माझे इतके लाड केलेले आहेत की मी नेहमी म्हणते की आईपेक्षा पण जास्त लाड केले तिने. ) परंतु माझ्या लग्नाआधीची २ वर्षे म्हणजे मी नुकतीच ४ वर्षे हॉस्टेलवर राहून आले होते तोवर दोघींचीही लग्नं होऊन घरात आम्ही चौघंच होतो. आणि आईचं मानेचे दुखणं आता कायमचा सोबती झाले होते. त्यामुळे असंच कधीतरी तिला मदत व्हावी ...

चटकोशिंबीर

Image
तुम्हांला प्रश्न पडेल की काय हे नाव आणि काय हा पदार्थ ? मध्ये एकदा आमच्या सोसायटीमधील एका काकूंकडे खाल्ला या हा पदार्थ. बटाटेवड्यांबरोबर तोंडीलावणे म्हणून होता. त्याला चटणी म्हणावं तर दह्याचं प्रमाण बरंच जास्त आणि कोशिंबीर म्हणावे तर तिच्यात सर्वसाधारणपणे घातले जाणारे घटकपदार्थ यात नाहीत. म्हणून मग मीच ह्याचं नामकरण केलं चटकोशिंबीर (चटणी + कोशिंबीर). साहित्य: कोथिंबीर , पुदीना (कोथिंबीरीपेक्षा पुदिना कमी म्हणजे अगदी स्वादासाठी घेतला आहे) , मिरच्या (आमच्या घरी हिरव्या मिरच्या चालत नाहीत म्हणून मी लाल सुक्या मिरच्या घातल्या) आणि दही कृती: १. दही एका गाळणीत घालून पाणी निथळत ठेवावे. २. कोथिंबीर , पुदिना आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यातच चवीनुसार मीठ घालावे. ३. एका कुंड्यात दही आणि ही चटणी छान एकजीव कालवावी. ४. पानात डाव्या बाजूला वाढण्यासाठी चटकोशिंबीर तयार झाली. 

धपाटे

Image
मराठवाडा, सोलापूर भागात सर्रास केला जाणारा पदार्थ म्हणजे धपाटे. लग्न केल्यानंतर माझ्या अतिशय सुगरण असलेल्या सासूबाईंकडून कित्येक पदार्थ करायला शिकले त्यातला हा एक.  सध्या माझी मोठी कन्या सकाळच्या वेळेस घरी असल्याने, आम्हा दोघींसाठी नाष्ट्यामधे धपाटे करायचे ठरवले. अगदी घरातील साहित्य वापरून होणारा पदार्थ पण तरीही अतिशय चविष्ट. साहित्य: ज्वारीचे पीठ, जिरे, ओवा, लसूण, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ - सगळाच मामला अंदाजपंचे  ह्यात डाळीचे पीठ आणि कणिक थोड्या प्रमाणात घालतात. कणकेने पिठला थोडा चिकटपणा आल्याने अगदी पातळ धपाटे थापता येतात. (पण आज धपाटे करताना मी ही पीठे घातली नाहीयेत.)   कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून भाकरीसाठी जसे पीठ मळून घेतो तसे मळून घेणे. मळलेले पीठ थोडे घट्ट असायला पाहिजे कारण कमीत कमी पीठ लावून धपाटे थापायचे असतात.  धपाटे जास्तीत जास्त पातळ थापावेत. धपाटे भाकरीसारखे जरी थापायचे असले तरी भाजताना भाकरीला लावतो तसे पाणी लावायचे नसते. धपाट्याला दोन्ही बाजूला तेल लावून खरपूस भाजून घ्यावे. आणि गरम गरम धपाटे खायला वाढावे...

Clear Concept Academy: Factors and Multiples - 1

आधीच्या काही पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे मी शाळेच्या मुलांसाठी क्लासेस घेते. गेली २ वर्षे त्यांना शिकवताना मला जाणवले की कित्येक पायाभूत संकल्पना जर व्यवस्थित कळल्या नाही तर पुढील यत्तांमध्ये अवघड जाते. त्यामुळे अश्या काही संकल्पनांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या नवीन ब्लॉगमार्फत करणार आहे.    नक्की माझ्या नवीन ब्लॉगला भेट द्या. तुमचा अभिप्राय नक्की कळवा. Clear Concept Academy: Factors and Multiples - 1 : Factors of a number A factor of a number is a number that divides the given number with remainder zero. Example 1 Let the giv...

मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर ...

Image
मुली अगदी लहान बाळ होत्या तेव्हा त्यांना खेळवताना कायम 'मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर ...' हा खेळ खेळला जायचा. छान चारीठाव जेवणाचं ताट वाढलेलं असायचं त्यात.  प्रत्यक्षात सणावाराला पण असंच ताट वाढून नैवेद्य दाखवला जातो. पण इतरवेळेस बरेचसे पदार्थ जरी बनवले जात असले तरी प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार ताट वाढून घेणार आणि जेवणार. पण आज मात्र न ठरवता असं साग्रसंगीत ताट वाढलं. झालं असं की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. विशेष काही स्वयंपाक करायचे ठरवले नव्हते. परंतु दर मंगळवारी आमच्याकडे भेंडीची भाजी झालीच पाहिजे असा शिरस्ता आहे. त्यामुळे हीच भाजी करायची ठरवली. मग नेहमीचंच केलं - भाजी, आमटी, वरण-भात, कोशिंबीर, चटणी (जवस + सुके खोबरे + तीळ + कढीपत्ता लसूण घालून), आंबेहळदीचे लोणचे आणि आम्रखंड (घरचेच पण चितळ्यांच्या)! पण कोशिंबीर करताना लक्षात आलं की गाजर आणि मुळ्याची एकत्र दही आणि कोथिंबीर घालून कोशिंबीर केल्यावर छान रंगीबेरंगी दिसत होती. मग लक्षात आले की लोणच्याचा केशरी रंग, चटणीचा काळपट रंग, कोशिंबिरीचा लाल, पांढरा आणि हिरवा रंग, पिवळसर केशरी आम्रखंड, पांढरा भात त्यावर पिवळं वरण, हिर...